Hush Trips: कोरोनासारख्या महामारीमुळे जगभरातील लोकांचे आयुष्य विविध पद्धतींनी बदलले. त्यातील सर्वांत मोठा आणि महत्त्वाचा भाग म्हणजे काम करण्याची ‘वर्क फ्रॉम होम’ ही पद्धत. २०२० पासून जगभरातील अनेक कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची परवानगी दिली. चार वर्षांनंतर कोविडप्रेरित निर्बंध मोठ्या प्रमाणात उठवण्यात आले. परंतु, वर्क फ्रॉम होम ही संकल्पना आजही लोकप्रिय आहे. विशेषत: प्रवासखर्च आणि वेळ यांची बचत होत असल्याने तरुण मंडळींना घरून काम करण्याचे स्वातंत्र्य आवडते. परंतु, आता सर्वांचे रुटीन सामान्य झाल्यावर आणि अनेक महिन्यांच्या साथीच्या आजाराशी संबंधित निर्बंधांनंतर या वर्षी ‘हश ट्रिप’ हा आणखी एक ट्रेंड अधिक लोकप्रिय होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
हश ट्रिपचा वाढतोय ट्रेंड
फॉर्च्युन मधील एका अहवालानुसार, ‘वर्क फ्रॉम होम’ करणारे कर्मचारी त्यांच्या कंपन्या किंवा बॉसला न कळवता, ज्या सुट्या घेतात त्यांना ‘हश ट्रिप’ असे म्हटले जाते. बऱ्याच कंपन्या अद्याप ‘वर्क फ्रॉम होम’ संकल्पनेचे अनुसरण करीत असले तरी कोठूनही काम करणे अनिवार्य नाही. त्यामुळे वेगवेगळ्या शहरांमधून किंवा देशांतून लॉग इन करणाऱ्या कर्मचाऱ्यांची निराशा होऊ शकते. अनेकांचे ‘वर्क फ्रॉम होम’मध्ये विविध ठिकाणांहून लॉग इन करणे सतत वाढत चालले आहे. अनेक जण ‘वर्क फ्रॉम होम’ करताना मर्यादित वेळेसाठी वैयक्तिक कामही करतात. त्याशिवाय अनेक जण एक किंवा दोन आठवडे त्यांच्या बॉसला न सांगता, असे करतात.
‘हश ट्रिप’साठी ठराविक प्रमाणात नियोजन करण्याची आवश्यकता असू शकते. उदाहरणार्थ- झूम कॉलसाठी कर्मचाऱ्यांना त्यांच्या समुद्रकिनाऱ्यावरील सुटीमध्ये स्वेटर घालण्यास भाग पाडले जाऊ शकते किंवा वेगळ्या देशामध्ये किंवा शहरात असल्यास तेथील वेळेनुसार अवेळीदेखील लॉग इन करावे लागू शकते.
RV रेंटल मार्केटप्लेस RVShare आणि Wakefield Research द्वारे केलेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की, ५६% अमेरिकन लोकांनी २०२३ मध्ये ‘हश ट्रिप’मध्ये सहभागी होण्याचे धाडस केले होते.
हश ट्रिपचे फायदे आणि तोटे
हश ट्रिपची संकल्पना फसवी वाटत असली तरी अनेकांच्या मते, अशी ट्रिप खरोखरच त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी चांगली आहे. उदाहरणार्थ- एका जर्मन कर्मचाऱ्याने इनसायडरला सांगितले की, हिवाळ्यात कॅनरी बेटांवर काम केल्याने उत्पादकता वाढण्यास मदत झाली; ज्यामुळे पदोन्नती झाली.
परंतु, ‘हश ट्रिप’चे काही तोटेदेखील आहेत. जर कामाच्या ठिकाणी या ट्रिपबाबत कळलं, तर पुढे अनेक अडचणी येऊ शकतात. तसेच जर कंपनी इतर राज्यांमध्ये किंवा देशांमध्ये नोंदणीकृत नसेल, तर ‘हश ट्रिप’मधील लांबच्या प्रवासामुळे कायदेशीर समस्यादेखील उद्भवू शकतात. सायबर सुरक्षा हे आणखी एक क्षेत्र आहे, जिथे ‘हश ट्रिप’ धोकादायक बनू शकतात.