तंत्रज्ञानाची ओळख झाल्यापासून आपण अनेक योजने प्रगती केली आहे. अगदी सागरतळाखालील जग पाहण्यापासून ते मंगळापर्यंत मानवी वस्ती वसवण्याच्या तयारीपर्यंत.. आपल्या जीवनाची सर्वच अंगे तंत्रज्ञानाने व्यापली आहेत, हे काही पुन्हा नव्याने सांगायला नकोच.. वाहन क्षेत्रानेही याच तंत्रज्ञानाचा वापर करत अनेकानेक नवनवीन संकल्पना आणल्या आहेत. यातलीच एक नवसंकल्पना म्हणजे सेल्फ ड्रायिव्हग कार.. त्याचीच ही ओळख..

समजा तुम्ही सहकुटुंब सहलीला निघाला आहात.. तुम्ही स्वत:च गाडी ड्राइव्ह करत आहात, तुम्हाला कंटाळा आलाय, पण तुमच्याशिवाय गाडी कोणी चालवू शकत नाही, अशा वेळी तुम्ही गाडी थेट ऑटो पायलटला टाकलीत आणि थोडा वेळ आराम केला तर कसे..? साहजिकच तुमची पहिली प्रतिक्रिया असेल की, छे! असं कधी होतं का.. याला उत्तर आहे, होय! असे होऊ शकते. अशा प्रकारचे तंत्रज्ञान विकसित करण्याची तयारी तिकडे युरोप-अमेरिकेत सुरूही झाली आहे आणि कदाचित येत्या काही वर्षांत आपल्याकडेही ही संकल्पना येऊ शकते..
गेल्या दशकभरात वाहन क्षेत्राने तंत्रज्ञानाच्या बाबतीत उत्तुंग भरारी घेतली आहे. आज आपल्याला कारमध्ये अनेकानेक अत्याधुनिक गॅजेट्स दिसतात, सुरक्षेच्या दृष्टीनेही अनेक सोयीसुविधा गाडीत असतात, एवढेच नव्हे तर जीपीएस प्रणालीने गाडीचे दिशादर्शनही केले जाते. मात्र, यात एक गोष्ट युनिव्हर्सल आहे आणि होती.. ती म्हणजे गाडीचं नियंत्रण अर्थात व्हील चालकाच्याच हातात राहणार. मात्र, आता यातही आधुनिकता आणण्याचा प्रयत्न व्होल्वो आणि गुगल यांनी आणला आहे. म्हणजे गाडी प्रत्यक्ष चालकाला चालवायची गरज नाही, फक्त ऑटो पायलटवर टाकायची की झाले.
गुगलची सेल्फ ड्रायिव्हग कार
गुगलही सध्या सेल्फ ड्रायिव्हग कारच्या प्रयोगावर काम करत आहे. त्यासाठी गुगलने टोयोटा, लेक्सस आरएक्स४५० आणि ऑडी टीटी या गाडय़ांची मदत घेतली आहे. गुगलने गेल्या काही वर्षांपासून हा प्रयोग राबवला असून कॅलिफोíनया आणि नेवाडा प्रांतातील काही रस्त्यांवर डझनभर सेल्फ ड्रायिव्हग कार दिसू लागल्या आहेत. मात्र त्या रोबोटिक आहेत. अर्थात या गाडय़ांचा वापर करण्यास अद्याप अमेरिकी प्रशासनाने मंजुरी दिलेली नाही, परंतु पुढील वर्षांपर्यंत ही परवानगी मिळेल, असा आशावाद गुगलने व्यक्त केला आहे. गुगलच्या या रोबोटिक कारनी आतापर्यंत सात लाख किमीचा टप्पा पार केला असून तोही अपघातविरहित आहे. पादचाऱ्यांच्या तसेच वाहनचालकांच्या सुरक्षेसाठी या गाडय़ा अधिकाधिक सुरक्षित बनवण्याचा गुगलचा संकल्प आहे. गुगलचे कर्मचारी स्वत: या प्रायोगिक गाडय़ांमध्ये बसून गाडय़ांचे परीक्षण करतात.
व्होल्वोची ड्राइव्ह मी कार
व्होल्वोने या बाबतीत पुढाकार घेतला आहे. सध्या स्वीडनमध्ये व्होल्वोच्या सेल्फ ड्रायिव्हग कार प्रायोगिक तत्त्वावर फिरत आहेत. सर्व काही ठीक झाले, तर येत्या दहा महिन्यांतच व्होल्वोच्या या सेल्फ ड्रायिव्हग कार सामान्यांच्या हातात येतील.
ड्राइव्ह मी कारची वैशिष्टय़े
* कारमधील संगणक प्रणालीला जोडलेल्या ऑटो पायलट मोडला गाडी चालू शकेल.
* वाहनधारकाने फक्त त्याला ज्या ठिकाणी जायचे तेथील माहिती, रस्त्याची परिस्थिती, वाहतूक, सिग्नल वगरेचे प्रोग्रॅिमग करून ठेवायचे.
* या गाडय़ा स्वत:च लेनची शिस्त पाळतील.
* वाहतूक परिस्थितीनुसार वेग वाढवणार किंवा कमी करणार.
* अर्थात वाहतुकीचे नियमही पाळणार.
सेल्फ ड्रायिव्हगची वैशिष्टय़े
* सेल्फ ड्रायिव्हग कारची वैशिष्टय़े
* रस्त्यावरील प्रत्येक हालचालीची बारीकसारीक नोंद घेणे.
* वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन.
* स्टॉप साइनजवळ आपोआप गाडी थांबणार.
* झेब्रा क्रॉसिंगला प्रथम पादचाऱ्यांना प्राधान्य देणार.
* वाहतुकीच्या परिस्थितीनुसार वेगात बदल करणार.
भारतात कधी?
ऑटो पायलटवर चालणाऱ्या या गाडय़ा भारतात येण्यास मात्र थोडा अधिक कालावधी लागेल. अर्थात त्याला आपल्याकडील सरकारी धोरणाबरोबरच रस्त्यांची-वाहतुकीची अवस्था, लोकसंख्या आदी महत्त्वाची कारणेही कारणीभूत आहेत. व्होल्वोच्या गाडय़ांचे चीनमधील बीजिंग आणि शांघाय या शहरांमध्ये प्रयोग सुरू झाले आहेत.

कोणती कार घेऊ?
* मी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये व्यवस्थापकपदावर कार्यरत आहे. माझे आर्थिक बजेट सात लाख रुपयांपर्यंतचे आहे. किमान पाच लोक बसूशकतील अशी कोणती कार मी घ्यावी?
यशवंत सोनावणे
* तुम्हाला दररोजच्या वापरासाठी किंवा फक्त कार्यालयीन वेळेसाठी कार पाहिजे असेल तर मारुतीची स्विफ्ट डिझायर ही गाडी योग्य ठरेल. यातील मिडल किंवा हाय एन्डचे मॉडेल तुमच्या आर्थिक बजेटमध्ये शक्य आहे. शिवाय पाच लोक बसू शकतील एवढी जागाही या सेडान प्रकारात आहे.
* मी पोलीस कर्मचारी आहे. मला माझ्या घरच्यांसाठी गाडी घ्यायची आहे. माझे बजेट साडेसहा लाखांपर्यंत आहे. डिझेल की पेट्रोल व्हर्जन गाडी घेणे परवडेल?
– श्याम कचवे
* डिझेल गाडी घेणे योग्य. कारण तुम्हाला गाडीचा मर्यादित वापर करायचा आहे. त्यामुळे आर्थिकदृष्टय़ा डिझेल कार परवडणारी आहे. टाटा व्हिस्टा अधिक योग्य पर्याय आहे.
* माझी बहीण एका पायाने अधू आहे. दररोज किमान ६० किमीचा प्रवास आहे. अशावेळी तिच्यासाठी कोणती कार योग्य ठरेल. सीएनजी कार घेणे परवडेल का?
– स्वप्नील निंबाळकर
* तुम्हाला बहिणीसाठी गाडी मॉडिफाय करून घेता येऊ शकेल. मात्र, त्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन अवश्य घ्या. सीएनजी गाडी घेणे परवडू शकते परंतु त्यासाठी तुमच्या परिसरात सीएनजी स्टेशन आहे का, ते कितपत दूर आहे वगैरेची चौकशी करून मगच सीएनजी गाडीचा विचार करा. ऑटोमॅटिक गीअर गाडीबाबतही तुम्ही विचारलेआहे. मारुतीची अलीकडेच बाजारात आलेली सेलेरिओ परवडू शकेल.
* मी व्यवसायाने डॉक्टर आहे. माझा रोजचा प्रवास सुमारे १५ किमीचा आहे. मला जुनी कार घ्यायची आहे. बजेट एक ते दीड लाख रुपये आहे.
– डॉ. संदीप पाटील
* तुम्ही थोडे आणखी बजेट वाढवले तर मारुती अल्टोचे बेसिक मॉडेल तुम्हाला परवडू शकते. कारण तुम्ही एक ते दीड लाख रुपये मोजून जुनी कार घेण्यापेक्षा नवीन कार घेणे केव्हाही चांगले.
* आमचे बजेट साधारण आठ-नऊ लाख रुपये आहे. दररोजच्या वापरासाठी आम्हाला गाडी नकोय. पिकनिकला किंवा आमच्या गावी जायला आम्हाला गाडी हवी आहे. गावाला जाताना तीन घाटही लागतात. घरात चार सदस्य आहेत.  
– गौरव कालेलकर
* तुमच्या बजेटमध्ये कोणतीही हॅचबॅक किंवा सेडान गाडी घेता येऊ शकेल. कॉम्पॅक्ट एसयूव्हीचा विचार करत असाल तर निसानची टेरानो आहे, फोर्डची इकोस्पोर्ट आहे. त्यामुळे तुम्ही या तीनही प्रकारातील गाडी घेऊ शकता. शिवाय तुमची गरज रोजच्या कामासाठी नाहीय. त्यामुळे शक्यतो तुम्ही या कॉम्पॅक्ट एसयूव्हींचा विचार करायला हरकत नाही.
या सदरासाठी तुमचे प्रश्न ls.driveit@gmail.com वर पाठवा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.