तुमच्या-आमच्या दैनंदिन जीवनातली अत्यंत आवश्यक असलेली एक वस्तू म्हणजे साबण. साबण लावल्याशिवाय आपली अंघोळ होत नाही. पूर्वीच्या काळात लोक उटणं, विविध प्रकारचे लेप लावायचे. दिवाळीत अजूनही उटणं अंगाला लावून अंघोळ करण्याची पद्धत आहे. मात्र साबण हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. पण तुम्हाला माहित आहे का? साबण हा शब्द मराठी भाषेतला नाही. हा शब्द मराठी भाषेत कुठून आला ? साबण या शब्दासाठी वापरण्यात आलेला मूळ शब्द काय होता? हे आपण जाणून घेऊ.

साबण या शब्दाचा इतिहास काय आहे?

साबण हा शब्द मराठी शब्द नाही. जुन्या लॅटिन भाषेतील ‘सॅपॉ’चं ते मराठी रुप आहे. लॅटिन भाषेतला ‘सॅपोनेम’ पोर्तुगीज भाषेत ‘सॉबओ’ झाला तर ग्रीक भाषेत त्याचा उच्चार झाला ‘सॅपौनी’. फ्रेंच लोक त्याला सॅव्हॉन म्हणू लागले. इंग्रजीत त्याला ‘सोप’ म्हणतात. बंगालीत ‘साबन’ म्हणू लागले. त्यानंतर हिंदीत त्याला ‘साबुन’ असं म्हटलं जातं. हा शब्द मराठीत आला तेव्हा त्याचा शब्द झाला ‘साबण’. लॅटिन भाषेतला ‘सॅपॉ’ असा प्रवास करत मराठीत आला तेव्हा त्याचा ‘साबण’ झाला. सतराव्या शतकात इंग्लंडने साबणावर करही लावला होता. साबण हा श्रीमंताच्या चैनीची गोष्ट आहे असं त्यांनी म्हटलं होतं. नंतर हा कर हटवला गेला. त्यानंतर साबण हा सामान्यांच्या हाती आला.

भारतात साबणाचं मूळ कशात आढळतं?

रिठ्याची पावडर, मध, चंदनाची उटी, वाळ्याचं तेल, पपईचं पान आणि कडुलिंबाचा रस किंवा पानं एकत्र करुन आपले पूर्वज उत्तम प्रतिचं अंघोळीचं द्रव्य तयार करत असत. मात्र आता साबण खूपच प्रचलित झाला आहे. विविध कंपन्यांनी मार्केटिंगसाठी अभिनेत्रींना घेऊन हा साबण घराघरांत पोहचवला आहे यात काहीच शंका नाही.
सदानंद कदम लिखित ‘कहाणी शब्दांची’ या पुस्तकात ही माहिती देण्यात आली आहे. साबण आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला असला तरीही तो मूळचा लॅटिन शब्द आहे हे विसरु नका.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुकाराम महाराजांनी “नाही निर्मळ जीवन काय करील साबण?” असंही म्हटलं आहे. तुकाराम महाराजांच्या काळातही साबण हाच शब्द प्रचलित होता. मात्र या शब्दाचं मूळ लॅटिन भाषेत आढळतं.