अन्न आणि पाण्याशिवाय माणूस किती दिवस जगू शकतो असं जर तुम्हाला कोणी विचारलं तर तुम्ही साधारण दोन दिवस, चार दिवस किंवा एक आठवडा असे उत्तर द्याल. माणसाप्रमाणे प्राण्यांच्या बाबतीतही हेच सूत्र आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की, पृथ्वीवर असे अनेक जीव आहेत, जे काही न खाता अनेक महिने जगू शकतात. यातील काही प्राणी तर पाणी न पिताही जगतात. यातील बरेच प्राणी तुम्हाला माहितीदेखील आहेत, पण ते अशाप्रकारेही जगू शकतात हे कोणास ठावूक नाही. जाणून घ्या या प्राण्यांबद्दल रंजक गोष्ट….

मधमाश्या

मधमाश्या आपल्या शरीरात बनवलेल्या मधाच्या पोळ्यात मध साठवतात. जो हिवाळ्यात त्यांच्यासाठी अन्नाचा एक महत्त्वाचा स्त्रोत असतो. थंडीमुळे या मधमाशा अनेक महिने चारा खात नाहीत. कारण राणी मधमाशी यावेळी तिच्या पोळ्यातून बाहेर पडत नाही.

आफ्रिकन लंगफिश

आफ्रिकन लंगफिश पश्चिम आणि दक्षिण आफ्रिकेतील गोड्या पाण्यातील दलदल आणि लहान नद्यांमध्ये आढळतात. लहान डोळे आणि शरीरावर काळे किंवा तपकिरी डाग असलेला हा मासा काही न खाता-पिता बराच काळ पाण्याबाहेर राहू शकतो. याचे कारण म्हणजे त्याच्या शरीरात एक विशेष प्रकारची यंत्रणा असते, जी त्याला बराच काळ जिवंत राहण्यास मदत करते.

उंट

राजस्थानमध्ये आढळणारा उंट सहा महिने पाण्याशिवाय जगू शकतो. त्याला अनेक आठवडे जेवण दिले नाही तरी त्याच्या तब्येतीवर कोणताही परिणाम होत नाही. तुम्ही त्याच्या पाठीवर कुबडा पाहिला असेल, इथेच चरबी जमा होते. जे आवश्यकतेनुसार पाण्यात किंवा ऊर्जेमध्ये रूपांतरित होते. या प्राण्याने त्याची चयापचय प्रणाली स्वतः अशी बनविली आहे. विशेष म्हणजे शरीरात तो एकाचवेळी हंडाभर पाणी साठवून ठेवू शकतो.

गिला मॉन्स्टर

गिला मॉन्स्टर ही सरड्याची अतिशय विषारी जात मानली जाते. त्याच्या आत चरबीचा साठा असतो, ज्यामुळे ते महिनोनमहिने काहीही न खाल्ल्याशिवाय जगू शकतात. आजपर्यंत गिला मॉन्स्टरच्या चाव्यावर कोणतेही औषध बनलेले नाही. हे सामान्यतः नैऋत्य अमेरिका आणि वायव्य मेक्सिकोमध्ये आढळतात. हे वाळवंटातील झुडुपे, वाळवंटी गवताळ प्रदेश, दऱ्यांमध्ये राहणे पसंत करतात.

कोमोडो ड्रॅगन

कोमोडो ड्रॅगन हा जंगलातील काही निर्दयी भक्षकांपैकी एक आहे. त्याच्या तोंडातून बाहेर पडणाऱ्या लाळेमध्ये घातक विष आढळते. हा प्राणी हरणाचे वासरू, डुकराचे डोके किंवा अर्धी शेळी एकाच वेळी गिळू शकतो. तो अनेक आठवडे किंवा महिने न खाता राहू शकतो. त्याच्याकडे अन्न खूप हळू पचण्याची विशेष क्षमता असते.

वाळवंटातील कासव

वाळवंटातील कासव सुमारे ५० ते ८० वर्षे जगू शकतात. ते ४ अंश सेल्सिअस तापमान आणि अगदी ६० अंश सेल्सिअस तापमानातही जिवंत राहू शकतात. ते त्यांच्या मूत्राशयात पाणी साठवतात. या पाण्याचे ऊर्जेत रूपांतर करून ते आपल्या अनेक महिन्यांच्या अन्नाच्या गरजाही पूर्ण करतात.