दूर्वा अन् जास्वदांची फुलं ही गणपती बाप्पाला सर्वात आवडीची, म्हणूनच गणरायाची पूजा करताना आपण २१ दुर्वांची जुडी, जास्वंद, २१ मोदकांचा नैवेद्य बाप्पाला अर्पण करतो. पण, गणपतीच्या पुजेला २१ दुर्वांची जुडी, २१ मोदकांचा प्रसाद, जास्वंद किंवा तांबडी फुलंच का वाहिली जातात? यांसारखे अनेक प्रश्न तुम्हालाही पडले असतील. तेव्हा तुमचे अनेक प्रश्न आणि शंकाचं निसरन पंचांगकर्ते श्री. मोहन दाते यांनी केलं आहे. येत्या काही दिवसांत ‘प्रश्न तुमचे उत्तर पंचांगकर्त्यांचे’च्या विशेष भागात बाप्पांच्या पूजेसंदर्भातले अनेक प्रश्न, विधी आणि शास्त्रोक्त अर्थ आपण जाणून घेणार आहोत.

गणपतीला दुर्वा आणि जास्वंदाची फुले का वाहिली जातात?
आपल्याकडे सर्वच देवतांना विशिष्ट फुलं, पत्री वाहण्याची प्रथा आहे. जसे विठोबाला तुळस, शंकराला बेल, गणपतीला दूर्वा आणि जास्वंदाची फुले आवडण्याबाबत अनेक कथा आहेत. यासर्वच देवतांची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत ते तत्व आपल्यापर्यंत जास्तीत जास्त पोचावं यासाठी आपण त्यांचं पूजन करतो, उत्सव साजरे करतो. दूर्वांमध्ये श्री गणेशाचे तत्त्व जास्तीत जास्त प्रमाणात आकृष्ट करून घेण्याची क्षमता असते. त्यामुळे गणपतीला दूर्वा वाहिल्या जातात. या दूर्वा शक्यतो कोवळ्या अन् लहान आकाराच्या एकत्र जुडी करून वाहाव्यात. दूर्वांना ३, ५, ७ अशा विषम संख्येच्या पात्या असाव्या. गणपतीच्या पूजेत लाल वस्त्र, जास्वंदीसारखे लाल फूल, रक्तचंदन यांसारख्या लाल वस्तू वापरणे महत्त्वाचे मानले जाते. याचे कारण म्हणजे गणपतीचा वर्ण शेंदरी / लाल आहे. पूजेत वापरलेल्या वस्तूंच्या लाल रंगामुळे गणेशाचे तत्त्व मूर्तीकडे जास्त प्रमाणात आकृष्ट होते.

गणपतीला फक्त पहिल्याच दिवशी बेल पत्र, दुर्वा आणि इतर फुले का वाहतात? इतर दिवशी का नाही ?
सर्वच देवतांना सर्व प्रकारची फुलं, पत्री वाहिली जात नाही. पण ‘पार्थिव गणेशपूजना’च्या व्रतामध्ये गणेश चतुर्थीच्या दिवशी अशी पत्री वाहिलेली चालते असं सांगितलं आहे. एखाद्यानी रोजच वाहायची ठरवल्यास तसंही करता येईल. पण या दिवशी वाहण्याचं विशेष महत्त्व आहे.

२१ दूर्वा जोडीचा हार वाहण्यासोबतच गणपतीस इतरंही काही विशिष्ट अशी फुलं वाहवीत का ?
गणपतीला दूर्वा आणि लाल रंगाची फुलं आवडतात असं सांगितलं जात. त्यामुळे अशा फुलांना प्राधान्य द्यावे. मात्र पूजेमध्ये नेहमीच त्या त्या ऋतुमध्ये मिळणाऱ्या फुलांचा विशेष सुगंधी वनस्पतींचा समावेश करण्यास सांगितला आहे, त्यामुळे जी फुलं उपलब्ध असतील ती वहावीत. या ऋतूमध्ये आघाडा सर्वत्र मिळतो तो वहावा.

गणपतीसमोर विशिष्ट संख्येच्या मोदकांचा प्रसाद ठेवला जातो त्यामागचे कारण काय?
प्रत्येक देवतेच्या काही संख्या आहेत जसे १२ रवि, ११ रुद्र म्हणजेच शंकर त्याप्रमाणे गणेशाची संख्या २१ आहे म्हणून २१ मोदकांचा नैवेद्य दाखविला जातो. त्याप्रमाणे याच संख्येमुळे २१ दुर्वांची जुडी किंवा २१ पत्री वाहिल्या जातात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप – मूळ लेख २०१८ साली प्रकाशित करण्यात आला होता.)