प्रवासादरम्यान वाहतूक म्हणजेच ट्रॅफिक पोलिसांनी अडवू नये अशी अनेकजण प्रार्थना करतात. परंतु, कधीकधी भररस्त्यात ट्रॅफिक पोलीस हात दाखवून आपल्याला गाडी थांबवायला सांगतात. अशावेळेस अनेकांची भांबेरी उडते. ट्रॅफिक पोलीस आता चलन फाडतील किंवा कोणत्याही गुन्ह्यात अडकवतील म्हणून अनेकजण ट्रॅफिक पोलिसांना न जुमानता गाडी पळवत नेतात. पण, पोलिसांचे हात वरपर्यंत पोहोचलेले असतात. तु्म्ही त्यांच्या तावडीतून सुटलात तरी पुढचे ट्रॅफिक पोलीस तुम्हाला अडवतातच. त्यामुळे संभाव्य वाद-विवाद टाळण्यासाठी जेव्हा जेव्हा ट्रॅफिक पोलीस तुम्हाला अडवतात तेव्हा आपण गाडी थांबवून पोलिसांना सहकार्य करणं गरजेचं आणि कायदेशीर आहे. वाहतूक नियमांचं पालन करत असतानाही तुम्हाला ट्रॅफिक पोलिसांना अडवलं तर काय करायचं याबाबत आज आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत. जेणेकरून भविष्यात कधी तुम्हाला कुठे अडवलं गेलं तर गैरसमज न होता पोलिसांना सहकार्य कराल.
नियम मोडल्यावरच ट्रॅफिक पोलीस अडवत नाहीत
तुमची गाडी ट्रॅफिक पोलिसांनी अडवली म्हणजे तु्म्ही काही गुन्हा केलाय किंवा तुम्ही वाहतूक नियमांचं उल्लंघन केलंय असं होत नाही. तुमच्या गाडीत काही तांत्रिक अडचणी दिसल्या तरीही ट्रॅफिक पोलीस तुम्हाला अडवू शकतात. किंवा काही नियमित तपासणी करण्याकरता ट्रॅफिक पोलीस गाडी अडवतात. समजा, रात्रीच्या वेळी तुम्ही हेडलाईट्सशिवाय गाडी चालवत असाल किंवा तुमच्या गाडीचं टायर पंक्चर झालेलं असेल तरीही ट्रॅफिक पोलीस तुम्हाला अडवून त्याबाबतची माहिती देऊ शकतात.




हेही वाचा >> Indian Railway: ट्रेनचे तिकीट हरवले तर काळजी करु नका; जाणून घ्या फक्त ‘हा’ नियम
पोलिसांना सहकार्य करा
ट्रॅफिक पोलिसांकडून जेव्हा गाडी अडवली जाते तेव्हा त्यांना सहकार्य करा. कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्यांना सहकार्य करणं हे भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे. अन्यथा सरकारी कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी तुमच्यावर कारवाई होऊ शकते. पोलिसांनी गाडी थांबवण्याची सूचना केल्यावर गाडी एका बाजूला घेऊन थांबवावी. तुम्ही गाडी अशीच पळवत पुढे नेलात तरी तुम्हाला पुढचे ट्रॅफिक पोलीस पकडणारच असतात. त्यामुळे पुढील गोंधळ टाळण्यासाठी पोलिसांकडून जेव्हा अडवणूक होते तेव्हाच त्यांना सहकार्य करणं गरजेचं आहे.
वाहन सावकाश बाजूला घ्या
ट्रॅफिक पोलिसांनी गाडी थांबवण्याची सूचना केल्यानंतर सर्व वाहतूक नियमांचं पालन करून वाहन बाजूला घेणे गरजेचं आहे. तुम्ही मार्गिका बदलून पळून जाण्याचा प्रयत्न केलात तर मोठा अपघात होण्याची शक्यता असते.
हेही वाचा >> जनरल तिकिटासंबंधीत ‘हा’ खास नियम घ्या जाणून, अन्यथा तिकीट असतानाही भरावा लागू शकतो दंड
ट्रॅफिक पोलिसांना घाबरू नका
पोलिसांनी तुमची गाडी बाजूला घेण्यास सांगितल्यानंतर घाबरू नका. गाडी एका बाजूला लावल्यानंतर लागलीच गाडीच्या बाहेर येऊन पोलिसांशी अरेरावी करू नका. त्यापेक्षा खिडकीच्या काचा खाली करून पोलीस तुमच्या गाडीपर्यंत येण्याची वाट पाहा. गाडी थांबवल्यानंतर गाडीचं इंजिनही बंद करून ठेवा, जेणेकरून तुम्ही वेग मर्यादा ओलांडत नसल्याचंही पोलिसांना समजतं. त्यामुळे तुम्ही नियमांचं उल्लंघन केलं नसल्याचंही पोलिसांच्या लक्षात येतं.
नम्र वागा
ट्रॅफिक पोलिसांशी संवाद साधताना नेहमीच नम्रपणे वागा. जर तुमच्याकडून नियमांचं उल्लंघन झालं असल्यास नम्रपणे आपली चूक मान्य करा. जर, तुम्ही प्रामाणिकपणे आणि नम्रपणे तुमची चूक मान्य केली तर तुम्हाला ट्रॅफिक पोलीस फक्त सूचना देऊन सोडतील. तुम्ही वाद घालत बसालत तर ते तुम्हाला दंड आकारतील.
पोलिसांशी वाद घालू नका
तुम्ही कायद्याचं उल्लंघन केलं असेल तर पोलिसांशी वाद घालण्यात काहीच अर्थ नाही. तुम्ही कायद्यांचं उल्लंघन केलं नसलं तरीही तुम्ही शांत राहणं गरजेचं आहे. ट्रॅफिक पोलिसांनी तुम्हाला का अडवलं आहे हे शांतपणे समजून घ्या. त्यानंतर, तुम्ही तुमचं म्हणणं मांडा.
पोलिसांना लाच देऊ नका
तुमच्याकडून एखादा गुन्हा झाला असेल तर प्रकरण मिटवण्याकरता पोलिसांना लाच देऊ नका. त्यापेक्षा प्रामाणिकपणे दंडाची रक्कम भरून पावती घ्या. कराण, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून जोरदार कारवाई सुरू असल्याने या लाचप्रकरणात तुम्हीच अडकण्याची शक्यता आहे.
पोलीस तुमची गाडी जप्त करू शकतात
तुमच्याकडून वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन झालं असेल, चालकाने वाहतुकीचा परवाना सोबत ठेवला नसेल. वाहनाचा विमा कवच नसेल, पीयुसी काढलेली नसेल किंवा तुमचे वाहन नो पार्किंग झोनमध्ये उभे असेल तर ट्रॅफिक पोलीस तुमचं वाहन जप्त करू शकतात.
चालकालाही घेऊ शकतात ताब्यात
चालकाकडून वाहतूक नियमांचं उल्लंघन झालं असेल तर चालकाला तत्काळ ताब्यात घेण्याचे अधिकार वाहतूक पोलिसांना आहेत. तसंच, २४ तासांच्या आत तुम्हाला न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले जाते.