ATM Card Safety Tips: बँकिंग क्षेत्रामधील सर्वच गोष्टी आता डिजिटल झाल्या आहेत. आजकाल जेव्हा जेव्हा पैशाची गरज भासते तेव्हा तेव्हा आपण एटीएम कार्ड (ATM Card) वापरून पैसे काढतो. पण, एटीएम कार्ड वापरताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे; अन्यथा एका चुकीमुळे तुम्हाला खूप त्रास होऊ शकतो. कारण- देशात एटीएम कार्ड फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. बँकाही आपल्या ग्राहकांना एटीएम फसवणुकीबाबत वेळोवेळी सावध करीत असतात. नुकताच सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की, जर तुम्ही एटीएममधून पैसे काढताना दोनदा ‘कॅन्सल’ बटण दाबले, तर तुमच्या डेबिट कार्डचा पिन कोड सुरक्षित राहील आणि कोणतीही फसवणूक शक्य होणार नाही. पण खरंच ATM मधील ‘कॅन्सल’ बटण दोनदा दाबल्याने, असं होणार आहे का? चला तर जाणून घेऊ याबाबत सरकार काय सांगतं…
या व्हायरल मेसेजमध्ये लोकांना पैसे काढण्यापूर्वी दोनदा ‘कॅन्सल’ बटण दाबण्याची सवय लावण्याचे आणि ही युक्ती तुमच्या ओळखीच्या लोकांना शेअर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. इतकेच नव्हे, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय)ने हा सल्ला दिल्याचा दावाही मेसेजमध्ये करण्यात आला आहे. पण, वास्तव काही वेगळेच आहे. पीआयबीने आपल्या अधिकृत X हँडलवर स्पष्ट केले की, हा मेसेज आरबीआयने जारी केलेला नाही. याला कोणताही तांत्रिक आधार नाही.
असा मेसेज व्हायरल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी २०२२ आणि २०२३ मध्येही असाच दावा करण्यात आला होता, ज्याला पीआयबीने तेव्हाही खोटे म्हटले होते. म्हणजेच तीच चुकीची माहिती लोकांना वारंवार दिली जात आहे. मग एटीएम वापरताना कोणती खबरदारी घ्यावी ते जाणून घ्या…
एटीएम पिनचोरी टाळण्याचे खरे मार्ग
तज्ज्ञ म्हणतात की, एटीएम सुरक्षेबाबत तुम्ही नेहमीच व्यावहारिक खबरदारी घेतली पाहिजे. जर तुम्हाला असा कोणताही मेसेज खरा वाटत असेल, तर आताच सावधगिरी बाळगा. पीआयबीने एटीएम वापरकर्त्यांना कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, असा सल्ला दिला आहे. एटीएम वापरताना काळजी घ्या; जसे की, पिन टाकताना हाताने कीपॅड झाकणे, जेथे पुरेसा प्रकाश व सुरक्षित ठिकाण आहे तेथील एटीएम वापरणे आणि मशीन वापरण्यापूर्वी एकदा काळजीपूर्वक पाहणे; जेणेकरून त्यात कोणतेही उपकरण किंवा छेडछाड केली गेलेली नाही ना याची खात्री करून घ्या. बँक खात्यावर नियमित लक्ष ठेवा. अलर्ट सेवा सुरू ठेवा.