ऐन ऑक्टोबर हीटमध्येही रोहेकरांना वसंत ऋतूतला बहर अनुभवायला मिळाला. निमित्त होते ते रसिकहो संस्थेतर्फे आयोजित दिवाळी पहाटचे. वसंत देसाई, वसंत पवार, वसंत प्रभू, डॉ वसंतराव देशपांडे व कविवर्य वसंत बापट यांच्या विविध लोकप्रिय गीतांचा बहर या निमित्ताने रोहेकर रसिकांनी अनुभवला.  गायिका सुवर्णा माटेगावकर यांच्या समवेत संजीव मेहेंदळे, तनुजा जोग, मीनल पोंक्षे यांनी गायलेल्या गीतांना दिलेल्या संगीताचे संयोजन पराग माटेगावकर यांनी केले होते. त्यांना राजीव जानळकर (तबला), विवेक परांजपे (सिंथेसायझर), अमृता केदार (सिंथेसायझर), अक्षय इंगळे (तालवाद्य), नीलेश देशपांडे (बासरी) यांनी उत्तम साथ दिली. कार्यक्रमाचा प्रारंभ ‘घन:श्याम सुंदरा’ या भूपाळीने झाल्यानंतर ‘चाफा बोलेना’, ‘मानसीचा चित्रकार तो’ व ‘प्रेमा काय देऊ तुला’ या अवीट गोडीच्या गीतांतून वसंत प्रभूंचे सूरसामथ्र्य मांडले. तर तनुजा जोग हिने भन्नाट शैलीत ‘आई मला नेसव शालू नवा’, ‘कसं काय पाटील बरं हाय का’ या लावण्यांनी सभागृह हलवून सोडले.
संजीव मेहेंदळे यांनी ‘दाटून कंठ येतो’ आणि ‘जे वेड मजला लागले’ ही गीते सादर केली. तर कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात ‘जन पळभर म्हणतील हाय हाय’, ‘प्रेमस्वरूप आई’ अशी ह्रदयस्पर्शी गीते सदर केली. ‘रम्य ही स्वर्गाहूनी लंका’, ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या गीतांतून संजीव मेहेंदळेंनी रसिकांची मने जिंकली.  संजीव मेहेंदळेंनी सादर केलेल्या ‘सुरत पियाकी न छिन बिसराई’ या नाटय़गीतासह तराणा या गायनप्रकार कार्यक्रमाचा परमोच्च िबदू ठरला. वसंत देसाईंनी संगीत दिलेल्या ‘ए मालिक तेरे बंदे हम’ या भावपूर्ण प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता झाली.