एकापेक्षा अधिक पॅन कार्ड तयार करून करचुकवेगिरी करणाऱ्यांना केंद्र सरकारनं धडा शिकवला आहे. मागील दोन ते तीन वर्षांत सरकारनं लाखो पॅनकार्ड रद्द किंवा निष्क्रिय केली आहेत. त्यामुळे अनेकांना आपले पॅनकार्ड वैध आहे का? असा प्रश्न पडला असेल. पॅनकार्ड वैध आहे का ते तपासण्याचे काही सोपे उपाय आहेत ते करुन पाहा आणि तुमचे पॅनकार्ड फेक पॅनकार्डच्या यादीत नाही ना याची खात्री करुन घ्या…

(आणखी वाचा : पॅनकार्ड हरवलंय? असं काढा डुप्लिकेट)

– आयकर विभागाच्या http://www.incometaxindiaefiling.gov.in या ई-फायलिंगच्या वेबसाईटवर जा.

– होम पेजवर ‘सर्व्हिसेस’ या मथळ्याखाली ‘Know Your PAN’ असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.

– त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल आणि यामध्ये तुम्हाला तुमचे नाव, धर्म, स्टेटस यांसारखी माहिती भरुन द्यावी लागणार आहे.

– तुम्हा तुमचा मोबाईल नंबर द्यावा लागेल. तो देताना एक काळजी घ्या. पॅन कार्डचा फॉर्म भरताना जो नंबर दिला होतात तोच नंबर आताही भरत असल्याची खात्री करा.

– ही सर्व माहिती भरल्यानंतर ‘सबमिट’वर क्लिक करा. यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावर ओटीपी (वन टाइम पासवर्ड) येईल. हा ओटीपी टाकल्यानंतर व्हॅलिडेट या बटणावर क्लिक करा.

– तुमच्या नावावर एकाहून अधिक पॅनक्रमांक रजिस्टर केलेले असतील तर तशी विचारणा केली जाईल. एकापेक्षा जास्त पॅनकार्ड  तुमच्या  नावावर असतील तर आणखी माहिती द्या असं सांगणारा संदेश तुमच्या स्क्रीनवर येईल. यानंतर तुम्हाला तुमच्या वडिलांचे नाव किंवा इतर माहिती द्यायला लागेल.

– विचारलेली माहिती भरल्यानंतर तुम्ही पुढच्या पेजवर जाल, ज्याठिकाणी तुमचे पॅनकार्ड वैध आहे की नाही हे समजेल.

दरम्यान, ३१ मार्चपर्यंत आधारशी पॅनकार्ड संलग्न करण्याची मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत आधार कार्ड पॅन कार्डशी जोडलं नाही तर पॅन कार्ड रद्द करण्यात येणार आहे.