News Flash

गरीबांना रोजगार देणारी ५० हजार कोटींची नवी योजना आहे तरी काय?

मोदींच्या हस्ते बिहारमध्ये या अभियानाचा झाला शुभारंभ

करोना व लॉकडाउनमुळे विस्थापित झालेल्या मजुरांच्या रोजगारासाठी केंद्र सरकारनं नवीन कार्यक्रम हाती घेतला आहे. केंद्र सरकारच्या वतीनं गरीब कल्याण रोजगार अभियान सुरू केलं असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. बिहारमधील खगरिया येथून या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला आहे.

५० हजार कोटींची योजना
गरीब कल्याण रोजगार अभियान योजना आत्मनिर्भर भारत या अभियानाचाच एक भाग असल्याचे सांगण्यात आलं आहे. या अभियानासाठी ५० हजार कोटी रूपयांची घोषणा केंद्र सरकारनं केली आहे. यातून रस्ते बांधणीसह ग्रामविकासाला साहाय्यभूत ठरणाऱ्या कामातून रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे.

१२ मंत्रालय करणार काम –
गरीब कल्याण रोजगार अभियान ही योजना यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी १२ मंत्रलयं काम करणार आहेत. या मंत्रालयाचा पूर्णपणे या योजनेवर नजर असणार आहे. यामध्ये ग्रामीण विकास, पंचायती राज, रस्ते वाहतूक या मंत्रालयाचाही समावेश आहे.

पुढील ४ महिने रोजगार उपलबद्ध –
बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, ओडिशा, झारखंड अशा सहा राज्यांतील ११६ जिल्ह्य़ांमधील ही योजना सुरू होणार आहे. ११६ जिल्ह्य़ांमध्ये प्रत्येकी किमान २५ हजार मजूर गावी परतल्याचे केंद्राला आढळळ्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. या योजनाचा लाभ २९ लाख मजुरांना होणार असून पुढील ४ महिने (१२५ दिवस) रोजगाराची हमी देणारी योजना राबवली जाणार आहे.

काय काम मिळणार?
‘गरीब कल्याण योजना’ या योजनेअंतर्गत कामगारांना २५ प्रकारची कामं दिली जाणार आहे. यामध्ये अंगणवाडी केंद्र, ग्रामीण रस्ते, ग्रामीण आवास, रेल्वेची कामं, सोलार पम्पसेट, फायबर ऑप्टिक केबल पसरवण्याचं काम अशा प्रकारची कामे असणार आहेत, अशी माहिती निर्मला सीतारमण यांनी दिली.

कोणत्या राज्यातील किती जिल्हे ?-
गरीब कल्याण रोजगार योजने अंतर्गत राजस्थानमधील २२, मध्यप्रदेशातील २४ उत्तरप्रदेशातील ३१ बिहारमधील ३२ तर ओडिशातील ४ आणि झारखंडमधील तीन जिल्ह्यात गरीब कल्याण रोजगार योजना राबविण्यात येणार आहे.

स्थलांतराची महाराष्ट्रातून संख्या जास्त –
देशातील विविध भागातून आपल्या गावी गेलेल्या स्थलांतरीत मजुरापैकी मोठी संख्या ही महाराष्ट्रातील आहे. मुंबई, पुणे, नाशिक या भागातून मोठ्या प्रमाणात मजूर आपल्या गावी गेले आहेत. या भागात बहुतांशी मजूर हे बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, झारखंड आणि ओडिशा या भागातील होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2020 12:58 pm

Web Title: know about pradhan mantri garib kalyan rojgar yojana nck 90
Next Stories
1 तुम्हाला माहितेय वीज कशी तयार होते? आणि वीज पडल्यास काय करावे?
2 इसवी सन पूर्व १००० ते २०२०: जाणून घ्या ३००० हून अधिक वर्षांचा इतिहास असणाऱ्या छत्रीचा प्रवास
3 तुमच्या जवळचं करोना चाचणी केंद्र कुठे आहे?; सांगणार गुगलचे ‘हे’ खास फिचर
Just Now!
X