पेट्रोलची एक्सपायरी डेट असते असं जर कोणी तुम्हाला सांगितलं तर अनेकांचा यावर विश्वास बसणार नाही. परंतु, हे सत्य आहे की, इतर वस्तूंप्रमाणे पंपावरून खरेदी केलेलं पेट्रोल आणि डिझेलचा वापर करण्यासाठी मर्यादित कालावधी असतो. कारण वाहनाच्या टाकीत भरलेलं पेट्रोल काही महिन्यांत खराब होतं. हे खराब इंधन वापरलं तर सर्वात आधी वाहनाच्या मायलेजवर परिणाम होतो आणि नंतर वाहनाचं इंजिन खराब होऊ शकतं. पेट्रोल किंवा डिझेल एखाद्या सीलबंद कंटेनरमध्ये भरून २० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानात ठेवल्यास ते सहा महिने ते एक वर्ष टिकू शकतं. परंतु, तेच पेट्रोल वाहनाच्या टाकीत भरलेलं असेल तर त्या पेट्रोलचं आयुष्य केवळ तीन महिने इतकंच असतं.

इंधन सीलबंद कंटेनरमध्ये भरून ठेवलेलं असेल आणि बाहेरचं तापमान ३० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असेल तर त्या पेट्रोलचं आयुष्य केवळ तीन महिने इतकंच असतं. तसेच इंधन हे वाहनाच्या टाकीत भरून ठेवलेलं असेल आणि आसपासचं तापमान हे ३० अंश किंवा त्याहून अधिक असेल तर त्या इंधनाचं आयुष्य एका महिन्याहून कमी असतं. डिझेलचं आयुष्यदेखील पेट्रोलसारखंच असतं. तसेच डिझेल सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ टाकीत किंवा कंटेनमध्ये साठवून ठेवलं तर ते घट्ट आणि चिकट होतं. ज्यामुळे वाहनाचं इंजिन खराब होऊ शकतं. मुंबईसह महाराष्ट्रातलं सरासरी तापमान २२ ते ३४ अंशांच्या दरम्यान आहे. त्यामुळे वाहनाच्या टाकीत एक महिन्यापेक्षा जास्त काळ पेट्रोल किंवा डिझेल साठवून ठेवू नये.

वाहनाच्या टाकीत इंधन भरून ठेवलेलं असेल आणि एक महिन्याहून अधिक काळ ते वाहन चालवलं नसेल तर त्या इंधनाने वाहनाचं इंजिन खराब होऊ शकतं. अशा वेळी टाकीत ७० टक्के नवीन (फ्रेश) इंधन भरून वाहन चालवता येईल. ज्यामुळे वाहनाचं इंजिन खराब होण्याची शक्यता कमी असेल.

हे ही वाचा >> सर्वांत जास्त पाकळ्या असलेलं फुल कोणतं माहितेय? जाणून घ्या निसर्गाची अजब किमया!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

क्रूड ऑईल म्हणजेच कच्च्या तेलापासून पेट्रोल आणि डिझेल तयार होतं. कच्चं तेल रिफाईन करून पेट्रोल आणि डिझेल बनतं. या रिफायनिंग प्रक्रियेदरम्यान अनेक प्रकारचे केमिकल वापरले जातात. तसेच भारतासह जगभरातल्या अनेक देशांमध्ये पेट्रोल आणि डिझेलमध्ये इथेनॉल मिसळलं जातं. या केमिकल आणि इथेनॉलमुळे पेट्रोल-डिझेलचं आयुष्य कमी होतं. खूप दिवस वाहनाच्या टाकीत हे रिफाईन पेट्रोल साठवून ठेवल्याने यातल्या केमिकल्सची वाफ तयार होते. परंतु, टाकी बंद असल्यामुळे ही वाफ बाहेर निघू शकत नाही. परिणामी या वाफेमुळे पेट्रोल सडू लागतं. या खराब पेट्रोलमुळे वाहनाचं इंजिन खराब होऊ शकतं.