मिनी ट्रकच्या श्रेणीमध्ये भारतीय बाजारपेठेत आता तशी बरीच वाहने दाखल झालेली दिसतात. यामध्येच आता महिन्द्र आणि महिन्द्रच्या एका वरच्या श्रेणीतील मिनी ट्रकची भर पडली आहे. सोमवारी ४ मार्च रोजी मुंबईमध्ये महिन्द्रच्या ‘मॅक्सिमो प्लस’ या मिनी ट्रकचे अवतरण करण्यात आले. मॅक्सिमोच्या या प्रकारच्या श्रेणीमधील हे सुधारित वाहन असून फ्युएल स्मार्ट टेक्नॉलॉजी या वेगळ्या पद्धतीने इंधन बचत करून देणारे ‘मॅक्सिमो प्लस’ हे व्यावसायिक मालवाहतुकीचे साधन कमाल २१.९ किलोमीटर प्रतिलिटर डिझेलला मायलेज देते, असा कंपनीचा दावा आहे.
९०९ सी. सी. क्षमतेचे दोन सिलेंडर असणारे व ८५० किलोग्रॅम मालाची वाहतूक करण्यासाठी तयार असणारे हे वाहन. कमाल २६ एचपी इतकी ताकद ‘मॅक्सिमो प्लस’ला देण्यात आली असून त्यात फ्युएल स्मार्ट टेक्नॉलॉजी म्हणून दिलेले एक नवे तंत्रज्ञान या नव्या ‘मॅक्सिमो प्लस’चे वैशिष्टय़ आहे. सामान भरलेला ‘मॅक्सिमो प्लस’ रस्त्यावरून विशेषकरून चढाच्या रस्त्यावरून धावताना त्याला २६ एच. पी. इतकी ताकद देता येते. त्यासाठी पॉवर व इकॉनॉमी असे पर्याय देण्यात आले असून एका पटनावर हे पर्याय वाहनचालक निवडू शकतो. त्यामुळे वाहनाच्या मालवाहतुकीचा ट्रे रिकामा असताना किंवा सपाट रस्त्यावर, वाहन वर्दळीतून ‘मॅक्सिमो प्लस’ धावताना त्यासाठी इकॉनॉमी हा पर्याय निवडता येतो. त्यामुळे प्रतिलिटर डिझेलला २१.९ किलोमीटर इतके मायलेज मिळू शकते. या इकॉनॉमी पर्यायामध्ये २६ एच. पी.ऐवजी १७ ते १८ एच. पी. इतकी ताकद  ‘मॅक्सिमो प्लस’ ला प्रदान केली जाते. यामुळे त्याचे मायलेज वाढते. अनावश्यक ठिकाणी अधिक ताकदीवर वाहन चालविण्यापेक्षा ते शक्य तितक्या आवश्यक ताकदीवरही किफायतशीरपणे धावू शकेल, असा हेतू या मागे आहे.
 सात पाटे मागच्या सस्पेन्शनला दिले असून सर्वसाधारणपणे या श्रेणीतील अन्य मिनी ट्रकना हे पाटे तीन असतात. यामुळे वाहन मालाने भरलेले असतानाही ताण येणार नाही. धक्के कमी बसतील.

‘मॅक्सिमो प्लस’ ची तांत्रिक वैशिष्टय़े
इंजिन : २६ एच. पी. (१९.२ किलोव्ॉट)- ३६०० आरपीएम, ९०९ सी. सी., २ सिलेंडर, टर्क- ५५ एनएम/ ५.५ केजीएम- १८००-२०० आरपीएम
क्लच : सिंगल प्लेट ड्राय.
गीयरबॉक्स : मॅन्युअल, ४ पुढील व १ मागील गीयर.
स्टिअरिंग : रॅक अ‍ॅण्ड पिनिअन.
सस्पेन्शन : पुढील – मॅकफर्सन इंडिपेंडंट सस्पेन्शन,
मागील – लीप स्प्रिंग्ज (पाटे).
ब्रेक्स : पुढील डिस्क ब्रेक, मागील – ड्रम ब्रेक्स
व्हील / टायर्स : ४ जे बाय १२ (३०.५ सीएम) / १४५/८०
आर १२ (३०.५ सीएम)
इंधन टाकी क्षमता : ३३ लिटर डिझेल
लांबी/ रुंदी/ उंची/ व्हील बेस : ३८००/ १५४०/ १९००/१९५०/ १९५० (सर्व एमएम)
कार्गो बॉक्स (सामान ठेवण्याचा हौदा) : २२८० ७ १५४० ७ ३३० एमएम
आसनक्षमता : चालक व एक व्यक्ती
पेलोड : ८५० किलोग्रॅम
रंगसंगती : अ‍ॅपी रेड व डायमंड व्हाइट
मूल्य : बीएस ३ – ठाणे एक्स शोरूम – रु. ३,४०,०००/-
बीएस ४ – एक्स शोरूम मुंबई रु. ३,४९,०००/- (जकात वगळून ).