निसर्गचित्र काढताना आपण कायम सूर्याचा रंग पिवळा आणि चंद्राचा रंग पांढरा दाखवतो. दिवसभर आकाशात सूर्य पिवळ्या रंगाचा; मात्र रात्री चंद्र पांढऱ्या रंगाचा दिसतो. असे का? हा प्रश्न केवळ लहानांनाच नाही, तर अगदी मोठ्यांनाही कित्येक वेळा पडत आला आहे. या रंगांमागे विज्ञान आहे. प्रकाश, पृथ्वीचे वातावरण व डोळे हे सर्व घटक आकाशात दिसणाऱ्या विविध रंगांसाठी सहकार्य करतात. त्याविषयीच सविस्तर जाणून घेऊ आणि सूर्याच्या पिवळ्या रंगामागील आणि चंद्राच्या पांढऱ्या रंगामागील कारण समजून घेऊयात.

सूर्याचा खरा रंग कोणता?

आश्चर्यकारक बाब म्हणजे सूर्यदेखील एक पांढरा प्रकाश उत्सर्जित करतो आणि त्यामध्ये रंग वर्णक्रमातील सर्व रंग असतात. सूर्याकडून उत्सर्जित होणाऱ्या सूर्यप्रकाशाचा रंग संमिश्र असतो, मात्र आपल्याला केवळ एकच रंग दिसतो. पृथ्वीच्या वातावरणातून प्रवास करताना, सूर्यकिरणे मोठ्या प्रमाणात हवामानाच्या रेणूंमधून प्रवास करतात. हवेतील रेणू हे कमी तरंगलांबी असलेल्या प्रकाशकणांमध्ये बदल घडवून आणतात. त्यामुळे निळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या छटा अधिक विखुरलेल्या दिसतात. या विखुरण्यालाच ‘रेले स्कॅटरिंग’ म्हणतात आणि त्यामुळे सूर्य पिवळा किंवा कधी कधी नारिंगी रंगाचा दिसतो. आपल्याला दिसणारा पिवळा सूर्य वातावरणातून फिल्टर झाल्यामुळे तसा दिसतो.

चंद्रप्रकाश आणि त्यामागील विज्ञान

चंद्राला स्वतःचा प्रकाश नसतो, हे प्रत्येकाला माहीत आहे. प्रकाशासाठी चंद्र सूर्यावर अवलंबून असतो. चंद्र त्याच्या पृष्ठभागावरून सूर्यप्रकाश परावर्तित करतो. ज्वालामुखीय खडक चंद्राच्या पृष्ठभागावर आहे आणि हा खडक बहुतेक प्रकाश शोषून घेतो; परंतु खूप कमी प्रकाश परावर्तित करतो. पौर्णिमेच्या वेळीही त्याचा परावर्तित प्रकाश सूर्यप्रकाशाच्या तुलनेत सुमारे ४,००,००० पट कमी तीव्र असतो.

आपल्या डोळ्यांना चंद्र कसा दिसतो?

आपल्या सर्वांमध्ये दोन प्रकारचे फोटोरिसेप्टर्स आहेत म्हणजेच रॉड्स आणि कोन या प्रकाशग्राही पेशी. कोन रंग ओळखतात; परंतु त्यांना कार्य करण्यासाठी तेजस्वी प्रकाशाची आवश्यकता असते. रॉड्स अंधारात काम करतात; परंतु त्या फक्त राखाडी रंगाच्या छटा ओळखू शकतात. रॉड्स प्रामुख्याने रात्री कार्य करतात आणि चंद्रप्रकाश खूप कमकुवत असतो. या परिणामामुळेच आपल्याला परावर्तित चंद्रप्रकाश राखाडी किंवा पांढरा दिसतो.

हवामानाची परिस्थिती चंद्रप्रकाशावर कसा परिणाम करते?

चंद्राचा प्रकाश क्षितिजावर कमी असताना जेव्हा प्रकाशकिरणे पृथ्वीच्या वातावरणातून प्रवास करतात. तेव्हा लाल किंवा नारिंगी तरंगलांबी असलेल्या स्पेक्ट्रम (लोलकातून बाहेर पडणारे रंग) विखुरले जातात आणि निळ्या तरंगलांबी सभोवतालच्या वातावरणात अदृश्य होतात. त्यामुळे चंद्रोदय किंवा चंद्रास्त होताना चंद्र कधी कधी पिवळा, नारिंगी किंवा अगदी लाल रंगाचा दिसू लागतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आपल्या डोळ्यांना काय दिसते?

सूर्य आणि चंद्रामध्ये दिसणारे रंग विविध घटकांवर अवलंबून असतात. सूर्यप्रकाश पृथ्वीच्या वातावरणामुळे विखुरलेला असतो आणि त्यामुळे तो पिवळा असतो. चंद्राचा परावर्तित पृष्ठभाग पृथ्वीकडे जास्त प्रकाश प्रक्षेपित करत नाही. आपले डोळे वेगवेगळ्या परिस्थितीत रंग आणि प्रकाशाला कसा प्रतिसाद देतात यावर आपण काय पाहतो हे ठरते.