Holi 2023: होळीचा सण भारतभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आपल्याकडे होळी म्हणजे रंग असे समीकरण आहे. शहरांमध्ये होळीच्या दुसऱ्या दिवशी रंग खेळले जातात. पण होळीनंतर ४ ते ५ दिवसांनी रंगपंचमी येते. त्यामुळे हा रंगांचा सण कधी साजरा करावा याबाबतचा गोंधळ अनेकांच्या मनात निर्माण होत असतो. उत्तर भारतीय परंपरांच्या प्रभावामुळे आपल्याकडे सण साजरा करण्याच्या पद्धतीमध्ये बदल होत गेले आहेत. अशाच या बदलामुळे लोकांचा होलिका दहन, धुळवड आणि रंगपंचमी यांमध्ये फरक ओळखता येत नाही.
फाल्गुन शुक्ल पौर्णिमेच्या दिवशी होलिका दहन असते. यासाठी लाकूड, गवत, शेणाच्या गोवऱ्या अशा काही गोष्टी एकत्र करत त्यांची मोठी मोळी तयार केली जाते. त्यावर सजावट करत होलिकेचे प्रतीक म्हणून तिची पूजा केली जाते. पूजा करताना घरी बनवलेल्या गोडाच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. पूजा पूर्ण झाल्यानंतर त्या मोळीला अग्नी दिला जातो. दहन सुरु असताना त्यात नारळ, नैवेद्य असे काही पदार्थ समर्पित केले जातात.
धुळवड म्हणजे काय?
होलिका दहन झाल्यानंतर त्या मोळीची उरलेली राख एकत्र केली जाते. दहनानंतर तयार झालेल्या राखेने दुसऱ्या दिवशी सकाळी धुळवड खेळली जाते. या राखेमध्ये मातीही समाविष्ट झालेली असते. सगेसोयरे, मित्रमंडळी एकमेकांच्या अंगावर राख लावून हा सण साजरा करतात. गावी आजही अशा प्रकारे धुळवड खेळली जाते. धुळवडला ‘धूलिवंदन’ असेही म्हटले जाते.
रंगपंचमी म्हणजे काय?
फाल्गुन कृष्ण पंचमीच्या दिवशी महाराष्ट्रभर रंगपंचमीचा उत्सव साजरा केला जातो. खऱ्या अर्थाने या दिवशी रंग खेळण्याची आपल्याकडे प्रथा आहे. होलिका दहनानंतर पाच दिवसांनी येणारा रंगोत्सव प्रामुख्याने ग्रामीण भागांमध्ये साजरा होतो.
उत्तर भारतामध्ये होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी रंग खेळले जातात. कालानुरुप या परंपरेचा प्रभाव आपल्याकडे होत गेला आणि धुलिवंदनाच्या दिवशी रंग खेळण्याची सवय लोकांना झाली. पण यामुळे धुळवड आणि रंगपंचमी याबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. काहीजणांना हे दोन्ही सण एकच आहेत असा गैरसमज आहे.