श्रद्धांजली आणि आदरांजली हे आपल्या कानांवर अनेकदा पडणारे शब्द आहेत. एखादी दुर्घटना घडते, अपघात होतो, त्यात लोक मृत्यमुखी पडतात त्यावेळी त्यांच्याविषयी मनातल्या भावना व्यक्त करताना मुख्यमंत्री, पंतप्रधान यांच्याकडून या शब्दांचा वापर केला जातो. एखाद्याच्या मृत्यूची बातमी ऐकली की आपणही मेसेजवर लिहितो ‘भावपूर्ण श्रद्धांजली’. अमुक अमुक नेत्यांनी आदरांजली वाहिली असेही शब्दप्रयोग आपण वाचतो. मात्र श्रद्धांजली आणि आदरांजली या दोन शब्दांमधला नेमका फरक काय? हे दोन शब्द कधी वापरले जातात? हे आपण समजून घेणार आहोत.

आदरांजली आणि श्रद्धांजली यातला फरक काय?

अंजली म्हणजे ओंजळ. ओंजळी फुलं घेऊन अर्पण केली की त्याला पुष्पांजली असं म्हटलं जातं. आदरांजली आणि श्रद्धांजली या दोन शब्दांमध्ये किंचीतसा फरक आहे. त्यामुळे हे दोन शब्द वापरताना अनेकांची गल्लत होते. श्रद्धेने अर्पण केलेली असते श्रद्धांजली. आदरपूर्वक अर्पण करतात ती आदरांजली. श्रद्धा आणि आदर यांच्यात सूक्ष्म फरक आहेच. आदर हा ज्ञात गोष्टींशी, व्यक्तींशी संबंधित असतो. तर श्रद्धा ही अज्ञात गोष्टींशी संबंधित असते. ज्यांच्याविषयी आदर वाटतो त्यांना द्यायची आदरांजली. दिवंगत व्यक्तींना वाहायची ती श्रद्धांजली. असा या दोन शब्दांचा अर्थ आहे.

अनेकदा नेतेही श्रद्धांजली आणि आदरांजली हे शब्द वापरताना गल्लत करतात हे दिसून आलं आहे. भावपूर्ण श्रद्धांजली, भावपूर्ण आदरांजली असंही म्हटलं जातं. पोस्ट केलं जातं. मात्र हे दोन शब्द कधी आणि का? वापरायचे याचं हे कहाणी शब्दांची या पुस्तकात सदानंद कदम यांनी स्पष्ट केलं आहे. बड्या नेत्याच्या मृत्यूची बातमी, अपघाती मृत्यूंची बातमी अशा बातम्या येत असतात. त्यावेळी इंग्रजी भाषेत Condolence हा शब्दही वापरला जातो. मात्र मराठी भाषेत आदरांजली आणि श्रद्धांजली हे दोन शब्द आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

श्रद्धांजली आणि आदरांजली शब्द कधी वापरतात?

‘कहाणी शब्दांची-मराठी भाषेच्या जडणघडणीची’ या सदानंद कदम लिखित पुस्तकात हा अर्थ देण्यात आला आहे. मराठ्यांचा इतिहास आणि मराठी साहित्य हे सदानंद कदम यांनी अभ्यासलेले विषय आहेत. अनेकदा चुकीचे शब्द वापरले जातात. ते शब्द योग्य कसे आहेत हे सांगण्याचा यथार्थ प्रयत्न त्यांनी आपल्या पुस्तकातून केला आहे. श्रद्धांजली आणि आदरांजली हे शब्द वापरताना अनेकांकडून अनेकदा चूक होते. तो शब्द नेमका कसा वापरायचा आणि त्या दोन्ही शब्दांचा अर्थ काय हे आपल्याला आता समजलं आहेच.