आज बाळासाहेब ठाकरे हे शिवसेनाप्रमुख म्हणून सर्वज्ञात असले तरी एकेकाळी ते राष्ट्रीय पातळीवरील एक अग्रगण्य व्यंगचित्रकार होते. घटना-प्रसंगांतील विसंगती, विरोधाभास टिपण्यातली त्यांची विचक्षणता, रेषांवरील कमालीची हुकूमत, व्यंगचित्राचा विषय ठरलेल्या व्यक्तींचा गाढा अभ्यास आणि आपल्या विलक्षण कल्पनाशक्तीने त्यांची व्यंगचित्रे त्याकाळी खूप गाजली. ‘व्यंगचित्रकार बाळासाहेबां’चं हे रूप.. त्यांच्या निवडक व्यंगचित्रांसह..
एक जेमतेम १९-२० वर्षांचा मुलगा, एका मराठी वर्तमानपत्राच्या रविवार पुरवणीसाठी कथाचित्रं काढत असतो. लेटरिंग, सजावट वगैरेत कितीतरी दिवस गुंतलेला असतो. एके दिवशी एका इंग्रजी वर्तमानपत्राचे एक अधिकारी त्या मुलाच्या चित्रांकडे उत्सुकतेने पाहतात. म्हणतात, ‘इकडे काय करतो आहेस? आमच्याकडे ये.’ त्यानंतर तो मुलगा संपादकांना एक राजकीय व्यंगचित्र काढून देतो. संपादक ते पाहतात व पुन्हा त्या मुलाकडे कटाक्ष टाकतात. ते चित्र दुसऱ्या दिवशी त्या इंग्रजी वर्तमानपत्रात मोठय़ा आकारात छापलं जातं. त्या वर्तमानपत्राचं नाव ‘फ्री-प्रेस जर्नल’ आणि त्या जेमतेम विशीतल्या, चष्मेवाल्या मुलाने काढलेल्या व्यंगचित्राखाली सही होती, बी. के. ठाकरे अर्थातच बाळ केशव ठाकरे. हा प्रसंग मला भारतीय वृत्तपत्रांच्या इतिहासातला एक महत्त्वाचा प्रसंग वाटतो. कारण त्यातून एक आंतरराष्ट्रीय पातळीवरचा व्यंगचित्रकार जन्माला आला. त्याचबरोबर त्या संपादकांचंही कौतुक. कारण त्यांनी अत्यंत नवख्या, वयाने फारच लहान अशा चित्रकाराला व्यंगचित्रकार होण्याची संधी दिली. गुणग्राहकता म्हणतात ती हीच!
फ्री- प्रेसमधल्या बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांबद्दल मी फक्त ऐकून होतो. प्रत्यक्ष जेव्हा यातली बरीचशी चित्रं पाहायला मिळाली, तेव्हा एक दुर्मीळ खजिना हाती लागल्याचा आनंद झाला. या व्यंगचित्रांनी जुन्या कालखंडातील दुर्मीळ बाळासाहेबांचं दर्शन घडवलं. त्याचाच हा धावता आढावा..

‘फ्री-प्रेस’ १९५९ मध्ये सोडताना ते देशातील एक प्रमुख राजकीय व्यंगचित्रकार होते. फ्री-प्रेस मध्ये त्यांनी अक्षरश: हजारो मोठी राजकीय व्यंगचित्रं काढली. त्याशिवाय ‘चाचाजी’ या नावाने पॉकेट कार्टुनचं सदरही चालवलं.
फ्री-प्रेसमधल्या या व्यंगचित्रांत बहुसंख्य व्यंगचित्रं ही आंतरराष्ट्रीय विषयांवरची होती. त्या काळातील जगातील जवळपास सर्व महत्त्वाच्या व्यक्तींची कॅरिकेचर्स त्यांनी व्यंगचित्र रेखाटताना काढली आहेत. (एक शक्यता अशी आहे की, बऱ्याच वेळेला या कॅरिकेचर्सवरूनच सामान्य लोक या नेत्यांना नंतर ओळखत असतील!!) त्यात इंग्लंड, अमेरिका, चीन, रशिया यांच्या प्रमुखांपासून व्हिएतनाम, इजिप्त, सिलोन, इस्रायलपर्यंतचे सगळे आंतरराष्ट्रीय चेहरे त्यांनी रेखाटले आहेत.
नेमकं, थेट भाष्य, अप्रतिम कॅरिकेचरिंग, काळ्या-पांढऱ्या रंगाचा बॅलन्स, परिणामकारक काँपोझिशन आणि महत्त्वाचं म्हणजे ह्य़ुमर! यामुळे बाळासाहेब ठाकरे हे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे राजकीय व्यंगचित्रकार ठरले यात नवल नाही. त्यांच्या अनेक व्यंगचित्रांचा आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये किंवा पुस्तकांमध्ये समावेश केला गेला, यातच काय ते आलं. ‘दुर्मीळ’ बाळासाहेबांच्या या कालखंडाचं दर्शन एक व्यंगचित्रकार म्हणून मला खूप समाधान देऊन गेलं यात शंका नाही.
राजकीय व्यंगचित्रकाराच्या कामाचं स्वरूप असं असतं की, त्याला रोजच्या रोज ‘प्रॉडक्ट’ तयार करावंच लागतं. शिवाय महत्त्वाचं म्हणजे वृत्तपत्रीय क्षेत्रात काम करत असताना एक प्रकारची ‘सिनिकल’ वृत्ती आपोआप बळावत असते. शिवाय व्यंगचित्रकाराचं काम संपादक किंवा इतर पत्रकारांप्रमाणे टीका करण्याचं. फरक इतकाच, की राजकीय व्यंगचित्रकार कलेच्या- चित्रकलेच्या माध्यमातून ही टीका करत असतो. शिवाय त्याला त्याची विनोदबुद्धी शेवटपर्यंत ताजीतवानी ठेवायची असते. या पाश्र्वभूमीवर पाहिलं तर हे लक्षात येईल की, पत्रकार आणि कलावंत यांचं अद्भुत मिश्रण राजकीय व्यंगचित्रकारामध्ये असावं लागतं. त्यामुळे तो नेहमीच निर्मितीच्या तणावाखाली कळत-नकळत असतो हे लक्षात येईल. शिवाय त्याला स्वत:च्या निर्मितीखाली स्वत:ची सही करायची असते.
या साऱ्यांचा विचार केला तर रोजच्या रोज बिघडत चाललेल्या समाजकारण व राजकारणाचा साक्षीदार होताना विनोदाच्या माध्यमातून टोकदार भाष्य करणं हे किती आव्हानात्मक आहे, हे लक्षात येईल. ३०-४०-५० र्वष वृत्तपत्रांसाठी काम करणाऱ्या व्यंगचित्रकारांबद्दल म्हणूनच नेहमी आदर वाटायलाच पाहिजे.
भारतातल्या प्रमुख राजकीय व्यंगचित्रकारांची कामगिरी डोळ्यांसमोर आणली तर ठाकरे यांचं वेगळेपण, किंबहुना मोठेपण सहज स्पष्ट होणारं आहे.
कॅरिकेचरिंगमधले बारकावे दाखवताना ते अनेक भावभावना, उदा. त्वेष, भीती, कंटाळा, अगतिकता, संताप वगैरे सहज दाखवतात. पेहेरावातले बारकावेही अचूकपणे टिपतात. एकूण रचना किंवा कॉम्पोझिशन कॉमिक पद्धतीने रेखाटण्यात ते वाक्बगार आहेत. पण तेवढय़ावरच थांबता येणार नाही. त्यांनी केलेली काही भाष्यं किंवा कॉमेंट्स अत्यंत महत्त्वाच्या आहेत.
उदाहरणच द्यायचं तर पब्लिक सेक्टर वि. प्रायव्हेट सेक्टर यांच्यातील संघर्षांचं देता येईल. देशाची आर्थिक घडी नीट बसण्याच्या काळात असे वाद उपयोगाचे नाहीत, हा नेहरूंचा साधा, पण महत्त्वाचा विचार ठाकरे यांनी व्यंगचित्रकलेची सगळी ताकद एकवटून मांडला आहे. त्यातल्या चित्रकलेच्या सौंदर्यामुळे चित्र उठावदार झालेलं आहेच, पण महत्त्वाचं आहे ती कल्पना व भाष्य! जिवावरच्या संकटातसुद्धा प्रतिष्ठित लोक स्वत:चं मानपान विसरत नाहीत, हा विचार आणि खवळलेल्या समुद्रातून तराफ्यावरची जीव वाचवणारी माणसं व्यंगचित्रकाराच्या मनामध्ये एकाच वेळी अवतरली असतील. तराफ्यावरच्या त्या श्रीमंत माणसाने असल्या परिस्थितीत कसं वागलं पाहिजे याची कानउघाडणी खरं तर नेहरूंच्या रूपातून ठाकरे यांनीच करून त्या मागणीतली हास्यास्पदता दाखवली आहे.
देश संकटात असताना असल्या विपरीत मागण्या करणं हे हास्यास्पद आणि परिस्थितीचं गांभीर्य न ओळखणारं आहे असं स्पष्ट मत त्यांनी मांडलय. खरं तर हे भाष्य खूप महत्त्वाचं आणि कालातीत आहे. त्यामुळे ठळक रेषा व स्पष्ट भाष्य हेच त्यांचं बलवैशिष्टय़ मानावं लागेल.

Chief Minister Eknath Shindes taunts to Naresh Mhaske attempt to comfort BJP leaders
मुख्यमंत्र्यांच्या नरेश म्हस्केंना कानपिचक्या, भाजप नेत्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न
Venice Biennale, Venice, paintings,
डोळ्याला डोळा भिडवून पाहणं…
Wardha Police, mahatma Gandhi s proverbial monkey idea, Combat Rising Cybercrime, marathi news, cyber police, cyber crime news, wardha news, wardha police news,
महात्मा गांधी यांची प्रतीके अन् वर्धा पोलिसांची नाविन्यपूर्ण…
Broadcaster Science Inculcation of scientific approach in India Prof R v Sowani
विज्ञान प्रसारकाची जन्मशताब्दी..


स्वातंत्र्य अगदी उंबरठय़ावर आलेलं होतं, पण मिळालेलं नव्हतं. त्यावेळचे एक चित्र बाळासाहेबांनी काढलंय (३१-५-४७). ब्रिटिश सरकारशी सल्लामसलत करून लॉर्ड माऊंटबॅटन पुन्हा भारतात परतले, ही बातमी होती. बाळासाहेबांनी चित्राला नाव दिलं- ‘द जगलर इज बॅक अगेन!’ हा रस्त्यावरचा मदारी आता कोणकोणती हातचलाखी करतोय, हे चित्रात दिसतंय. पण त्याकडे अविश्वासाने बघणाऱ्या मुलांमध्ये बॅ. जिना (लुंगी नेसलेले), शालेय वेषातील नेहरू आणि चिंताक्रांत संस्थानिक दिसताहेत.


१९५१ सालातल्या प्रजासत्ताकाच्या पहिल्या वर्धापनदिनी ठाकरे यांचे एक चित्र अत्यंत वेगळं व विलक्षण उठावदार आहे. विशेष म्हणजे त्यात पं. नेहरूंचे अर्कचित्र नसून रिअ‍ॅलिस्टिक स्केच आहे. परंतु गांधीजींचा नेहरूंवरचा प्रभाव दाखवण्यासाठी पाश्र्वभूमीवर तेजाची उपमा देताना ठाकरे यांच्यातील व्यंगचित्रकार दिसतो.


एका चित्रात पाकिस्तानला अमेरिकेने शस्त्रं दिली, आता प्रशिक्षणही देणार, अशी बातमी आहे. व्यंगचित्रात पाकिस्तानचे मंत्री बंदूक उलटी धरून स्वत:वरच नेम धरताहेत असं चित्रण आहे. मथळा आहे- डिफेन्स और सुइसाईड?


पाकिस्तानने सीमेवर हल्ले केले की त्याचा निषेध करणारं पत्र पाठवायचं, हे आपलं धोरण आहे. ते अर्थातच त्या काळातही होतंच. एका चित्रात पाकिस्तानचे आयुबखान हातात बंदूक (अर्थात अमेरिकन) घेऊन उभे आहेत. त्याला प्रत्युत्तर देताना आपले मंत्रीही निषेधाची कागदी भेंडोळी घेऊन पाकला धमकावत आहेत!


‘जागतिक शांततेसाठी युद्धाची तयारी करावी लागते’ या बातमीला अनुसरून त्यांनी सैनिकी वेषातील कबुतर हे विसंगती दाखवणारं प्रभावी चित्र काढलंय.


पहिल्या पंचवार्षिक योजनेचं काम याच काळात सुरू झालं. यावरच्या चित्रात जमिनीची मशागत करून नेहरू व अर्थमंत्री सी. डी. देशमुख हे खऱ्या अर्थानं बीजं रोवताहेत असं चित्रण आहे. मात्र, त्याच वेळी झाडाच्या फांदीवर कावळ्यांच्या रूपातले टीकाकार बसलेलेही ठाकरे यांनी दाखवले आहेत.
या योजनेची माहिती जनतेला व्हावी म्हणून लोककलांच्या माध्यमातून ती पसरवण्याची योजना नभोवाणी मंत्रालयाने मांडली. त्यावरचं ठाकरे यांचं व्यंगचित्र अत्यंत खुमासदार आहे. (मेलडी टाइम). या चित्रात सी. डी. देशमुख पेटी वाजवणाऱ्याच्या रूपात आहेत, नंदा पिपाणी वाजवताहेत, तर नभोवाणी मंत्री केसकर नृत्यांगनेच्या भूमिकेत. या चित्रातील प्रेक्षकांचे हावभावही बघण्यासारखे आहेत.


‘पंचवार्षिक योजनेमध्ये परकीय गुंतवणूक आली तर तिचं स्वागत करावं, अर्थात त्यात भारताचा आत्मसन्मान कायम राहणार असेल तरच!’ या सी. डी. देशमुखांच्या विधानावरचं व्यंगचित्रही प्रभावी आहे.


अमेरिका-चीन यांच्यातल्या तत्कालीन संबंधावरच्या त्यांच्या चित्राची कल्पना गमतीदार आहे. त्याचबरोबर आशयही सामान्य वाचकाला पटकन् कळेल असा आहे.


सरहद्द गांधी अर्थातच खान अब्दुल गफार खान यांची पाक सरकारने मर्यादित मुक्तता केल्यानंतरचं व्यंगचित्रही तत्कालीन परिस्थितीचं यथार्थ वर्णन करतं.


भारत-चीन संबंध हे तिबेट प्रकरणावरून जेव्हा तणावग्रस्त झाले तेव्हाचं त्यांचं ‘बॅड कॉइन’ हे चित्रही असंच प्रभावी आहे.


जिनिव्हा येथील परिषदेमध्ये कृष्ण मेनन हे अखेपर्यंत जागतिक शांततेसाठी प्रयत्न करत होते. या बातमीवर व्यंगचित्र रेखाटताना बाळासाहेबांनी कृष्ण मेननमधला फक्त कृष्ण घेतला. त्याच्या हातात बासरी दिली, पण त्याच्या (शांततेच्या) बासरीवादनाला आजूबाजूचे मस्तवाल गाई-बैल (अर्थातच बडी राष्ट्रं) दाद देत नाहीत असे झकास चित्र रेखाटले. यात अर्थातच प्रत्येक गुराला त्या-त्या राष्ट्रप्रमुखाचे कॅरिकेचर चिकटवले आहेच!


चेहऱ्यावरचे नेमके हावभाव रेखाटणं हाही ठाकरे यांचा विशेष पैलू म्हणावा लागेल. ‘विवाहविषयक कायदा’ संसदेने संमत केल्यावरचं त्यांचं ‘कन्यादान’ हे चित्र अवश्य पाहण्यासारखं आहे. विशेषत: उपवर मुलीचं रेखाटन.


‘आराम हराम है’ हा तर नेहरूंनी दिलेला अजरामर संदेश आहे. यानिमित्ताने काढलेल्या चित्रातील काँग्रेसचे नेते अगदी टिपिकल म्हणावेत असेच आहेत.


एखाद्या पात्राची विशिष्ट वेशभूषा रेखाटावी तर ती बाळासाहेबांनीच! ‘लास्ट चान्स’ या मथळ्याखाली गोवा पोर्तुगीजांच्या अंमलाखालून दूर होतानाचा कडय़ावर लटकलेल्या पोर्तुगीज सरकारचा वेश आणि आवेश पाहण्यासारखा आहे. महत्त्वाचं म्हणजे पाश्र्वभूमीवर पाँडेचरीहून परतणारे फ्रेंच सैनिक आहेत.


‘व्हिक्टरी परेड’ या चित्रात अन्नमंत्री किडवाई यांना वेल डन ‘किड’! असं म्हणून शाबासकी देणारे नेहरू आहेत. पण धान्याची पोतीच सैनिकांप्रमाणे सलामी देताहेत, ही कल्पनाच गमतीशीर आहे!


समाजवादी मंडळींवर बाळासाहेबांची विशेष ‘माया’ असावी. त्यांच्या अनेक व्यंगचित्रांतून ही मंडळी बरीच गमतीजमती करताना दिसतात. त्यातल्या दोन चित्रांचा उल्लेख केलाच पाहिजे अशी आहेत.
विनोबा भावे यांची ‘भूदान’ चळवळ ऐन भरात असताना त्याचा राजकीय फायदा घ्यायला काँग्रेसने सुरुवात केली. त्याबद्दल समाजवादी (निष्क्रिय) नेते (अशोक मेहता, लोहिया वगैरे) यांनी काँग्रेसवर टीका करायला सुरुवात केली. याचं चित्रण अतिशय परिणामकारक आहे. कारण या चळवळीत जयप्रकाश नारायण यांचा प्रत्यक्ष सहभाग यातून दिसतोच, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे विनोबाजींची फक्त दाढी दाखवून त्यांचं व्यक्तिमत्त्व उभं केलंय.


एका शाळेच्या वर्गातील आदर्श शिक्षक व उनाड विद्यार्थी या वातावरणाचे ‘समाजवादी’ दर्शन पाहायचे असेल तर ‘पिटी द आचार्यजी’ हे चित्र पाहावं लागेल. यात अनेक नेते वेगवेगळ्या कोनांतून व हावभावांसकट रेखाटले आहेतच, पण समाजवादी मंडळींची पुढे एकमेकांशी न पटण्याची लक्षणंही यात स्पष्टपणे दिसतात.


सीमाप्रश्नाच्या निमित्ताने एसेम जोशी व इंदिरा गांधी यांची भेट यावरचं चित्रही बोलकं आहे. विशेषत: काँग्रेसचा नागपूर ठराव आणि महाराष्ट्रवाद्यांचा नागपूर पॅक्ट यादरम्यानची दोन मोठय़ा नेत्यांमधली शांतता खूप बोलकी आहे.


स्वातंत्र्यानंतरचा नवखेपणाचा कालावधी लोटल्यानंतर देशापुढचे आर्थिक व औद्योगिक प्रश्न भेडसावण्याचा तो काळ होता. पब्लिक सेक्टर आणि प्रायव्हेट सेक्टर यांच्यातला संघर्ष, तणाव, सवलती, कर्ज, धोरणं यांतील बॅलन्स साधताना होणारी नेहरू राजवटीची तारांबळ ही बाळासाहेबांनी टिपिकल व्यंगचित्रकाराच्या नजरेतून टिपली आहे. आजही प्रायव्हेट आणि पब्लिक सेक्टरमधील संघर्ष चालूच आहे. यावेळी, देश म्हणून भूमिका घेतली पाहिजे, हे या व्यंगचित्रातील भाष्य कालातीत आहे.


बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्ये एक इरसाल व्यंगचित्रकारही लपला आहे. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे त्यांचं ‘धोबी सेन्स’ हे खळखळा हसायला लावणारं व्यंगचित्र! त्यावर काही बोलण्यापेक्षा ते प्रत्यक्ष अनुभवलेलंच बरं!