भारतातील अभियांत्रिकी शाखेतील वाहनप्रेमी आणि संशोधक वृत्तीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशातून व त्यातून वाहन उद्योगासाठीही काही चांगले काही हाती लागावे, अशा उद्देशातून सुरू करण्यात आलेली बहा एसएई इंडिया ही विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या स्पोर्ट मोटारींची शर्यत. गेली सहा वर्षे ही स्पर्धा महिन्द्रा कंपनीच्या प्रायोजकत्वाखाली होत असून २० ते २३ फेब्रुवारी २०१४ मध्ये मध्य प्रदेशातील पीथमपूर येथे ही शर्यत होत आहे. या आव्हानात्मक अशा शर्यतीचे हे सातवे वर्ष असून भारतभरातील विविध राज्यांमधील अभियांत्रिकी महाविद्यालयांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. या सातव्या बहा शर्यतीची संकल्पना ‘रेज द बार’ असून प्राथमिक स्तरावर झालेल्या चाळणींमध्ये अंतिम फेरीसाठी बहा शर्यतीसाठी  विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या बग्गी मोटारींच्या आरेखनाची परीक्षाच घेण्यात आली होती. महाराष्ट्रातील एकूण ३४ अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील विद्यार्थी चमूंची या बहा शर्यतीच्या अंतिम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांनी तयार केलेली ही बग्गीसारखी स्पोर्ट मोटार कशी तयार केली आहे, त्याचे ब्रेक्स, सस्पेंशन्स, स्टिअरींग यांचे आरेखन कसे केले आहे, संगणकीय अशा कॅड सॉफ्टवेअरवरील त्यांचे आरेखन व सीएई पद्धतीचे विश्लेषण या साऱ्या बाबी, या शर्यतीमध्ये निवड झालेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या विद्यार्थी चमूंकडून सादर करण्यात आल्या. पूर्व, पश्चिम, दक्षिण व उत्तर विभागामधील अनेक महाविद्यालयांकडून प्रवेश अर्ज आले होते. त्यातून शर्यतीच्या अंतिम झुंजीसाठी निवड करण्यात आली. वाहन उद्योगामधील नामवंत व्यक्ती या परीक्षक मंडळावर होत्या. विद्यार्थी चमू आपल्या वाहनांचे आरेखन कसे करतात, ते वाहन कसे चालवितात, त्यांचे कौशल्य कुठे कुठे दिसून येते या साऱ्या बाबीची तपासणी परीक्षकांनी केली.
या स्पर्धेला वाढता प्रतिसाद देशभरातून मिळत असून अभियांत्रिकी क्षेत्रातील युवापिढीचे कौशल्य, बुद्धिमत्ता व प्रत्यक्ष अनुभवाची त्यांची अनुभूती यांची परीक्षा, त्यांचे यातील यशापयश सिद्ध होत असते, अशी प्रतिक्रिया शर्यतीचे आयोजक महिन्द्रा आणि महिन्द्राचे कार्यकारी संचालक व अध्यक्ष डॉ. पवन गोएंका यांनी व्यक्त केली.
भारताच्या दृष्टितून तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामधील आव्हाने पेलण्यासाठी चांगल्या अभियंत्यांची जरुरी असते. अभियंत्या म्हणून महिलांनीही या क्षेत्रात प्रवेस करावा, यासाठी बहाच्या वतीने प्रोत्साहन देण्यात येते. अशा प्रकारचा हा उपक्रम विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित  (एसटीईएम) याकडे वाटचाल करणारा आहे. या क्षेत्रासाठी प्रोत्साहन देणारा आहे, अशी प्रतिक्रया ‘एआरएआय’चे संचालक श्रीकांत मराठे यांनी व्यक्त केली.एसएई इंडिया व महिन्द्रा यांनी भारतात सुरू केलेल्या या शर्यतीमुळे वाहन आरेखनामधील क्षमता सिद्ध करण्याचे एक व्यासपीठच विद्यार्थ्यांना मिळाले आहे. विविध वाहन उत्पादक कंपन्या, व संलग्न उद्योगांनी या बहा ़शर्यतीचे सहप्रायोजकत्व स्वीकारले आहे.