ITR filing 2025: नवीन कर प्रणाली अधिकाधिक आकर्षक बनवण्यासाठी सरकार अनेक घोषणा करत आहे. २०२५-२६ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या नवीन कर प्रणाली अंतर्गत नवीन कर रचनेमुळे ४ लाख रुपये आणि त्याहून अधिक उत्पन्न असलेल्या सुमारे ५.६५ कोटी करदात्यांना फायदा होण्याची अपेक्षा आहे. याद्वारे नोकरदारांना मोठी कर सवलत मिळणार आहे.

तुम्ही नवीन कर प्रणाली निवडली आहे का? आणि तुमची कर बचत कशी वाढवायची हे समजून घेण्याचा प्रयत्न करत आहात का? मग, नव्या कर प्रणालीद्वारे मिळणारे फायदे आणि या प्रणालीमध्ये कोणते नवीन बदल केले गेले आहेत हे समजून घेऊया.

येथे, आपण तीन डिडक्शन्सबद्दल (वजावटींबद्दल) जाणून घेणार आहोत, ज्यामुळे करदात्यांना नवीन कर प्रणाली अंतर्गत जास्तीत जास्त कर सवलत कशी मिळवण्यासाठी याती मदत होऊ शकते.

स्टँडर्ड डिडक्शन

ही एक निश्चित रक्कम असते, जी करदात्यांच्या एकूण उत्पन्नातून वजा करता येते जेणेकरून करपात्र उत्पन्नाची रक्कम कमी होईल. पगारदार व्यक्तींना ७५,००० रुपयांपर्यंतच्या स्टँडर्ड डिडक्शनचा दावा करता येतो. अर्थमंत्री सीतारमण यांनी २०२४ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात स्टँडर्ड डिडक्शनची रक्कम ५०,००० रुपयांवरून ७५,००० रुपये केली. याचा अर्थ असा की पगारदार करदात्यांना २०२५ मध्ये आयटीआर भरताना ७५,००० रुपयांच्या स्टँडर्ड डिडक्शनचा लाभ घेता येईल.

राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS)

ही एक सरकारी पेन्शन योजना आहे जी निवृत्तीनंतर नोकरदारांना आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी सुरू करण्यात आलीआहे. कलम 80CCD (1B) अंतर्गत राष्ट्रीय पेन्शन प्रणाली निधी मध्ये गुंतवणूक केल्यास कर कपातीचा दावा करता येतो. करदाते NPS मध्ये गुंतवलेल्या त्यांच्या मूळ पगाराच्या १४ टक्क्यांपर्यंत डिडक्शन करू शकतात. राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये नियोक्त्याचे योगदानही डिडक्शनसाठी पात्र आहे.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी

सरकारच्या पाठिंब्याने चालवली जाणारी कर्मचारी भविष्य निर्वाह नि ही एक निवृत्ती बचत योजना आहे. ज्याद्वारे पगारदार वर्गाला निवृत्तीसाठी बचत करता येते. ही योजनेचे सरकारी संस्था कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेद्वारे व्यवस्थापन केले जाते आणि ही संघटना कामगार मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते. नवीन कर प्रणालीतील नियमांनुसार नियोक्त्याचे कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमधील योगदान (मूळ पगाराच्या १२ टक्के) देखील कर-सवलतयोग्य आहे.