How Alimony Calculate: क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि नृत्य दिग्दर्शिका धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाला कुटुंब न्यायालयाने २० मार्च रोजी मंजूरी दिली. धनश्री वर्माला युजवेंद्र चहलकडून ४.७५ कोटींची पोटगी देण्यात येणार आहे. याधीही काही उच्चभ्रू घटस्फोट प्रकरणात पोटगीची रक्कम महत्त्वाची ठरली असून त्यावर बरीच चर्चा झाली. हार्दिक पंड्या, शिखर धवन, युजवेंद्र चहल या क्रिकेटपटूंसह काही सेलिब्रिटींनी मागच्या काळात घटस्फोट घेतला. त्यांच्याही पोटगीची त्यावेळी जोरदार चर्चा झाली. पोटगीची रक्कम नेमकी कशी ठरते? हे पाहू.
पोटगी म्हणजे काय?
घटस्फोटानंतर पत्नीला उदरनिर्वाह करण्यासाठी दिलेल्या रकमेला पोटगी म्हणतात. हिंदू विवाह कायद्यानुसार घटस्फोटानंतर पत्नीला उर्वरित आयुष्याच्या सोयीसाठी कायमस्वरुपी किंवा प्रति महिना ठराविक रक्कम पोटगी देण्याची तरतूद आहे.
पोटगीची रक्कम कशी ठरवली जाते?
पाश्चिमात्य देशात पोटगीसाठी निश्चित असे नियम आहेत. पण भारतात पोटगीसाठी ठराविक असे काही नियम किंवा कायदा नाही. कुटुंब न्यायालय विविध घटकांचा विचार करून पोटगीची रक्कम ठरवितात, ते घटक पुढीलप्रमाणे-

  • घटस्फोट घेणाऱ्या दोन्ही पक्षांची आर्थिक परिस्थिती
  • उत्पन्नाचे साधन किंवा नोकरी आहे की नाही
  • लग्न झाले तेव्हाची जीवनशैली कशी होती
  • कौटुंबिक जबाबदाऱ्यांसाठी केलेला त्याग
  • मुलं किंवा अवलंबून असलेल्यांची जबाबदारी

टाइम्स नाऊ या संकेतस्थळाला मॅग्नस लिगल सेवा एलएलपी संस्थेच्या विधिज्ञ निकीता आनंद यांनी माहिती देताना सांगितले की, भारतात पोटगीची रक्कम ठरविण्यासाठी कोणतेही निश्चित असे सूत्र नाही. न्यायालय दोन्ही पक्षकारांची आर्थिक स्थिती, मिळकत आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या पाहून निर्णय घेते.

पुरुषांना पोटगी मिळू शकते का?

पोटगी ही सामान्यतः पत्नीला आर्थिक मदत देण्याशी संबंधित विषय असला तरी काही अपवादात्मक परिस्थितीत भारतीय कायदा पुरुषांनाही पोटगी मागण्याचा अधिकार देतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
  • हिंदू विवाह कायदा, १९५५ च्या कलम २४ आणि २५ नुसार, जर पती त्याच्या पत्नीच्या आर्थिक उत्पन्नावर अवलंबून असेल तर तो पोटगीची मागणी करू शकतो.
  • तथापि, विशेष विवाह कायदा, १९५४ आणि घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा, २००५ यासारख्या कायद्यानुसार पत्नीला पतीकडून पोटगी मिळण्याचा मार्ग सुकर होतो.

नवऱ्याला पोटगी मिळण्याचा निर्णय अपवादात्मक परिस्थितीत घेतला जातो. जसे की, नवरा जर दिव्यांग असेल आणि तो पत्नीच्या मिळकतीवर अवलंबून असेल तर पतीला पोटगी देण्याचा निर्णय घेतला जातो, असे सर्वोच्च न्यायालयातील वकील श्रीसत्य मोहंती यांनी सांगितले.