आज योगिनी एकादशी साजरी करण्यात येत आहे. प्रत्येक वर्षात २४ एकादशी असतात. प्रत्येक एकादशीचे महत्त्व आणि त्या मागची कथा वेगवेगळी असते. एकादशीची नावेही अगदी वैशिष्ट्यपूर्ण असतात. आषाढ महिन्यातील कृष्ण एकादशीला ‘योगिनी’ किंवा ‘शायनी’ एकादशी म्हणतात. योगिनी म्हणजे योग्य अर्थात जोडणारी. परमात्म्याशी जोडणे ज्या व्रताने घडते, ती ही योगिनी एकादशी म्हणतात. हिंदू धर्मात एकादशीला एक महत्त्वाचे स्थान आहे. एकादशीचे व्रत मोठ्या भक्तिभावाने केले जाते. आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीला योगिनी एकादशी म्हणतात.

योगिनी एकादशी शुभ मुहूर्त

एकादशी प्रारंभ : ४ जुलै संध्याकाळी ७ वाजून ५५ मिनिटे

योगिनी एकादशी : ५ जुलै २०२१

एकादशी समाप्ती : रात्री १० वाजून ३० मिनिटापर्यंत

व्रत पारणचा शुभ मुहूर्त : ६ जुलै मंगळवार सकाळी ५.२९ ते ८.१६ या दरम्यान

योगिनी एकादशीचे महत्व काय?

योगिनी एकादशीचे व्रत ठेवल्यास सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि जीवनात समृद्धी व आनंदाची प्राप्ती होते. असे मानले जाते की जर कुष्ठरोगाने ग्रस्त लोकांनी योगिनी एकादशीच्या दिवशी संपूर्ण निष्ठेने व्रत केले तर त्यांना या आजारापासून मुक्ती मिळते. त्यांनी जाणूनबुजून आणि नकळत केलेल्या सर्व पापांपासून मुक्ती मिळते. शेवटी त्या व्यक्तीला श्री हरिच्या चरणी स्थान प्राप्त होते. आपण केलेल्या सेवेने ८८ हजार ब्राम्हण तृप्त होऊन जेवढे पुण्य मिळते, त्यापेक्षा जास्त पुण्य या योगिनी एकादशीच्या व्रताने मिळते, अशी मान्यता आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्रत कथा

अल्कापुरी नगरात राजा कुबेरच्या घरात हेम नावाचा एक माळी राहत होता. तो मानसरोवरहून रोज भगवान शिवच्या पूजेसाठी तो फुलं आणत असत. एक दिवस त्याला फुले आणण्यासाठी उशीर झाला आणि तो उशिरा दरबारात पोहोचला. यावर राजा फार रागावला आणि त्याने माळीला कुष्ठरोगी होण्याचा शाप दिला. या शापामुळे माळी कुष्ठरोगी झाला आणि इकडे-तिकडे भटकत राहिला. असाच भटकत असताना एका दिवशी तो मार्कंडेय ऋषींच्या आश्रमात पोहोचला. ऋषींनी आपल्या योगिक सामर्थ्याने समजून घेतले की तो का दु:खी आहे. त्यांनी माळीला योगिनी एकादशी व्रत ठेवण्यास सांगितले. ऋषींच्या सल्ल्यानंतर माळीने विधीवत आणि मनोभावे योगिनी एकादशी व्रत ठेवले. आणि व्रताच्या प्रभावाने माळीचा कुष्ठरोग संपला. अखेर त्याला मोक्षची प्राप्ती झाली.