परस्परांना समजून घेणं, परस्परांचं अंत:करण ओळखणं, कित्येकदा ‘शब्दाविण संवादु’ घडणं हे सहजीवनाचं गमक असतं असं मला कायम वाटत आलंय. जर या गोष्टी सहजीवनात नसतील तर ते कसलं सहजीवन? पती-पत्नींच्या संदर्भात तर ते अधिकच महत्त्वाचं! पण अनेकदा असं होत, की वैवाहिक सहजीवनाचा आनंद लुप्त होऊन ती एक अटळ, असहाय व अपरिहार्य अशी जीवनशैली बनत जाते. अशावेळी ‘लिव्ह-इन् रिलेशनशिप’ किंवा विवाहबाह्य़ सहजीवनाची आवश्यकता लक्षात येते. इथं वैवाहिक जीवनाची बंधनं नसतात; पण गरज असते ती मनाच्या संवेदनांनी परस्परांशी जखडण्याची!
माझी आणि माझ्या जोडीदारीणीची पहिली भेट होण्यापूर्वी माझं शिक्षण संपलं होतं; करिअरची सुरुवात होती. नुकताच माझा माझ्या मत्रिणीबरोबर ब्रेकअप् झाला होता. आम्ही लग्न करणार होतो, पण ते झालं नाही. ही घटना मला उद्ध्वस्त करून गेली. याचदरम्यान माझ्या कॉलेजमधील एक गट आंतर-महाविद्यालयीन स्पध्रेमध्ये इंग्रजी नाटकात भाग घेत होता. त्यातील मुलींना कुणी मदत करणारं नव्हतं. मी मदतीचा हात पुढे केला. स्पर्धा संपली. तोवर आमची छान मत्री झाली होती. त्यातल्या ‘तिनं’ विचारलं, ‘आता आपण कधीच भेटणार नाही का?’ तिच्या बोलण्यातून, नजरेतून माझ्या लक्षात आलं, की ती माझ्यात गुंतली आहे. पण माझा लग्नसंस्थेवरचा विश्वास उडाला होता. माझ्या फिश फार्मचं सेटअप् सुरू होतं. भविष्यात अंधार दिसत होता. हे तिला माहीत होतं. तरी तिला माझ्यासमवेत राहायचे होते. मलाही समजून घेणारं, आधार देणारं कुणी हवं होतंच. पण मन आणि खिसा- दोन्ही त्यासाठी तयार नव्हते. तेव्हा तिच्याकडूनच ‘लिव्ह-इन्’मध्ये राहण्याचा प्रस्ताव आला. तिच्या आईला तर तो मान्यच नव्हता, वडिलांनी विचारलं, ‘तुम्हाला उद्या मुलं झाली तर त्यांचं काय? समाज त्यांना तुच्छतेनं वागवेल.’ आम्ही त्यांना उत्तर दिलं की, ‘हा तुमचा दृष्टिकोन आहे. आमच्या मुलाबाळांचं आम्ही तेवढय़ाच आत्मीयतेने करू; ज्या आत्मीयतेने तुम्ही आमच्यासाठी केलेलं आहे.’ माझ्याही आई-वडिलांना ते पटलं नाही. पण घरच्यांचा विरोध पत्करून आम्ही एकत्र राहण्याचा निर्णय घेतला.
आमचं सहजीवन सुरू झालं. तिला अभिनयाची समज होती. मी तिला त्यात करिअर करायला सुचवलं. त्यादृष्टीने व्यक्तिमत्त्व कसं घडवता येईल, याबद्दलच्या टिप्स दिल्या. आम्ही तिचा पोर्टफोलिओ बनवला. त्यानंतर आम्ही दूरदर्शनवर एकत्र एक मालिका केली. आणि ती स्वत:च्या पायावर उभी राहत गेली. त्यावेळची एक गंमत! एका प्रसंगात तिला रडायचं होतं, पण तिला अजिबात रडू येईना. शेवटी मी तिला सर्वासमोर वाट्टेल ते बोललो. ‘माझं नाक कापलंस’,  म्हणालो, आणि ती घळाघळा रडायला लागली. त्या अश्रूंनी आमचं नातं अधिकच घट्ट झालं..
आम्ही जगत होतो. पशांची गरज निभावली जात होती. त्यादरम्यान एक हॉलिवूड फिल्म माझ्याकडे आली होती. पण ती माझ्या हातून निसटून चालली होती. तिच्याकडे व्यवस्थापनकौशल्य होतं. तिनं त्या लोकांबरोबर चर्चा केलीच; पण माझं मानधनही वाढवून घेतलं. माझ्यावर तिचा विश्वास होता.. आणि माझा तिच्या कौशल्यावर.
अर्थात याचा अर्थ आमच्या सर्वच आवडीनिवडी जुळत होत्या असं नाही. पण आम्ही सांभाळून घेत होतो. इतकं, की तिला पावभाजी खूप आवडायची; तर आठवडय़ातून चार दिवस पावभाजी खायचो. वॉिशग मशीन होतं. जो घरी वेळ देऊ शकेल तो कपडे धुऊन वाळत टाकायचा. कामवाली बाई होती; पण आम्ही एकत्र घर लावायचो. मी केलेला स्वयंपाक तिला आवडायचा नाही, पण ती खायची!  खरेदी करणं हा आमच्या आवडीचा भाग होता. तिच्याजवळ सुरुवातीला पसे नसायचे. तेव्हा ती हक्काने माझ्याकडून मागून घ्यायची. मी तिच्यासाठी सर्वप्रथम खरेदी केली होती ती जीन्स आणि डिझायनर शूजची. कसली खूश झाली होती! असं सगळं छान चाललं होतं..  दोन अडीच वष्रे आमचं हे सहजीवन चालू होतं.
त्यादरम्यान तिचे आजोबा आजारी पडले. आम्ही त्यांना भेटायला गेलो. त्यांना आमचं असं ‘लिव्ह-इन् रिलेशनशिप’मध्ये राहणं आवडत नव्हतं. त्यांनी ते बोलून दाखवलं. त्यानंतर ते लगेचच वारले. त्यांच्या इच्छेला मान द्यायचा म्हणून आम्ही लग्न केलं.  
..आणि नंतर काहीतरी बिनसत गेलं. का, ते कळलं नाही. तिच्या स्वभावातले आत्तापर्यंत तीव्रतेने न जाणवलेले दोष जाणवू लागले. सांगूनही ती ते बदलायला तयार नव्हती. याचा परिणाम आमच्या नात्यावर होत गेला. अशाच काही गोष्टी- ज्या माझ्या भावनांना खोलवर दुखावणाऱ्या होत्या- घडत गेल्या. या सहजीवनापूर्वी माझ्या अनेक मत्रिणी होत्या. पण ‘लिव्ह-इन्’नंतर त्यांना मी दूर ठेवलं. परस्परांवरील विश्वास आणि निष्ठा मी महत्त्वाची मानली. पण हे फक्त माझ्या बाजूने. नात्याचा अर्थच नंतर नंतर कळेनासा झाला, इतके आमच्यात खटके उडायला लागले. आयुष्य ओझं व्हायच्या आधीच आम्ही निर्णय घेतला..  
आम्ही वेगळे झालो..  जगण्याचे नवे आयाम मिळवून!