आयटीच्या झंझावाताने देशातील नोकरी-व्यवसायाचा सारा माहोल बदलला.  युवावर्गाची स्वप्नं बदलली. जीवनमान बदललं. खाण्यापासून नात्यांपर्यंत बऱ्याच गोष्टींत बदल झाला. काही हातात येतंय, असं वाटत असतानाच मंदीचे मळभ दाटले आणि बरंच काही हातून निसटलंही.  आयटीच्या आगमनाने अल्पावधीत झालेल्या या स्थित्यंतरांचा समग्र धांडोळा…
अभय सावंत न्यूयॉर्कच्या १२१ व्या मजल्यावरील उंची हॉटेलच्या मोठाल्या खिडकीतून बाहेर नजर टाकत होता. टोलेजंग पॉश इमारतींच्या विळख्यात आपण पुरते गुरफटून गेल्याचं फीलिंग त्याला येत होतं. आभाळात टोक घुसलेल्या अशा अनेक इमारती दाटीवाटीनं त्याच्यासमोर उभ्या होत्या. त्यांच्या गराडय़ात असताना त्याला एकदम लालबागमधल्या चाळी आठवल्या.. एकात दुसरी रूतत गेलेली अशी चाळींची रांग आणि त्यातल्या दहा बाय दहाच्या खोल्या.. कॉमन गॅलरीत साऱ्यांच्या दारापुढे रचून ठेवलेली पाण्याची पिंपं, चपलांचे ढीग, टमरेल, पाणी तापवण्याची मातीची शेगडी आणि बाजूला रचून ठेवलेली लाकडं.. त्या सामानावरून शेजाऱ्यांमध्ये असणाऱ्या छोटय़ा- मोठय़ा कुरबुरी.. ते सगळं आठवून अभयच्या ओठांवर हसू उमटलं आणि विरतही गेलं.. लालबाग ते न्यूयॉर्कपर्यंतचा प्रवास तुकडय़ा-तुकडय़ांनी त्याच्या डोळ्यांसमोर तरळू लागला..
‘सातवी-आठवीपर्यंत वर्गातल्या हुशार मुलांमध्ये वगैरे नव्हतो आपण..’ अभ्यासात आपण नेमके कधी रमायला लागलो, हे अभय आठवू लागला.. तसं झालं नसतं आणि चाळीतल्या पक्या, रम्या, बंटीसारखं आपणही गणपती, दांडिया आणि क्रिकेटचे सामने भरवायला म्हणून पैसे जमा करण्यासाठी वर्गणीची बुकं घेऊन दारोदारी फिरलो असतो तर आज कुठे असतो, हा विचार करताना त्याला घाम फुटला.. ‘मास्तरचा मुलगा’ म्हणून चाळीत ओळखला जायचो.. ‘शिक्षकाचा मुलगा आहेस, डोकंपण आहे, मन लावून अभ्यास केलास, तर तुझंच भलं होईल, आपल्याला बरे दिवस येतील..’ या आईच्या सततच्या तुणतुण्यानं डोकं उठायचं.. बाबांचं बोलायचं तर ते सतत गंभीर चेहऱ्यानं वावरायचे. कुणाच्या अध्यात-मध्यात नाही. घर आणि नोकरी एवढंच त्यांचं विश्व. कुडाळला असणाऱ्या भावाला त्याचा संसार ओढण्यासाठी म्हणून महिन्याची मनीऑर्डर करून उरलेल्या तुटपुंज्या पैशात आपला संसार चालवायचे. शिक्षक असून बाबांनी आपल्याला कधी शिकवल्याचं आठवत नाही. घरातल्या कुणाशी फार बोलतही नसत ते. पण कुणास ठाऊक का, बाबांचा वचक वाटायचा. कमी मरक मिळाले की, अपराधी वाटायचं. यातच कधीतरी अभ्यासाला लागलो,  झपाटल्यासारखा. दहावी-बारावीत मिळवलेल्या गुणांचं साऱ्यांनी कौतुक केलं आणि ते कौतुक करून घेण्यासाठी, गुणी मुलगा  म्हणून मिरवण्यासाठी अभ्यास करत गेलो. तेव्हा ध्येय वगैरे काही नव्हतंच. व्हीजेटीआयमध्ये प्रवेश मिळवला तेव्हा पहिल्यांदा बाबांच्या डोळ्यांमध्ये मला चमक दिसली. मी इलेक्ट्रिकल, मॅकेनिकल इंजिनीअर व्हावं, असं त्यांना वाटत असावं. त्यांनी ते कधी बोलून दाखवलं नाही, पण मी कॉम्प्युटर सायन्स निवडल्याचं कळल्यानंतर त्यांच्या कपाळावर आठी उमटली होती, हे आजही आठवतं.
कॉम्प्युटर सायन्स म्हणजे काय, असं बरेचजण विचारायचे. मला तरी ते कुठं सांगता येत होतं. काहीतरी नवीन, वेगळं, कॉम्प्युटरशी संबंधित अभ्यास इतकंच काय ते मला ठाऊक होतं. पण मग रमत गेलो त्या अभ्यासात.. कॉलेजातल्या वातावरणात..  डिग्री घेतली तेव्हा आई-बाबांना मला नोकरी मिळेल का, याची चिंता वाटत होती, तीही मिळाली. आई-बाबा निवांत झाले. सहा महिन्यांत मला परदेशवारी करायची संधी मिळाली, तेव्हा आई-बाबांचे डोळे विस्फारले. आयटीची बूम आली. पगार चौपट वाढले. आयटीतले पहिल्या पिढीचे म्हणून बाकीचे मान देऊ लागले आणि मी नाक वर करून चालू लागलो. दोन वर्षांत लालबाग सोडलं आणि अंधेरीला फ्लॅट घेतला तेव्हा आई-बाबांनी काही न बोलता जणू घरातल्या कर्त्यां पुरुषाची जागा माझ्याकडे सुपूर्द केली. आईबापाचं नाव राखणारा मी जणू त्यांचा गुडबॉय बनलो होतो. माझ्यासाठी पैसा, मान यापेक्षा महत्त्वाचं ठरणारं हे स्थान मला देऊ केलं ते माझ्या या आयटी क्षेत्राने.’

..पवईतल्या नेहमीच्या ट्रॅफिक जॅममधून आपली सॅन्ट्रो हाकणाऱ्या समीर राजाध्यक्षला अगदी हतबल वाटत होतं. या ट्रॅफिकपासून नोकरीच्या ठिकाणच्या बिनकामाच्या काही चेहऱ्यांपर्यंत साऱ्यांची आलेली मनस्वी चीड त्याला थेट अमेरिकेपर्यंत पोहोचवत होती. उगाच आलो परत, त्याला पुन्हा एकदा वाटून गेलं.
आयआयटीतून डिग्री घेतल्यानंतर आयटी क्षेत्रात काहीतरी क रून दाखवावं, म्हणून सहकुटुंब अमेरिकेला प्रस्थान केलेला समीर सात वर्षांनी नॉस्टेल्जिक होऊन म्हणा किंवा तिकडे जाऊन फार दिवे नाही लावता येत, याची खातरजमा झाल्यामुळे म्हणा, मायदेशात परतला. माघारी परतताना ‘इथेच का नाही करू शकत आपण तेच सारं..?’ ही  जिद्द त्याच्यात कुठेतरी शिल्लक होती. इथल्या व्यवस्थेत राहूनही आपले काही मित्र, मैत्रिणी, नातेवाईक ‘काहीतरी’ करत आहेत, हे बघून आपणही भारतात तग धरू, असा कुठेतरी विश्वासही त्याला वाटत होता. पण इथे आल्यावर त्याला पुरतं कळून चुकलं, इथल्या आयटी कंपन्यांतही तिथल्यासारखीच गुलामगिरी चालते. जे तिथे तेच इथे. इथे परत यायला त्याची बायकोही राजी नव्हती. तिथलं लाइफ एन्जॉय करण्यापेक्षा इथं परतण्याची दुर्बुद्धी त्याला सुचली, म्हणून त्रागा करत होती. परत आल्यानंतर ‘उगाचच आलो,’ असं त्याला कित्येकदा वाटलं. मग नोकरी सोडून स्वत:चं काहीतरी करावं, म्हणून तो झटत राहिला आणि कित्येकदा आपटी खात राहिला. गाठीशी असलेले पैसे संपत आले तेव्हा भानावर आला आणि कॅलक्युलेटेज रिस्क घेत पुन्हा कामाला लागला. स्वत:ची कंपनी काढण्याचं भूत उतरलं आणि दुसऱ्या कंपन्यांच्या असाइनमेन्ट पूर्ण करीत बायको-पोरासाठी तो कमवू लागला. आजही त्याचं मन तिथे आणि इथे या कात्रीत सदैव हिंदोळे घेत असतं. तिथे असताना तो इथला विचार करायचा आणि आता तिथला करतोय. इथला भ्रष्टाचार, ट्रॅफिक, साध्या साध्या गोष्टींत जी टक्कर द्यावी लागते, त्याने तो हैराण होतो. पण सवाई गंधर्वची मैफल प्रत्यक्ष ऐकतो, गिरगावच्या जुन्या आळीतनं फिरतो, शाळा- कॉलेजातले मित्र जेव्हा भेटतात, नातेवाईकांना भेटणं होतं तेव्हा त्याला वाटतं, बरं झालं- इथं आलो. तो सांगतो- ‘अमेरिकेतल्या एकशे.. कितीतरीव्या मजल्यावरून खाली बघताना मजा वाटते, पण इथेच उभे राहणारे स्कायस्क्रॅपर बघताना अंगावर येतं, कारण त्या स्कायस्क्रॅपरच्या भोवताली दाटीवाटीनं चाळी उभ्या असतात. एक मात्र नक्की, कॅपिटॅलिझम (अमेरिका) पासून दूर जायचा प्रयत्न केला, पण कॅपिटालिझम माझ्या मागे पळत आला..’

अभय आणि समीर.. दोन्हीही समकालीन उदाहरणे.  आयटीने आपल्याला काय दिलं, याची उत्तरं या दोघांचीही वेगवेगळी असतील.. वेगळी, पण तितकीच खरी. या दोघांसारखे कित्येक सारे आज देश-परदेशातील बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये मोठाल्या पगारावर स्थिरावले आहेत. आयटीने काय दिलं, याचा विचार कळत-नकळत यातील प्रत्येकजण जेव्हा कधी करतो तेव्हा त्याला बऱ्याच गोष्टी सापडतात, काही निसटून गेल्यासारख्या वाटतात.. आयटीने अनेकांना गुणवत्तेवर संधी दिली. नवं जग दाखवलं. नवी जीवनशैली दिली. अपेक्षेपलीकडचा पैसा दिला. या सगळ्यासोबत असुरक्षितताही दिली. कामाचे तास वाढवले नि कुटुंबासोबतचा वेळ कमी करायला लावला. सततच्या कामाने शारीरिक, मानसिक व्याधी मागे लावल्या. स्पर्धा, कामगिरीचे नवनवे निकष प्रस्थापित केले. आज मंदी या शब्दावर भीतीने भुवया उंचावण्याची वेळ आयटी क्षेत्रात काम करणाऱ्यांवर येत नाही. कारण या क्षेत्रात मंदीचे चक्र असते, काही वर्षांनी ती येते व जाते, हे त्यांना उमजलंय. आपल्या देशात राहून काम करणारी सुरुवातीची आयटीतली पिढी होत असलेल्या बदलांबाबत साशंक होती, पुरती गोंधळून गेली होती. आज ही पिढी वेगाने होणारे बदल अंगावर घेतेय.
असं असलं तरी, गेल्या २० वर्षांत असलेलं आयटीभोवतीचं वलय आज काहीसं कमी झालंय. याचं कारण या क्षेत्राचं नाविन्य आज कमी झालंय. याउलट काही वर्षांपूर्वी टिपिकल भारतीय वृत्तीनुसार अमूक एक ‘तुझ्याकडे नाही, माझ्याकडे आहे’ या वृत्तीतून ‘माझी मुलं अमेरिकेत आहेत,’ याचे गोडवे गाणारा पालकवर्गही होता. आणि मग आपली आतेभावंडं, मामे-मावसभावंड सारी अमेरिकेत आहेत, याचा एक दबाव त्या कुटुंबातल्या शिकणाऱ्या वयातील इतर मुले आणि त्यांचा पालकवर्ग नाहक ओढवून घ्यायचे. आज मात्र चित्र बरंच बदलतंय. म्हणजे आजही या क्षेत्रात नव्याने शिरलेल्या मुलांना लगेचच परदेशवारी करायची असतेच. मात्र काय करायचे, याबाबत त्यांच्या मनात कमालीची स्पष्टता असते.
शिक्षण घेतानाच कुठल्या कंपनीत नोकरी करायची, कुठलं काम करायचं, परदेशात कुठे जायचं याबाबत कमालीची स्पष्टता असते. त्या अनुषंगाने कुठला अभ्यासक्रम निवडायचा, कशात प्रावीण्य मिळवायचं, त्या आधारे करिअरमध्ये कुठवर पोहोचता येईल, परदेशात म्हणजे नक्की कुठल्या देशात जायचं या सगळ्याची माहिती, जाणीव आणि प्लानिंग मुलांच्या मनाशी पक्कं असतं.
आज उच्च शिक्षणासाठी वा आयटीतल्या नोकरीसाठी म्हणून अमेरिकेला जाणाऱ्या मुलांचं कोण ना कोण तिथे असतं. पूर्वी जाणवणारं एकटेपण आजच्या पिढीच्या वाटय़ाला तितकंस येत नाही. आपले मित्र, नातलग कुठल्या भागात आहेत, त्यानुसार ते कंपनीची निवड करतात. कुठल्या भागात भारतीयांची संख्या अधिक आहे, कुठे शाळा-विद्यापीठव्यवस्था उत्तम आहे, कुठल्या भागात शांतता नांदते, कुठले भाग राहण्यास जोखमीचे आहेत, या साऱ्याची माहिती तिथे जाण्यापूर्वी मुले करून घेतात. आणि मग पूर्ण तयारीनिशी तिथे गेल्यानंतर मित्र, तिथले दूरचे नातलग यांच्यात विस्तारित वा समांतर कुटुंबव्यवस्था शोधतात. त्यामुळे आज परदेशात स्थायिक होणारा ‘आयटी’यन हा कॅलक्युलेटेड रिस्क घेतो. तिथे इथल्यासारखं सोशल फॅब्रिक उभारलं जातं. स्वातंत्र्यदिनाची परेड होते. सण साजरे होतात. नाटकं पाहिली जातात. बॉलिवूडच्या फिल्म्सचे फर्स्ट डे फर्स्ट शो तिथेही होतात. इंडियन रेस्तराँ मोठय़ा प्रमाणात असतात. भारतीय मसाले, सणासुदीला केले जाणारे गोड पदार्थ तिथे सहज उपलब्ध असतात. सोशल नेटवर्क वा इंटरनेट, फोनवरून असाल तिथून मायदेशातल्या आपल्या माणसांशी ते संपर्क साधू शकतात. या सगळ्यात परदेशी गेलेल्या मुलांचे आई-बाबा मुलांच्या निर्णयाचे समर्थन करताना दिसतात. इथे-आपल्या देशात स्ट्रगल करत बसण्यापेक्षा आपल्या मुलाचं चांगलं होतंय, म्हणत स्वत:च्या मनाला समजावतात.
आपल्या देशात आयटीचं बस्तान नुकतंच बसत होतं, त्यावेळेस इथे- आपल्या देशात राहून आयटीतल्या नोकरीचे पर्याय निवडताना एक काळ असा होता, की या क्षेत्राशी निगडित साऱ्या प्रक्रिया आकार घेत होत्या. तेव्हा एखाद्या व्यक्तीच्या (तो हिरो मानला जायचा) बळावर कामं व्हायची. आज मात्र आपल्याकडच्या आयटी क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या विविध व्यवस्था, प्रक्रिया या प्रगल्भ झाल्या आहेत, आकारास आल्या आहेत. त्यामुळे एकदा का त्या कंपनीत रुजू झालं की, आपोआपच त्या व्यक्तीची प्रगती अपरिहार्यपणे होऊ लागते.
आज आपल्याकडच्या आयटी कंपन्यांचा विस्तार वाढलाय. कुठल्या गोष्टींवर किती खर्च करायचा, कुठल्या स्पर्धेत उतरायचे, खर्चाचे व्यवस्थापन कसे करायचे, या साऱ्या गोष्टी ते स्वत:च्या बळावर पार पाडत आहेत. इन्फोसिस, विप्रो, कॉग्निझंटसारख्या कंपन्यांची देश-परदेशात त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी वा प्रशिक्षकांसाठी त्यांची स्वत:ची अत्याधुनिक अतिथीगृहे आहेत. त्यामुळे कामासाठी बाहेर गेलेल्या कंपनी कर्मचाऱ्यांची तिथे निवासाची सोय होते आणि उंची हॉटेलांमध्ये त्यांची व्यवस्था करण्याचा कंपनीचा खर्च यामुळे वाचतो.
आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी की, आयटीचं शिक्षण आणि कार्यक्षेत्र या दोन्ही गोष्टी आज समीप आल्या आहेत. आयटीचं शिक्षण देणारी महाविद्यालये आणि आयटी कंपन्या यांच्यात आतापर्यंत कमालीची तफावत असल्याकारणाने आयटी उद्योग क्षेत्राच्या गरजा आणि प्रत्यक्ष शिक्षण यात आता-आतापर्यंत कुठलीच साम्यस्थळे नव्हती. आज मात्र हे चित्र सकारात्मकदृष्टय़ा बदलताना दिसतंय. आज राष्ट्रीय पातळीवर वर्षांकाठी साडेपाच लाख विद्यार्थी अभियांत्रिकीची पदवी मिळवतात. मात्र, त्यात आयटी विद्याशाखेतील विद्यार्थी २५ टक्केच आहेत. आणि आयटी-बीपीओ क्षेत्राशी निगडित नोकरी लगेचच करू शकतील, अशी कौशल्ये प्राप्त असणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारीही १५ टक्केच आहे, असे ‘नासकॉम’च्या एप्रिल २०११ सर्वेक्षणाची आकडेवारी सांगते. हे चित्र बदलण्यासाठी आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांनी पुढाकार घेतला आहे. ‘विप्रो’सारखी कंपनी आयटी उद्योग क्षेत्राची नेमकी गरज ओळखून अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापकांसाठी प्रशिक्षणवर्ग आयोजित करते. त्यांचा हा सारा प्रकल्प ‘ना नफा’ तत्त्वावर राबवला जातो, हेही आवर्जून नमूद करायला हवं. आयटी शिक्षणपद्धती ही उद्योगक्षेत्रातील गरजांनुरूप कशी होईल, याबद्दल ते विशेष आग्रही आहेत. प्राध्यापकवर्गाचे प्रशिक्षण घेताना, हुशार मुलांना हेरून त्यांना शिष्यवृत्ती देताना, मुलांसाठी इंटर्नशिप आयोजित करताना आगामी काळात या कंपन्या स्वत:च्या स्वायत्त शिक्षणसंस्था काढण्याकडे वळतील,  याची चिन्हे सुस्पष्ट आहेत.
‘नासकॉम’च्या सर्वेक्षणानुसार, आपल्या देशातील आयटी व त्याच्याशी संलग्न उद्योगांची निर्यात २००८ मध्ये ४१ अब्ज अमेरिकी डॉलर्स होती. ती २०११ साली ६९ अब्ज अमेरिकी डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे. या आकडेवारीनुसार, देशात आयटीमध्ये नव्याने निर्माण होणाऱ्या २८ लाख थेट नोकऱ्या आणि ८९ लाख या क्षेत्राशी संबंधित नोकऱ्या निर्माण होतील, असे भाकित वर्तवण्यात आले आहे.
अमेरिकेहून भारतात परतणाऱ्या आयटीयनचं अप्रूप वाटणं आता सरलंय. तिथल्यासारखी जीवनशैली आज इथे उपलब्ध होऊ शकते. तिथल्याइतके नसेल तरी भरभक्कम वेतनही आपल्या देशात मिळू शकते. आणि हे सारे आपल्या माणसांत राहून अनुभवता येते, हे सारे आडाखे मांडत अमेरिका-युरोपात गेलेला आयटीयन आज मायदेशात परततोय. त्याच्या या निर्णयाला इतरही कंगोरे आहेत. ते असे की, आयटी व्यावसायिकांना अमेरिकेत दहा-दहा र्वष केवळ प्रोग्रामर म्हणून काम करताना तोचतोचपणा तर वाटतोच, शिवाय पदोन्नतीही मिळते, असे नाही. याउलट, भारतात मात्र आयटी नोकऱ्यांमध्ये ठराविक वर्षांत ठराविक टप्पे गाठणं त्या व्यवसायात शिरलेल्यांना शक्य होतंय. नोकरीच्या चार वर्षांनंतर चारजणांच्या संघाचे नेतृत्व करणे, आठ वर्षांनी प्रोजेक्ट लीडर म्हणून भूमिका बजावणे, दहा वर्षांत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून सूत्रे हाती घेणे शक्य बनले आहे. आज आयटीयनला मायदेशात परतण्यासाठी इथली तंत्रज्ञानाची वाढ, तंत्रज्ञानदृष्टय़ा आपल्याकडे आलेली प्रगल्भता हेही कारणीभूत  आहे. आयटी पब्लिकचं इथे परतणं हे इथले व्यवहार, बांधिलकी, जबाबदारी, मूल्यव्यवस्था, अनुभव यातही झिरपत आहे.
आज आयटी क्षेत्राने त्यात काम करणाऱ्या व्यावसायिकांना आणि त्यांच्या कुटुंबांना आता-आतापर्यंत अशक्य वाटणारी जीवनशैली दिली. आपल्या माणसांत राहून पैशाच्या जोरावर वरच्या स्तरातील जीवनमान अनुभवण्याची संधी त्यांना आयटी क्षेत्रातील वेतन देऊ करतं. आणि नोकरीच्या ठिकाणाच्या जवळपास आलिशान अशा संकुलात घर घेतलं जातं. ज्यात शाळा (त्याही इंटरनॅशनल बोर्डच्या), मॉल, रुग्णालय, क्लबहाऊसेस असं सारं काही असतं. यामागची संकल्पना अशी की, मुळातच ऑफिसमध्ये अधिक वेळ देणे भाग असताना प्रवासात वेळ दवडायला लागू नये. पण यातून आयटीवाल्यांचं सामाजिक क्षेत्र आपोआपच संकुचित बनतं. प्रवास वाचतो. जवळच असलेल्या मॉलमध्ये आठवडय़ातून एक चक्कर टाकली आणि भाजीसकट हवे ते सामान गाडीतून आणून घरी टाकलं, की ते आठवडाभर पुरतं. हो, स्वत:ची गाडी घेणं आलंच आणि नुसती गाडी असून भागत नाही तर मोबाईलसारखंच- ती गाडी कुठल्या कंपनीची आणि किती अद्ययावत मॉडेल आहे, यावर त्यांचं स्टेटस ठरतं. आज आयटी क्षेत्रात उच्च पदस्थ महिलांची मुलं आजी-आजोबांकडे वाढतात. मुलांच्या वाढीतील समस्या आजी-आजोबा निकालात काढतात.
इथल्या आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या मुलांचे वाढते वेतन, उंची जीवनशैली या सगळ्यात सर्वाधिक तोडमोड होतेय ती मूल्यव्यवस्थेची! आधीच्या पिढीकडे एक प्रकारचं शहाणपण, तारतम्यभाव आहे, असं आता-आतापर्यंत मानलं जायचं. त्यामुळे घरातला कर्ता पुरुष- बऱ्याचदा त्या घरातील वडील असायचे, त्यांच्यापाशी मुलांच्या स्वप्नांना प्रसंगी वेसण घालायचा अधिकार असायचा. आज मात्र मुलांच्या भरगच्च पगाराची रक्कम पाहिली की, आई-बाबांची छाती दडपून जाते. त्यांना वेळप्रसंगी कानपिचक्या देण्याचा अधिकार आजच्या बाबांनी गमावला आहे. एका अर्थाने बापपिढी उखडली जातेय आणि त्यांचं कर्ता म्हणून असलेलं अस्तित्वच धोक्यात आलंय. आज आयटी वा संबंधित क्षेत्रात वावरणारी मंडळी वयाच्या तिशीतच लौकिकार्थानं इतकं काही मिळवतात की, त्याचं काही चुकतंय, हे सांगण्याची घरातल्या मोठय़ांची छाती होत नाही. आपण निवृत्त होताना जी रक्कम हाती आली, ती आणि मुलांचा महिन्याचा पगार यातली तफावत बाबामंडळींना गप्प बसायला भाग पाडतेय. मुलांनी घेतलेली मोठाली घरं, त्यासाठी घेतलेल्या कर्जाच्या इएमआयची भरभक्कम रक्कम, रेल्वे-विमानाच्या बुकिंगपासून बिलं आणि बँकेची कामं एका क्लिक्वर करण्याचा त्यांचा उरक पाहून आधीची पिढी विस्मयचकित होते. आपल्या पोराबाळांना मिळालेलं यश, त्यांची मोठाली घरं, पॉश गाडय़ा हे सारं आई-बाबांना सुखावतं, पण त्यासोबत काळजीची एक अदृश्य रेघही त्यांच्या चेहऱ्यावर असते. मुलांच्या जगण्याचा भयानक वेग आधीच्या पिढीला पेलवत नाही. मुलं आपल्या आणि त्यांच्या मुलांच्याही वाटय़ाला कमी येतात, हे त्यांना डाचतं. सुबत्ता आहे, पण खायला- झोपायला मुलांना वेळ नसतो, हे त्यांना खुपतं. सारं काही पैशानं विकत घेता येतं, हा मुला-सुनेचा अ‍ॅटिटय़ूड त्यांना त्यांच्या दिनक्रमातील प्रत्येक गोष्टीतून दिसतो. आणि ते गप्प-गप्प होतात. खरंच, आज आयटी आणि तत्संबंधित क्षेत्रातील लोकांच्या जगण्याचा वेग त्यांचा त्यांनाच पेलवत नाहीए. आणि मग त्या अनुषंगाने सारेच प्रश्न केवळ त्यांच्यासमोरच नाही, तर समाजासमोर उभे राहत आहेत. मग तो त्यांच्या आरोग्याचा प्रश्न असो वा नातेसंबंधांचा!
कॉम्प्युटरवर बराच वेळ बसून काम करणे या क्षेत्रात अपरिहार्य असते. याचे शरीरावर भयानक परिणाम होत आहेत. बसल्या जागचे काम, कामाच्या विचित्र तासांमुळे कंपन्यांची जा-ये करण्यासाठी बससेवा यामुळे तिथे काम करणाऱ्यांच्या हालचाली मंदावतात. रात्रपाळीमुळे खाण्याच्या वेळा बदलतात. बीपीओसारख्या क्षेत्रात रात्री जागे राहिल्याने खाणे वाढते. या सगळ्याचा चयापचयावर परिणाम होतो, या सगळ्यामुळे आयटीत काम करणाऱ्यांमध्ये स्थूलत्व वाढू लागले आहे. एका जागी बसून कॉम्प्युटरवर तासन् तास काम केल्याने त्यांना मानदुखी, पाठदुखी जडू लागली आहे. कामाच्या भयानक तणावामुळे आणि अनियमित जीवनशैलीमुळे त्यांच्यातील प्रतिकारक्षमता कमी होऊ लागली आहे. लैंगिक संबंधांविषयीच्या समस्या वाढू लागल्या आहेत. यासंबंधित प्रकाशित झालेल्या अहवालांतून समोर आलेले निष्कर्ष विचारात घेण्याजोगे आहेत. आयटीत काम करणाऱ्या पुरुषांमधील नपुंसकेत वाढ होतेय, शुक्राणूंची संख्या (स्पर्म काऊंट) घटत असल्यावरही अनेक सर्वेक्षण अहवालांनी प्रकाश टाकला आहे. आरोग्याची स्थिती ऐरणीवर आली असताना मग उतारा म्हणून ही मंडळी पुन्हा फिटनेस वाढविण्यासाठी नामवंत जिमचे वर्षभराचे सदस्यत्व घेतात. प्रत्यक्षात मात्र तिथे जाण्यासाठी कितपत वेळ काढला जातो, हा भाग अलाहिदा! आणि मग वजनातील वाढ आटोक्यात आणण्यासाठी भरपूर पैसे लागणाऱ्या बेरिअ‍ॅट्रिक सर्जरी, लायपोसक्शनचा आधार घेणाऱ्या युवक-युवतींची संख्या आज आयटी क्षेत्रात लक्षणीय आहे. ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणाच्या पल्याड जातात, त्यावर उपाय म्हणून तंत्रज्ञानाचे नवनवे पर्याय आपण शोधतो, हेच यातून स्पष्ट होते.
अत्यंत तणावात, ऑफिसच्या वेळांपलीकडे पोचत काम करायचे, भरगच्च पगार घ्यायचा आणि मग त्यानुरूप सुखवस्तू जीवनशैली अंगिकारायची. आणि मग वर्षांतून एकदा-दोनदा अत्यंत आरामदायी सुटी व्यतीत करण्यासाठी सहकुटुंब परदेशात रवाना व्हायचं! मुलांना श्रीमंती थाटातील परदेशवारी घडवून आई-बाबा म्हणून कर्तव्य बजावल्याच्या आनंदावर काही काळ तरंगायचं, हा आयटीतील अनेक पालकांचा आज अजेंडा बनला आहे. सुटी घेऊन घरी काय बसायचं, हा प्रश्न विचारणारे ‘बिझी’ पालक आज आयटीत खोऱ्याने सापडतील. अर्थात, आठवडय़ाचे पाच दिवस झोकून काम केल्यानंतर शनिवार – रविवार फक्त कुटुंबाला देणाऱ्याही अनेक महिला आयटीत आहेत; ज्या सासवांशी जमवून घेतात, स्वत:चा करमणुकीचा वेळ कमी करून मुलांना देतात. आज इतर अनेक क्षेत्रांतील पालकांप्रमाणेच आयटी क्षेत्रात वावरणारे आई-बाबा त्यांच्या मुलांच्या वाटय़ाला कमी येतात. आयटी व्यावसायिकांसाठी मुलांसमवेत घरी वेळ व्यतीत करणं ही संकल्पना  बाद ठरते. मात्र, हे टेक्नोसॅव्ही आई-बाबा जगाच्या पाठीवर कुठेही जायचं ठरलं तरी दोन मिनिटांत नेटवरून सारी माहिती मिळवतात आणि एका क्लिकने प्रवासाचं पुढचं प्लानिंग करतात. ते बाळगत असलेल्या गॅजेट्समुळे, पर्यायाने तंत्रज्ञानाने हे आज त्यांना हे शक्य होतं. आज ऑफिसमध्ये असतानाही वेब कॅमेऱ्याने आपली मुलं घरी काय करतायत, यावर हे आई-बाबा नजर ठेऊ शकतात. घरी येण्यापूर्वी एसी सुरू करू शकतात. स्वयंपाकाच्या बाबतीत तर क्रांतीच घडली आहे. तंत्रज्ञानाने उपलब्ध झालेल्या अनेक सुविधांच्या सहाय्याने आज स्वयंपाक होतोय. हे तंत्रज्ञान आणि रेडी टु इटचे जिन्नस यामुळे खाणं बनवण्यासाठी लागणारा वेळ आणि मेहनत कमी झाली आहे.
एकूणातच आज खाण्यातील इन्स्टंट फूडसारखं हरेक बाबतीत ‘इन्स्टंट प्लेजर’ क्लिक होणाऱ्यांमध्ये आयटीतल्या आजच्या पिढीचे प्रतिनिधी मोठय़ा संख्येने आहेत. मग ते इन्स्टंट प्लेजर अमूक एकाशी वा एकीशी जडलेल्या नातेसंबंधांविषयी असेल किंवा लैंगिक सुखाबाबत असो, क्षणभंगूरतेत सुख उपभोगणं त्यांना गरजही वाटते आणि कदाचित स्टेटसही!
दुर्दैवाने आज आपल्याकडे पैशावर व्यक्तीचं कर्तृत्व मोजलं जातं. तो अथवा ती काय काम करते, यापेक्षा ते किती पैसा मिळवतायत, यावर मान दिला जातो. आज स्मार्टफोन वापरणं, अमूक एका कंपनीचा अद्ययावत लॅपटॉप वापरणं ही प्रतिष्ठा वा आत्मसन्मानाची व्याख्या ठरतेय. आणि जर का आत्मसन्मानाची व्याख्या बदलते, तर मूल्यव्यवस्था बदलली तर त्यात गैर ते काय? म्हणूनच की काय, विवाहबाह्य़ संबंधांतून आनंद मिळणाऱ्या व्यक्ती सापडतात. उच्चभ्रू निवासी संकुलांत इंटरनॅशनल स्कूलमध्ये खेळणारी मुलं, स्टेट बोर्डाच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांना खेळायला घेत नाहीत. आणि त्यांच्या आई-बाबांना यात वावगं वाटत नाही, असंही दृश्य पाहायला मिळतं.
आता-आतापर्यंत केवळ चित्रपटसृष्टी आणि प्रसारमाध्यमांमधील व्यावसायिक हे ‘क्रेझी अवर्स’मध्ये काम करायचे. आज आयटी आणि त्याच्याशी संबंधित क्षेत्रातील व्यक्तींना कामाचा आडनिडय़ा वेळा अपरिहार्य बनल्या आहेत. आणि मग याच्याशी सुसंगत ठरणाऱ्या समांतर व्यवस्था निर्माण होत आहेत. मग त्या कुटुंबव्यवस्थेची झालेली तोडमोड असो वा मूल्यव्यवस्थेशी झालेली पडझड असो. आज आयटीसारख्या क्षेत्रातील व्यक्तींना जिथे कामासाठी भरपूर वेळ द्यावा लागतो, तिथे ते इतर गोष्टींसाठी वेळ कशाला, कसा आणि का काढणार? ‘इन्स्टंट प्लेजर’च्या जमान्यात काही कालावधीने जो परिणाम दिसेल, अशा गोष्टींमध्ये वेळ गुंतवण्याची तोशीस ते करत नाहीत. मग ती पालकत्वाची जबाबदारी असो वा इतर नातेसंबंधांची जपणूक. पैसा फेकल्यावर सेवा विकत घेता येतात, याचा ठाम विश्वास यामागे डोकावताना दिसतो.
कामाचा जो टोकाचा ताण आयटी, बीपीओ क्षेत्रातील व्यक्तींना आहे, तो घालविण्यासाठी पुन्हा ते टोकाचा मार्ग अवलंबतात. आलेला ताण खाण्या-पिण्यात, पब्जमध्ये थिरकून घालविण्याचा प्रयत्न करतात. उशिरापर्यंत चालू राहिलेल्या कामानंतर त्यांना लगेचच घरीही जायचे नसते. भरपूर काम केल्यानंतर आलेला ताण जिरवण्यासाठी त्यांना पबमध्ये, डान्स बारमध्ये जाण्याची नितांत गरज वाटते. तो ‘अवकाश’ त्यांना हवाहवासा वाटतो. कारण घरी परतल्यानंतर पुन्हा त्यांच्यावर मुलांचे अभ्यास, इतर जबाबदाऱ्या कोसळणार असतातच.
कॅम्पस इंटरव्ह्य़ूनंतर लगेचच मिळणारा रग्गड पगाराचा जॉब, गेल्या पिढीपेक्षा या पिढीवर तुलनेने कमी असलेल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या, यामुळे मिळणाऱ्या पैशाची बचत करण्यापेक्षा हा युवावर्ग त्यातून जीवनमान विकत घेऊ पाहतो. आणि मग ते उच्चस्तरीय जीवनमान राखण्यासाठी त्यापाठोपाठ येणारा बाकीचा सोशल पॅटर्न आपोआपच येतो. त्यात पार्टी कल्चर येते, सोशल ड्रिंकिंग येते, रिसॉर्ट संस्कृती, ठिकठिकाणी रुजलेली स्पा संस्कृतीही येते.
खूप स्ट्रगल न करता लगेचच मिळालेली नोकरी, मोठय़ा आकडी पगारामुळे बदललेलं जीवनमान क्षणात बदलू शकतं, हे आयटीतल्या नव्या पिढीला कळलं ते अलीकडे उद्भवलेल्या आर्थिक मंदीमुळे.. तेव्हा ही पिढी मुळापासून हादरली. विभक्त कुटुंबपद्धतीने कुटुंबीय, नातलगापासून काहीसे लांब गेलेल्या या पिढीला घरटय़ाच्या ऊबेची निकड जाणवू लागली. आई-बाबांचे उपासतापास नि तासन् तास चाललेल्या कर्मकांडावर आक्षेप घेणारी ही पिढी वेगवेगळे गुरू, बाबा, गंडेदोरे नि साधनेचे आधार शोधू लागली.. कारण तोपर्यंत आपल्या गरजांचं रेशनिंग करण्याची वेळ त्यांच्यावर कधी आलीच नव्हती. त्यांनी ना कुठलं युद्ध अनुभवलं, ना आणीबाणी. वाढताना कुठल्याही मोठय़ा सामाजिक राडय़ाला त्यांना आजपर्यंत सामोरं जावं लागलं नव्हतं.
मंदीच्या भोवऱ्यातून बाहेर पडल्यानंतर आज आयटी क्षेत्र स्थिरावलंय. प्रगल्भ झालंय. आयटीतल्या वेतनाच्या भरभक्कम पॅकेजेसमुळे आजच्या आयटीयनचं जीवनमान मात्र ढवळून निघतंय. कामाच्या अडनिडय़ा वेळा आणि मग त्याच्याशी सुसंगत ठरणाऱ्या समांतर व्यवस्था निर्माण होत आहेत. येत्या काही वर्षांत जीवनमानातील हे बदल अधिक विस्तारतील.
समागमाशिवाय मूल जन्माला घालण्यासारखे  मूल्यव्यवस्थेतील बदल  येत्या काही वर्षांत वाढतील. सोशल नेटवर्किंगमधील अ‍ॅक्टिव्हिटीज् विस्तारतील. भोवताली घडणाऱ्या सामाजिक घटनांबद्दल संवेदनशील असणं, लोकांना भेटणं, समूहाशी जोडलं जाणं या सगळ्या गोष्टींसाठी बाहेर जाण्याची गरज भासणार नाही. वेळ आणि अंतराची कमतरता तंत्रज्ञान भरून काढेल. स्वत:चा अवकाश, स्वत:चं स्वातंत्र्य जपणारी ही व्यक्तिवादी पिढी उतारवयातील एकटेपणाला सामोरं जाण्यासाठीही मानसिकदृष्टय़ा तयार असेल. कामाच्या वेळांमध्ये लवचिकता येईल. आयटी क्षेत्रात कंत्राटी पद्धतीने सेवा पुरविणाऱ्या संस्थाही नजीकच्या भविष्यकाळात वाढतील. स्वायत्तरीत्या काम करणारे, सेवा पुरवणारे फ्रीलान्सर्सही वाढतील. बँकिंग, शॉपिंगसारखी आणखीही बरीच कामे ऑनलाइन होऊ शकतील. प्रत्यक्ष भेटणे शक्य नसल्याने चॅट रूमचा वापर वाढेल. मात्र, हे सारे बदल होताना मूळाकडे परतण्याचा केविलवाणा प्रयत्नही होईल.. म्हणजे असा प्रयत्न आता सुरू झालेलाच आहे. शाळेचे रीयुनियन अर्थात माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन, सणांना गावाकडे जाणारी नवी पिढी, यातून त्यांचं हे परतणं काही अंशी दिसूनही येतं.
आज देशातील आयटी पिढीने आयटीचा झंझावात अंगावर घेतला आहे, त्या अनुषंगाने येणारे बदल त्याने आत्मसात केलेत, पचवलेत आणि ते पुढे सरकतायत. या आयटी पिढय़ांचं पुढे काय होईल, याबद्दल विचार करताना या क्षेत्रातली मंडळी म्हणतात, ‘आमचं मल्टिटास्किंग वाढेल. गेलेल्या काळाकडे मागे वळून बघण्यासाठी, आठवणींनी सुखावण्यासाठी वा कातर होण्यासाठीही कुणाकडे वेळ नसेल. कुठल्याही गोष्टीवर लगेचचा उतारा शोधला जाईल. म्हणजे काय तर, फिटनेस हवाय तर पॉवर योगा करा. मोबाइलचा वापर वाढेल आणि त्यामुळे रेडिएशनही.’
समूहाची मानसिकता हा समाजव्यवस्थेचा घटक असतो. व्यक्तींची मूल्यं जशी बदलतात, तसा समाजही बदलतो. तंत्रज्ञानातील प्रगती आणि त्यामुळे समाजातील उंचावलेले जीवनमान हा क्रांतिकारी बदल अमेरिकेने काही दशकं.. शतकं अनुभवला. आपल्याकडे मात्र ही प्रगती आणि त्यामुळे झालेले समाजबदल अवघ्या काही वर्षांत झाले. तंत्रज्ञानाच्या विस्तारानंतर खूप कमी कालावधीत समाजातील स्तर झपाटय़ाने बदलत गेले. जेव्हा समाजात कमी कालावधीत वेगाने बदल होतात, तेव्हा मूल्यव्यवस्था काहीशी बॅकसीटवर जाते. आयटीमुळे आपल्याकडे आज नेमकं हेच होतंय.