Plastic In Water Bottle: असंच काय बाई कुठलंही पाणी प्यायचं म्हणून आपल्यापैकी अनेकजण छान पॅक केलेल्या प्लास्टिकच्या फॅन्सी पाण्याच्या बॉटल्स विकत घेत असतील. झऱ्यातून काढून आणलंय, हिमालयाच्या कुठल्यातरी निर्मनुष्य ठिकाणाहून थेट मागवलंय अशा जाहिराती करणाऱ्या अनेक पाणी विक्रेत्यांचे ब्रँड्स जगात प्रसिद्ध आहेत. पण आज आपण एका असा संशोधनाविषयी जाणून घेणार आहोत जो वाचून पुढच्या वेळी अशा पाण्याच्या बाटल्या विकत घेण्याआधी तुम्ही दहा वेळा विचार कराल. नव्याने प्रकाशित झालेल्या एका संशोधनात असे समोर आले की या पूर्णपणे बंद बाटलीच्या सरासरी एका लिटर पाण्यात सुमारे १ ते ४ लाख नॅनोप्लास्टिक्सचे अदृश्य तुकडे असू शकतात.

बाटलीबंद पाण्यात सूक्ष्म प्लास्टिकचे तुकडे असतात ही काही नवी माहिती नाही पण या प्लास्टिकच्या तुकड्यांचे नेमके प्रमाण किती हे जाणून घेण्यासाठी हा अभ्यास झाला होता. कोलंबिया युनिव्हर्सिटी आणि रटजर्स युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी प्रोसिडिंग्ज ऑफ द नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेसमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात याविषयीची निरीक्षणे नोंदवली आहेत. संशोधकांनी लिहिल्याप्रमाणे प्लास्टिकच्या कणांची पातळी प्रति लिटर १ लाख १० हजार ते ४ लाख किंवा सरासरी २ लाख ४० इतकी असू शकते.

इंडियन एक्सस्प्रेसच्या वृत्तानुसार, या संशोधनासाठी नवीन-विकसित लेझर तंत्रज्ञानाचा वापर केला गेला होता, ज्या माध्यमातून अगदी लहान तुकड्यांचा शोध घेणे शक्य झाले. यामुळे बाटलीबंद पाण्यात आढळून आलेल्या प्लास्टिक कणांची संख्या पूर्वीपेक्षा दहाने आणि काही प्रकरणांमध्ये १०० पेक्षा जास्त आढळून आली होती. AP च्या मते, हे कण मुख्यतः प्लास्टिकच्या बॉटलमधूनच पाण्यात मिसळत होते तर अन्य मोठा भाग रिव्हर्स ऑस्मोसिस मेम्ब्रेन फिल्टरमधून जो इतर दूषित पदार्थांपासून पाण्याला सुरक्षित ठेवण्यासाठी वापरला जातो, त्यातून पाण्यात मिसळत होते.

स्मिथसोनियन मॅगझीननुसार, बाटलीबंद पाण्यात आढळलेल्या प्लास्टिकच्या तुकड्यांचे आकार वेगवेगळे दिसतात ज्यावरून ते कशामुळे त्यात मिसळले गेले असतील याचा अंदाज बांधता येतो. पॉलीथिलीन टेरेफ्थालेट (पीईटी), उदाहरणार्थ, बारीक तुकडे हे टोकेरी दिसून येतात जे मुख्यतः बाटल्यांमधूनच मिसळले गेले असावेत कारण बाटल्या सुद्धा याच पीईटीचा वापर करून बनवल्या जातात.

बाटलीबंद पाण्याच्या उत्पादनाच्या सुरुवातीच्या काळात बाटलीत जमा होणारे काही प्लास्टिकचे कण अत्यंत सूक्ष्म स्वरूपात आढळून आले होते. संशोधकांना पॉलिमाइड आणि पॉलिस्टीरिन प्लास्टिक देखील सापडले. वास्तविक पाणी फिल्टर करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या फिल्टरचेच प्लास्टिक अशाप्रकारे पाण्यात मिसळले जाणे हे उपरोधिक बाब सुद्धा यामध्ये संशोधकांनी अधोरेखित केली.

आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे प्लास्टिकचे नॅनो कण आरोग्यासाठी घातक आहेत का? तर याबाबत सध्या तपास सुरु आहे. हे प्लास्टिक कितपत धोकादायक आहे यावर संशोधन सुरु आहे. हे कण निश्चितच मानवासह अन्य सस्तन प्राण्यांच्या शरीरातील ऊतकांमध्ये जाऊन अडकत असणार पण त्याचा पेशींवर नेमका काय व किती प्रमाणात प्रभाव पडतो याचा अभ्यास होणे गरजेचे आहे, असे रटगर्स येथील विषशास्त्रज्ञ व अभ्यासाचे सह-लेखक फोबी स्टॅपलटन यांनी सांगितले .

हे ही वाचा<< सिगारेट ओढण्याची इच्छा वाढवतात ‘हे’ पदार्थ, त्यांना पर्याय काय? धूम्रपान सोडायचं असल्यास आधी काय करावं?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, चारही सह-लेखकांनी कबूल केले की त्यांना अभ्यासादरम्यान जे आढळले ते पाहिल्यावर आता ते स्वतः त्यांच्या बाटलीबंद पाण्याच्या वापरात कपात करतील हे निश्चित.