Unique River In India: डोंगर, दऱ्या, समुद्र, धबधबे यांमुळे निसर्गाचे सौंदर्य वाढते; पण या सौंदर्यात नद्याही भर घालत असतात, त्यामुळे नद्याही खूप महत्त्वाच्या आहेत. आपल्या भारत देशात १०० हून अधिक मुख्य नद्या, तसेच त्याहून अधिक उपनद्या आहेत. नद्यांमुळे आसपासच्या गावाला, शहराला सौंदर्य प्राप्त होते. त्याशिवाय नदीच्या आसपासचा परिसर खूप समृद्ध आणि सुंदर दिसतो. भारतातील बहुतेक नद्या एकाच दिशेने म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात. पण, आपल्या देशात अशी एकमेव नदी आहे जी उलट वाहते. गंगा नदीप्रमाणे या नदीलाही पवित्र आणि पूजनीय मानले जाते, शिवाय या नदीच्या परिक्रमेलाही खूप महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त आहे. आजही लाखो भाविक दरवर्षी या नदीची परिक्रमा करतात. परंतु, ही नदी नेमकी कोणती हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
उलट्या दिशेने वाहणारी नदी
पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणाऱ्या या नदीचे नाव नर्मदा असून या नदीला रेवा या नावानेसुद्धा ओळखले जाते. भारतातील सर्व नद्या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात आणि बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. परंतु, नर्मदा ही देशातील अशी नदी आहे, जी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते आणि अरबी समुद्राला जाऊन मिळते. ही नदी मध्य प्रदेश आणि गुजरातमधील एक मुख्य नदी आहे, जी भारताच्या मध्य भागात पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. नर्मदा नदी मैखल पर्वताच्या अमरकंटक शिखरावरून उगम पावते.
नर्मदा नदी उलट्या दिशेने का वाहते?
नर्मदा नदीच्या उलट्या प्रवाहाचे भौगोलिक कारण म्हणजे रिफ्ट व्हॅली. रिफ्ट व्हॅलीचा उतार विरुद्ध दिशेने आहे, यामुळे नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत जाऊन ती अरबी समुद्राला मिळते. तसेच नर्मदा नदीच्या उलट्या प्रवाहामागे अनेक कथा पुराणात सांगितल्या गेल्या आहेत. असे म्हणतात की, नर्मदेचा विवाह सोनभद्राशी होणार होता पण सोनभद्र नर्मदेची मैत्रीण जुहिलावर प्रेम करत होता. यामुळे संतप्त झालेल्या नर्मदेने आयुष्यभर कुमारी राहून उलट दिशेने वाहत जाण्याचा निर्णय घेतला. भौगोलिक स्थितीवरही पाहायला गेलो तर नर्मदा नदी सोनभद्रा नदीपासून एका विशिष्ट बिंदूवर विभक्त होते. आजही ही नदी इतर नद्यांच्या विरुद्ध दिशेने वाहते, हे एका आश्चर्यापेक्षा कमी नाही.
नर्मदा नदी तिच्या उगमापासून पश्चिमेला १,३१२ किमी प्रवास करते आणि अरबी समुद्राला मिळते. नर्मदा नदी ही मध्य प्रदेश आणि गुजरात राज्याची जीवनदायिनी नदी आहे. अरबी समुद्रात जाऊन मिळण्यापूर्वी, नर्मदा नदी १,३१२ किलोमीटर लांबीच्या मार्गाने मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्राच्या प्रदेशातून ९५, ७२६ चौरस किलोमीटर पाणी वाहून नेते. नर्मदा नदीला ४१ उपनद्या आहेत. यामध्ये २२ नद्या डाव्या तीरावर आणि १९ नद्या उजव्या तीरावर मिळतात.
नर्मदेची परिक्रमा का केली जाते? (What is the significance of Narmada Parikrama)
पौराणिक ग्रंथांनुसार, नर्मदा नदीची परिक्रमा करण्यामागे अनेक कारणे आहेत. अनेक श्रद्धाळू दरवर्षी नदीची परिक्रमा करतात. नर्मदेची परिक्रमा ३ वर्षे, ३ महिने आणि १३ दिवसांत पूर्ण होते. नर्मदेच्या काठावर अनेक दिव्य तीर्थक्षेत्रे, ज्योतिर्लिंगे, उपलिंगे इत्यादी स्थापन आहेत. यात्रेकरू दोन्ही तीरांवर सुमारे तेराशे बारा किलोमीटर अंतर सतत चालत परिक्रमा करतात. ज्या ठिकाणी यात्रेकरू श्री नर्मदाजींची परिक्रमा करण्याची प्रतिज्ञा घेतात, तिथल्या एका सक्षम व्यक्तीकडून ते त्यांच्या स्पष्ट विश्वासार्हतेचे प्रमाणपत्र घेतात. श्री नर्मदेची पूजा करून कढई अर्पण केल्यानंतर परिक्रमा सुरू होते.
नर्मदेच्या या प्रसिद्धीमुळे, ती जगातील एकमेव नदी आहे, जिची प्रदक्षिणा योग्य पद्धतीने केली जाते. नर्मदा नदीला दररोज भेट देणे, तिला नेहमी उजव्या बाजूला ठेवणे आणि ती ओलांडल्याशिवाय तिच्या दोन्ही तीरांवर चालणे याला नर्मदा प्रदक्षिणा किंवा परिक्रमा म्हणतात. ही परिक्रमा अमरकंटक किंवा ओंकारेश्वर येथून सुरू होते आणि दोन्ही तीरांवर नदीकाठून प्रवास केल्यानंतर, जिथून सुरू झाली होती, त्याच ठिकाणी ती पूर्ण होते.