India’s Secret River: आपल्या भारत देशात १०० हून अधिक मुख्य नद्या, तसेच त्याहून अधिक उपनद्या आहेत. नद्यांमुळे आसपासच्या गावाला, शहराला सौंदर्य प्राप्त होते. त्याशिवाय त्यामुळे नदीच्या आसपासचा परिसर खूप समृद्ध आणि सुंदर दिसतो. भारतातील काही नद्या त्यांच्या वेगळेपणामुळे ओळखल्या जातात. नुकतीच काही दिवसांपूर्वी आपण उलट्या दिशेने वाहणाऱ्या नर्मदा नदीबद्दलची माहिती जाणून घेतली होती. आज अशाच एका रहस्यमय नदीबद्दल जाणून घेऊन आहोत, जी आता गुप्त झालेली आहे.
भारतातील गुप्त नदी
गंगा, यमुना व सरस्वती या तीन नद्यांची नावे अनेक प्राचीन ग्रंथ, श्लोकांमध्ये तुम्ही ऐकली असतील. गंगा व यमुना या दोन्ही नद्या आपण आजही प्रत्यक्षात पाहतो. परंतु, सरस्वती नदी नक्की कुठे आहे? हे कोणालाच ठाऊक नाही. सरस्वती नदीला भारतीय संस्कृतीत महत्त्वाचे स्थान प्राप्त आहे. भारतीय प्राचीन ग्रंथ, पौराणिक कथांमध्ये सरस्वती नदीचा उल्लेख मिळतो; परंतु हीच नदी आता कुठेही दिसत नाही. असे म्हणतात की, प्राचीन काळात ही नदी भारताच्या उत्तर-पश्चिम भागातून वाहत होती आणि या नदीच्या किनाऱ्यावर हडप्पा संस्कृती विकसित झाली होती.
सरस्वती नदी का गुप्त झाली?
सरस्वती नदी गुप्त होण्यामागे अनेक कारणे सांगितली जातात. पौराणिक कथेनुसार, भगवान गणेशाने या नदीला गुप्त होण्याचा शाप दिला होता. त्यामुळे ही नदी गुप्त झाली, असे म्हटले जाते. तर, वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहायल्या गेल्यास, भूगर्भीय बदलांमुळे या नदीचा मार्ग बदलला आणि जलवायू परिवर्तनामुळे नदी सुकू लागली.
सरस्वतीचा भूमिगत प्रवाह
अनेकांच्या मते, सरस्वती आजही भूमिगत प्रवाहाने वाहते. काही वैज्ञानिक आणि भूगर्भशास्त्रज्ञांनीही या मताला दुजोरा दिला आहे. हिमालयापासून हरियाणा, पंजाब व राजस्थानमधून पुढे गुजरातमधील खंबातच्या आखातपर्यंत ही नदी भूमिगत रूपात वाहते. वैज्ञानिकांच्या मते, भूकंपामुळे या नदीचा मार्ग बदलला असून, ती रेती आणि मातीच्या खाली दबली गेली आहे. आजही अनेक वैज्ञानिक आणि भूगर्भशास्त्रज्ञ या नदीचे अवशेष शोधत आहेत.
सरस्वती नदीचे धार्मिक महत्त्व
सरस्वती नदी आता गुप्त असली तरीही एकेकाळी गंगा नदीप्रमाणेच या नदीला अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानले जात होते. या नदीला साक्षात ज्ञान, विद्या व कलेची देवी सरस्वतीचे स्वरूपदेखील मानले जायचे. या नदीच्या काठावर बसून अनेक ऋषी-मुनींनी जप, तप करण्यासह वेदांची रचना केली होती. आजही प्रयागराज क्षेत्री गंगा, यमुना आणि गुप्त स्वरूपात असलेल्या सरस्वती नदीचा त्रिवेणी संगम पाहायला मिळतो. लाखो भाविक दरवर्षी त्या ठिकाणी दर्शनासाठी जातात.