हे अन्तरयामी। मम अन्तर विकसित करो
उज्ज्वल करो, निर्मल करो
कह दो सुंदर हे!
उद्यत करो, जागृत करो
कर दो निर्भय हे!
मंगल करो, निरापद करो
नि:संशय कर दो हे!
हे अन्तरयामी! मम अन्तर विकसित करो..
‘गीतांजली’तील या ओळी कोणाशी नाते सांगताहेत?
अज्ञात कालखंडातील, अज्ञात वनातील एखाद्या अनाम ऋषीच्या ऋचांशी? ज्ञानदेवाच्या पसायदानाशी? डेव्हिडच्या साम्स्शी? ‘विश्वाचे आर्त’ मनात प्रकटले की शब्दांची प्रार्थना होते. वरील ओळी शब्द-अक्षरांच्या पलीकडे जाऊन प्रार्थना बनतात. ‘हे अन्तरयामी..’ ही कविता एकाच वेळी इतकी आत्मनिष्ठ आणि वैश्विक कशी असू शकते? असे जेव्हा घडते तेव्हा त्या रचनेला ‘अपौरुषेय’ म्हणावे का? आपल्या वेद-उपनिषदांसारखे, लोकगीतं, सुफी गीतांसारखे?
रवींद्रनाथ हे असे आपल्या अनुभूतीचे सत्त्व कवितेतून, गाण्यांतून प्रकट करतात. पण वाचणारा स्वत:च्या भावभावना टिपत टिपत ती कविता वाचत जातो. रवींद्रांची कविता साऱ्यांची कविता होते.. ती प्रत्येकाची कविता बनते. जेव्हा एका कवीच्या रचना साऱ्यांच्या होतात, तेव्हाच त्यांना ‘अक्षर वाङ्मय’ म्हणतात. हे भाग्य रवींद्रांना लाभले.
भारतीय साहित्य परंपरा विलक्षण समृद्ध आहे. भारतातील विविध प्रदेश, विविध भाषा, विविध वैशिष्टय़ांनी समृद्ध झालेली संस्कृती, लोकजीवन, लौकिकासोबत पारलौकिकाची अनुभूती, येथे स्थापन झालेले, विकसित झालेले व बाहेरील जगतातून येऊन येथील प्रवाहात मिसळलेले धर्म व दर्शने, अनेकविध विद्याशाखा, असंख्य विचारप्रणाली, वेद, उपनिषदे, कृष्ण- बुद्ध- चार्वाक-शंकराचार्य यांच्या तत्त्वज्ञानापासून ते आजच्या तंत्रज्ञानापर्यंत झालेला भौतिक, सामाजिक, सांस्कृतिक विकास या साऱ्यांचे यथार्थ प्रकटीकरण भारतीय साहित्य करत आलेले आहे. भारतीय साहित्य परंपरा वेद- उपनिषदे- महाकाव्ये यांपासून ते आजच्या उत्तराधुनिक साहित्यापर्यंत चालत आलेले आहे.. सर्जनशील साहित्यकारांच्या साहित्यकृतींनी समृद्ध होत आलेले आहे. या परंपरेतील आधुनिक, तरीही ऋषितुल्य कवी म्हणजे रवींद्रनाथ टागोर.
भारतीय साहित्यात आजवर रवींद्रनाथांसारखी अलौकिक, विविधांगी साहित्याची भर क्वचितच कुणी घातलेली असावी. या योगदानामुळेच अखिल विश्वात रवींद्रनाथांची ओळख भारतीय संस्कृतीचे एक र्सवकष प्रतीक म्हणून निर्माण झाली.
रवींद्रनाथ मूलत: कवी म्हणूनच ओळखले जातात. कारण अगदी स्वाभाविक आहे : रवींद्रनाथ ज्याला स्पर्श करतात तो विषय, तो शब्द काव्यात्म होतो. उदाहरण सांगायचे म्हणजे ‘रात्रभर मी ऐकत होतो, पहाटे सर्व येणाऱ्या आशेच्या पावलांचा आवाज’ किंवा ‘किनारा विचारी सागराला, अर्थ लाटांच्या खळबळीचा’! रवींद्रनाथांची कविता हा एक मानवी हुंकार आहे. जे जे मानवी असते, ते वैश्विक असते. रवींद्रनाथांच्या काव्यरचना अलौकिक तर आहेतच; मात्र त्याचबरोबर त्यांची नाटके, कादंबरी, कथा आदी साहित्यरचनाही तितक्याच ताकदीच्या आहेत. रवींद्रनाथांचे सारेच साहित्य पारलौकिक कल्पनाशक्ती, आत्यंतिक संवेदनशीलता, निखळ जीवननिष्ठा यांचे प्रतिबिंब आहे. या साऱ्यांचे यथार्थ दर्शन रवींद्रनाथांच्या साहित्यकृतींमध्ये होते.
बरोबर शंभर वर्षे झालीत त्या घटनेला.
१३ नोव्हेंबर १९१३ रोजी शांतिनिकेतनात वास्तव्याला असलेल्या रवींद्रनाथांना ‘गीतांजली’साठी नोबेल पारितोषिक मिळाल्याची बातमी कळली अन् हा-हा म्हणता शांतिनिकेतनातील सान-थोर आनंदाने न्हाऊन निघाले. तेथील मुलांना ‘नोबेल’ म्हणजे काय, हे माहीत नव्हते, तरीही ते उत्साहाने नाचून आपला आनंद व्यक्त करीत होते. आपल्या प्रिय गुरुदेवांचा सन्मान जगाने केलेला आहे, हे त्यांना समजले होते. त्या काळातील लक्षावधी भारतीयांना या घटनेचे मोल वा ऐतिहासिक अर्थ तेव्हा जरी कळला नसला तरी जे घडले, ती घटना महत्त्वाची आहे, ही जाणीव मात्र त्यांना होती. जाणकारांना मात्र या घटनेचा अर्थ नेमकेपणाने लावणे शक्य होते. जगाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका ‘गोऱ्या’ नसलेल्या, युरोप अथवा अमेरिकेचा नागरिक नसलेल्या, दुर्लक्षित अशा तिसऱ्या जगातील खंडप्राय देशातील एका कवीला साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पारितोषिक मिळाले होते. ब्रिटिशांच्या साम्राज्याचा एक हिस्सा असलेल्या या देशाला शतकानंतर आपल्या स्वत्वाची अकस्मात जाणीव व्हावी, असे झाले. या देशात अनेक भाषा बोलल्या जातात. त्यांच्यापैकी एक असलेल्या- बंगालीत लिहिणाऱ्या कवीला विश्वकवीचा मान मिळाला. आशिया, आफ्रिका व दक्षिण अमेरिका या खंडांतील कोणत्याही राष्ट्राच्या वाटय़ाला हा सन्मान यापूर्वी आलेला नव्हता. स्वमग्न असे युरोपीयन देश, अमेरिका व कॅनडा यांच्यासाठी उर्वरित जगाचे मोल कवडीइतपतच होते. या पाश्र्वभूमीवर रवींद्रनाथांना मिळालेले नोबेल नवलाईची तसेच ऐतिहासिक घटना ठरली. नोबेल पुरस्कार देणाऱ्या स्वीडिश अॅकॅडमीने प्रथमच एखाद्या साहित्यकाराच्या साहित्यिक योगदानासोबतच त्यांचा दृष्टिकोन, जीवनविषयक तत्त्वज्ञान आणि त्यांच्या साहित्याला लाभलेले वैश्विक परिमाण याचा विचार केला. असा विचार मांडण्याचे कारण म्हणजे रवींद्रनाथांबरोबर ज्या दोन साहित्यिकांची नावे पारितोषिकासाठी चर्चेत होती, ती म्हणजे इंग्लंडचे थॉमस हार्डी व फ्रान्सचे अनाटोल फ्रान्स. दोघेही श्रेष्ठ अन् विख्यात. मात्र, थॉमस हार्डीच्या कादंबऱ्यांतील ‘निराशावाद’ व फ्रान्सच्या लेखनातील ‘संशयवाद’ यापेक्षा रवींद्रनाथांची ‘जीवनाची सघन अर्थपूर्णता व सत्यम् शिवम ् सुंदरतेवरील अदम्य श्रद्धा’ महत्त्वाची ठरली. नव्या शतकात नुकत्याच प्रवेश करणाऱ्या जगाला प्रकाशाची आस अन् कास धरावीशी वाटतेय याचाच तो संकेत होता.
रवींद्रनाथांची ‘गीतांजली’ साहित्यजगतात अवतरण्याचा कालखंड वेगळे परिमाण लाभलेला होता. पराकोटीची साम्राज्यस्पर्धा, औद्योगिक क्रांतीनंतर औद्योगिक विकास साधूनही पसरलेली भकास निराशा, बकाल शहरीकरण, अतिरेकी, हिंस्र असा राष्ट्रवाद, धर्म-श्रद्धा यांना नवनवीन ज्ञान-विज्ञानाने दिलेले आव्हान यामुळे युरोपातील समाज संभ्रमित, कुंठित झालेला होता. या काळात हा समाज ज्या नैराश्यपूर्ण निर्थकतेच्या मानसिकतेतून जात होता, त्याचे चित्रण टी. एस. एलियटने ‘द वेस्ट लॅण्ड’ व हक्स्लेने ‘पॉइंट काऊंटर पॉइंट’ या साहित्यकृतींमध्ये परिणामकारकपणे केले आहे. जीवनमूल्यांचा ऱ्हास, असुरक्षितता व स्पर्धा यांच्या अंधारात भरकटलेल्या समाजाला ‘गीतांजली’तील ‘प्रेम, सत्यम् शिवम् सुंदरम्’वरील श्रद्धा व मानवी जीवनाला अर्थ असतो, हा विश्वास दीपस्तंभासारखा न वाटता तर नवलच. ‘गीतांजली’च्या प्रकाशनानंतर या काव्यसंग्रहाबद्दल ‘बाप्टिस्ट टाइम्स’ने लिहिले, ‘गीतांजली’ हे ईश्वराच्या आगमनाचे आश्वासन देणारे काव्य होय.’ अर्थात् ‘बाप्टिस्ट टाइम्स’ने ‘गीतांजली’ची दखल केवळ ‘भक्तिकाव्य’ म्हणूनच घेतलेली होती. परंतु ‘गीतांजली’चे महत्त्व त्यापेक्षा कितीतरी अधिक होते. युरोप-अमेरिकेच्या पलीकडे एक विलक्षण समृद्ध संस्कृती अस्तित्वात आहे, अन् ती अखिल मानवी समाजाला एक नवीन दिशा, प्रकाश देऊ शकते याची जाणीव पाश्चिमात्यांना झाली. तोपर्यंत भारतच काय, पण संपूर्ण आशियाच त्यांच्यासाठी गूढ, रहस्यमय, तंत्र-मंत्रांचा प्रदेश होता. रवींद्रनाथांच्या रूपात पौर्वात्य संस्कृतीचे सार त्यांच्यासमोर साक्षात् उभे राहिले. स्वत: रवींद्रनाथांना युरोपीयन मानसिकतेची पुरेपूर जाणीव होती. ‘रात्रीच्या अंधारात ठेचाळणाऱ्या पाश्चिमात्य समाजाचे डोळे पूर्वेकडील प्रकाशाकडे लागलेले आहेत,’ असे त्यांचे ‘गीतांजली’च्या प्रकाशनापूर्वीचे उद्गार होते. भारतीय संस्कृती व ज्ञान याबद्दल भ्रामक कल्पना असलेल्या त्या समाजाला त्यांनी त्यांच्याच भाषेत, त्यांच्या राग-लयीत भारतीय (पौर्वात्य) स्वत्वं समजावून सांगितली. यांत्रिक, तांत्रिक व वैज्ञानिक प्रगतीतून संपन्नता साधणाऱ्या, पण आत्मिक जाण व भान हरवलेल्या समाजासाठी ‘गीतांजली अन् रवींद्रनाथ’ काळाची गरज होती.
‘गीतांजली’ इंग्रजीत अवतरावी असे विधिलिखित असावे. एरवी रवींद्रनाथ आपल्या आयुष्याच्या निम्म्या वाटेवर इंग्रजी भाषेकडे का वळावेत? ‘एखाद्याने मला चहा आमंत्रणाची इंग्रजीतून चिठ्ठी लिहिली तर तिला काय न् कसे उत्तर द्यावे, हे मला कळत नसे..’ अशा शब्दांत रवींद्रनाथ आपल्या स्वत:च्या इंग्रजीबद्दल बोलत. मात्र, घडले ते अनपेक्षितच. १९१२ च्या सुरुवातीला रवींद्रनाथ इंग्लंडवारी करणार होते. मात्र, आजारी पडल्याकारणाने त्यांनी तो बेत रद्द केला व पद्मा नदीकाठच्या आपल्या वास्तूत प्रकृतिस्वास्थ्यास्तव ते थांबले. मार्चचा महिना. वसंत ऋतू. रवींद्रनाथांचे अन् पद्मा नदीचे व या वसंत ऋतूचे काहीतरी खास बंध.. नाते असावे. ही वाहती नदी व उमलती पालवी रवींद्रनाथांना कसली तरी ऊर्जा देत असावी. आजाराने अशक्त झालेला हा कवी काहीतरी नवीन लिहिण्यापेक्षा जे लिहिलेले आहे, ते पुन्हा लिहून त्या प्रथम लिखाणाच्या वेळी घेतलेला सर्जनानंद पुन्हा घ्यावा, या हेतूने बंगाली ‘गीतांजली’तील काही कविता इंग्रजीतून लिहू लागले. एक चाळा म्हणून केलेला तो अनुवाद होता. रवींद्रनाथ आपल्या बंगाली कवितांना इंग्रजी परिवेशात सजवत होते. भाषा बदलली; पण आशय, अर्थ तोच राहिला. कधी अधिक सघन झाला. कधी अधिक वेगळा उमटला. घडला प्रकार अनुवाद न राहता अनुसर्जन झाला. प्रतिभावंताच्या हातून केवळ अनुवाद, रूपांतर घडणे कसे शक्य? त्यातच तो प्रतिभावंत जर रवींद्रनाथ असतील तर? काही कविता पद्मेच्या साक्षीने इंग्रजीत अवतरल्या. काही इंग्लंडला जाताना सागराच्या साक्षीने. इंग्लंडमध्ये त्यांचे काही बंगाली स्नेही होतेच. त्याचबरोबर यावेळी त्यांच्या स्वागतासाठी उत्सुक एक इंग्रज स्नेहीही होता. रोदेन स्टेन त्याचे नाव. इंग्रजी ‘गीतांजली’चा पहिला वाचक म्हणावा असा. रोदेन स्टेनने अनुसर्जित इंग्रजी ‘गीतांजली’चे हस्तलिखित वाचले खरे; मात्र त्या कविता खरोखरच वेगळ्या आहेत, हे त्या जातिवंत चित्रकाराला उमगले. त्या कवितांनी रोदेन स्टेनला वेगळ्याच भावविश्वात नेले. रोदेन स्टेनने ते हस्तलिखित कवी डब्ल्यू. बी. येटस् याला वाचायला भाग पाडले. भाग पाडले असेच म्हणावे लागेल. रोदेन स्टेनच्या आग्रहाखातर कविता वाचणाऱ्या येटस्ला त्यातील अलौकिकत्व आकळले. कवीला कवी कळला.
ज्या थोर इंग्रजी साहित्यकार-तत्त्वज्ञांसमोर ‘गीतांजली’चे पहिले प्रकट वाचन झाले, त्यांच्या उत्साही प्रतिसादाने प्रोत्साहित झालेल्या रवींद्रनाथांनी आणि रोदेन स्टेन यांनी इंग्रजी ‘गीतांजली’ प्रथमत: इंडिया हाऊसतर्फे प्रकाशित केली. त्यानंतर मॅकमिलन कंपनीतर्फे रवींद्रनाथांचे काव्य जगासमोर येण्यासाठी या हितचिंतकांनी जी भूमिका घेतली, जो वाटा उचलला, त्याचे मोल मान्य करायलाच हवे. ‘इंग्रजी गीतांजली’ बंगाली आवृत्तीपेक्षा नक्कीच सरस नाही, हे सत्य मान्य करूनदेखील इंग्रजी काव्यसंग्रहाचे महत्त्व कमी
होत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठी साहित्याच्या साठोत्तरी वाटचालीत वैविध्यपूर्ण साहित्यिक प्रवाहांना सामावून घेणारे, त्यांचा जाणीवपूर्वक शोध आणि वेध घेणारे सव्यसाची प्रकाशकही याच काळात निर्माण झाले. त्याचबरोबर साहित्याला सर्जनशील दृश्यात्मक साज चढवून त्याच्या निर्मितीमूल्यांत भर घालणारे मर्मज्ञ चित्रकारही याच दरम्यान उदयास आले. साहित्याच्या बरोबरीने.. कधी त्याहीपल्याड जात या चित्रकारांनी मराठी वाङ्मय समृद्ध केले. या सृजनप्रक्रियेचा मागोवा घेणारा खास विभाग…

मराठीतील सर्व दिवाळी अंक २०१३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rabindranath tagore
First published on: 05-03-2014 at 05:58 IST