Roti :पोळी भाजी हा आपल्या रोजच्या जगण्यातला आवश्यक भाग. गव्हाची कणीक मळून गोलाकार पोळी तयार केली जाते. पोळीसाठी कणीक मळताना थोडं मीठही घालावं लागतं. तेलही टाकलं जातं ज्यामुळे पोळी चवदार होते. मऊसुत पोळी आणि भाजी, वरण पोळी, गूळ तूप पोळी, तूप साखर पोळी असे अनेक पर्याय पोळी बरोबर खातात येतात. भारतातल्या बहुतांश घरात पोळी आणि भाजी हा पदार्थ रोज तयार होतोच. शिवाय हॉटेलमध्ये गेल्यानंतर या पोळीला रोटीही म्हटलं जातं. ती मैदाची, गव्हाची किंवा दोन्ही एकत्र करुनही बनवली जाते. पोळी, पराठा, प्लेन पराठा असे पोळीचे प्रकारही प्रचलित आहेत. पोळी किंवा रोटीला इंग्रजी भाषेत काय म्हणतात हे तुम्हाला माहीत आहे का?

पोळीला इंग्रजीत काय म्हणतात?

पोळीला इंग्रजीत प्रचलित असलेलं नाव म्हणजे Flat Bread किंवा दुसरं नाव म्हणजे चपाती. फ्लॅटब्रेड या नावाच्या अर्थात पोळीचे विविध प्रकार येतात. मैदाची रोटीही याच प्रकारात मोडते, शिवाय आपण ज्वारी किंवा बाजरीची भाकरी करतो तिलाही फ्लॅट ब्रेड म्हटलं जातं.

पोळीचा समावेश भारतीय जेवणात कसा झाला?

पोळीची मूळं भारतीय उपखंडात आहेत, पोळीला प्राचीन इतिहास आहे, ज्याचे संदर्भ प्राचीन संस्कृत ग्रंथांमध्ये मुघल काळातील नोंदींमध्ये सापडतात. रोटी किंवा पोळी अनेक शतके भारतीय आहाराचा एक अविभाज्य भाग आहे. पोळी किंवा रोटी ही बनवायला सोपी आणि पोषणयुक्त तसंच पोट भरणारा पदार्थ आहे. पोळी किंवा रोटी ही संस्कृतीशी जोडली गेली आहे. त्यामुळेच पूर्वी दोन घराण्यांमध्ये, दोन समाजांमध्ये रोटी बेटी व्यवहार हा शब्द प्रचलित झाला होता.

पोळीचे नेमके प्रकार किती असतात?

१) रोटी किंवा पोळी : रोटी किंवा पोळी हा प्रकार घराघरांत प्रचलित आहे. थोडीशी जाडसर केल्यास ती रोटी असते पातळ केल्यास पोळी. दोन्ही प्रकार घरोघरी तयार केले जातात. तव्यावर भाजलेली पोळी किंवा रोटी ही भारतातल्या बहुतांश घरात रोज तयार होते.

२) फुलका : फुलका किंवा फुलके हा पोळीचाच प्रकार. चुलीवर किंवा तवा न वापरता थेट गॅसवर फुलका किंवा फुलके भाजले जातात. ते आकाराने पातळ असतात, चवीला पोळीइतकेच रुचकर लागतात.

३) पुरणपोळी : होळीला पुरणपोळीचा नैवैद्य दाखवला जातो, त्यामुळे महाराष्ट्रात पोळीचा हा रुचकर प्रकार प्रचलित आहे. चण्याच्या डाळीचं आणि गुळाचं पुरण तयार केलं जातं. कणकेच्या गोळ्यात पुरण भरुन ती छान मऊसुत लाटली जाते आणि भाजली जाते. महाराष्ट्रात पुरणपोळी हा खाद्यप्रकार चांगलाच प्रचलित आहे.

४) गुळाची पोळी : संक्रातीला गुळाची पोळी महाराष्ट्रात तयार केली जाते. तीळ आणि गूळ यांचं योग्य प्रमाणात सारण तयार करुन ते कणकेच्या गोळ्यात भरुन ही पोळी भाजली जाते आणि तुपासह खाल्ली जाते.

५) तंदूरी रोटी : तंदूरच्या भट्टीमध्ये जी रोटी भाजली जाते तिला तंदूर रोटी म्हणतात ती मैद्यापासून तयार केली जाते. तंदूरच्या भट्टीत भाजल्याने या रोटीला तिची खास चव असतेच.