पुणे हे ऑटो हब म्हणून संपूर्ण देशात परिचित आहे. पुणे व परिसरात फोर्ड, फोक्सवॅगन, मर्सिडीज, टाटा, बजाज या वाहननिर्मिती क्षेत्रातील नामांकितांचे मोठमोठे प्रकल्प दिमाखात उभे आहेत. वाहननिर्मिती करणाऱ्यांना सुटे भाग तसेच इतर अ‍ॅक्सेसरीज व कॉम्पोनन्ट्स पुरवणारे कारखानेही त्यानिमित्ताने पुण्यात आहेत. या पाश्र्वभूमीवर पुण्यातील कॅम्प परिसरात नुकतेच ऑटो-२०१४ हे पश्चिम भारतातील सर्वात मोठे वाहन उद्योग प्रदर्शन भरवण्यात आले होते. त्यानिमित्ताने वाहन उत्पादक, ऑटो कॉम्पोनन्ट्स, अ‍ॅक्सेसरीज व अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध वाहनांच्या मॉडेल्स यांचे दर्शन वाहनप्रेमींना झाले. त्याचा हा रिपोर्ताज..

गॅरेज इक्विपमेन्ट्स आणि टूल्स
ऑटो-२०१४च्या प्रदर्शनात गॅरेज इक्विपमेन्ट्स व टूल्सचे दोन स्टॉल लावण्यात आले होते. ‘मल्टी कार टेक’ यांच्या स्टॉलमध्ये थ्रीडी व्हील अलाइनमेंट हे पहिल्यांदाच तयार करण्यात आलेले उपकरण येथील आकर्षण ठरले. त्याबरोबरच मोटारींमध्ये कोठे बिघाड झाले हे सांगणारे स्कॅनिंग मशिनही या ठिकाणी ठेवण्यात आले होते. रस्त्यावर होणारे अपघात हे ‘नायट्रोजन एअर’ मुळे कमी करता येऊ शकता म्हणून त्याची माहिती दिली जात होती. नायट्रोजन एअर किट या ठिकाणी ठेवण्यात आले होते. आपल्या मोटारीतून किती प्रदूषण होते याची संगणकाद्वारे तपासणी करणारे कीट ‘मल्टी कार टेक’ यांनी तयार केले असून राज्यात पहिल्यांदाच असा प्रयोग करण्यात आला आहे. या कीटमुळे आपल्या मोटारीतून किती धूर निघतो, त्यामुळे हवेत किती प्रदूषण होते याची माहिती तात्काळ मिळते. तसेच प्रदूषणाची माहिती छायाचित्रासह प्रिंट होऊन तुमच्या हातात येते. शिवाय तुम्ही प्रदूषण टाळण्यासाठी काय करायला हवे, याविषयीही प्रबोधन केले जाते.

पंक्चर काढणे झाले सोपे
लहान मुले, ज्येष्ठ नागरिक वाहन घेऊन जाताना रस्त्यात गाडीचे चाक पंक्चर झाले तर त्यांना फार त्रास सहन करावा लागतो. मात्र, आता पंक्चर काढण्याचे कीटही विकसीत करण्यात आले आहे. या कीटच्या माध्यमातून कोणतीही व्यक्ती पाच मिनिटांत गाडीचे पंक्चर काढू शकते. त्यासाठी फक्त रिमोटचा वापर त्या व्यक्तीला करावा लागणार आहे. हे कीट बॅटरीवर चालणारे असून त्याची किंमत साडेबारा हजार रुपये आहे. तसेच इन्ट्रागेट ड्रायर हे उपकरणही या ठिकाणी ठेवण्यात आले होते. एखादी मोटार पेंट केल्यानंतर तिचा रंग तात्काळ वाळावा यासाठीत त्याचा वापर केला जात असल्याची माहिती ‘मल्टी कार टेक’चे व्यवस्थापकीय संचालक भूषण भांडवलकर यांनी दिली. त्याबरोबरच कोंढवा येथील सनराइज इन्स्ट्रमेंट्स प्रा. लि व वर्थ इंडिया प्रा. लि. गॅरेज इक्विपमेंट्स आणि कार केअर प्रॉडक्ट्स यांचे स्टॉल लावण्यात आले होते.  

ऑटो अ‍ॅक्सेसरीज
अ‍ॅटो अ‍ॅक्सेसेरीजमध्ये मोटारींचे ब्रश तयार करणाऱ्या पूना ब्रश यांचा स्टॉल होता. मोटारी धुण्यासाठी वापण्यात येणारे वेगवेगळे ब्रश त्यांनी प्रदर्शनात ठेवले होते. पूना ब्रश यांनी ‘अ‍ॅटोकार वॉश’ नावाचे मशीन तयार केले आहे. कमी कमी पाण्यात ते मशीन पाच मिनिटांत मोटार स्वच्छ करतो. हे पहिल्यांदाच आपल्या देशात बनविण्यात आले आहे. त्याची किंमत सात ते आठ लाख रुपये आहे. याबरोबरच ग्राहकांच्या आणि मोटारीनुसार कंपनीकडून वेगवेगळे ब्रश बनवून दिले जातात. मोटारींसाठी बॅटरी हा महत्वाचा भाग आहे. ही बॅटरी चार्ज करण्यासाठी लागणाऱ्या उपकरणांचाही स्टॉल या प्रदर्शनात होता. त्यामध्ये वेगवेगळ्या मोटारींची बॅटरी चार्जर, बॅटरी टेस्टर ठेवण्यात आली होती.  

ऑटो कॉम्पोनन्ट्स
या प्रदर्शनात अ‍ॅटो कॉम्पोनन्ट्सचे हरयाणा, चेन्नई आणि बेंगळुरू येथील तीन कंपन्यांचे स्टॉल ठेवण्यात आले होते. या कंपन्यांनी खास करून इंजिनाशी निगडीत असणारी उपकरणे ठेवली होती. चेन्नई येथील वसु ऑटोमोटिव्ह इंडिया प्रा. लि या कंपनीने त्यांनी तयार केलेली दुचाकी, तीन चाकीच्या इंजिनासाठी तयार केलेले कॉम्पोनन्ट्स ठेवले होते. त्यात पिस्टन्स, पिस्टन रिंग्स, सिलिंडर ब्लॉक यांचा समावेश होता.

भविष्य काळातील सुरक्षित व प्रदूषणमुक्त वाहने या विषयाचे महत्व लक्षात घेऊन त्याबाबतची माहिती देण्यात आली. मोटार तयार करताना, ती चालविताना वाहन चालकांची सुरक्षितता हा महत्वाचा मुद्दा असतो. या पाश्र्वभूमीवर यासंदर्भातील आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रदर्शन येथे होते. ऑटोमोबाइल क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचेही आयोजन प्रदर्शनादरम्यान करण्यात आले. या प्रदर्शनात सुपर बाइकचेही एक दालन ठेवण्यात आले होते. त्यात चार लाखांपासून ते ७० लाखांपर्यंतच्या सहा ते सात बाइक ठेवण्यात आल्या होत्या. देश व परदेशात होणाऱ्या स्पर्धामध्ये सहभागी झालेल्या ५३ अभियांत्रिकी महाविद्यालयांना निमंत्रित केले होते. त्यापैकी १४ महाविद्यालये आली. त्यांनी स्वत:चे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून तयार केलेल्या मोटारसायकली या ठिकाणी ठेवण्यात आल्या होत्या.
पी. एन. आर. राजन, संयोजक

विद्यार्थ्यांची कमाल
भारत आणि परदेशातील बाहा, सुप्रा, एसई इंडिया आणि गोकार्ट या आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये सहभागी होऊन त्यात बक्षिसे मिळविलेल्या पुण्यातील १४ महाविद्यालयांची दालने या प्रदर्शनात होती. त्यांनी स्वत:चे तंत्रज्ञान वापरून बनविलेली वाहने व अ‍ॅटोमोबाइलमधील संशोधन या प्रदर्शनात ठेवले होते. आकुर्डी येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाने जालंधर येथे झालेल्या गोकार्ट स्पर्धेत तयार केलेले ‘ऑटोक्राफ्ट’ ही स्पोर्ट प्रकारातील मिनी एफ वन मोटार विशेष आकर्षण ठरली. तर, वाघोली येथील जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयने तयार केलेली ऑल टेरियन व्हेइकल (एटीव्ही) प्रकारातील ‘व्हेनम’ मोटारही वाहनप्रेमींचे लक्ष वेधत होती. त्याचबरोबर कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगसह (सीओईपी) विविध महाविद्यालयांनी अ‍ॅटोमोबाइल क्षेत्रात संशोधन करून तयार केलेली वाहने प्रदर्शनात पहायला मिळाली. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी स्थापन केलेल्या स्टुडंट फोरमचे विशेष दालनही या ठिकाणी होते. त्यात प्रोजक्ट डिस्प्ले, पोस्टर डिल्प्लेच्या माध्यमातून सिग्नल, पार्किंग, ध्वनिप्रदूषण, वाहतूक नियंत्रण आणि व्यवस्थापन, पादचाऱ्यांची सुरक्षितता, पर्यावरण रक्षणाविषयी जनजागृती करणारी पोस्टर यांच्या माध्यमतून मार्गदर्शन केले जात होते. होंडा मोटर्सकडून रस्ता सुरक्षिततेची माहिती देण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यता आला होता. या ठिकाणी नऊ ते बारा वयोगातील मुलांना रस्त्यावरील दिशादर्शक चिन्हे, हेल्मटचे महत्व, रस्ता सुरक्षिततेसाठी वाहतुकीचे नियम याची माहिती दिली जात होती.