तुमच्या बाइकविषयीच्या आठवणी आम्हाला कळवायच्या. त्या आम्ही शब्दबद्ध करून दर गुरुवारी ‘ड्राइव्ह इट’ पानावर प्रसिद्ध करू. सोबत तुमचा व बाइकचा फोटो असणे अत्यावश्यक. ‘मी बाइकवेडा’ या सदरासाठी असा उल्लेख जरूर करा. मग, चला उचला लेखणी आणि मारा किक.. आठवणींना..! शब्दमर्यादा : २०० शब्द. ई-पत्ता : vinay.upasani @expressindia.com
किरकोळ अपघात अन् कायमची दक्षता
मला तो दिवस अजूनही स्पष्ट आठवतो.. २२ नोव्हेंबर १९९४.. नवीकोरी हिरो होंडा सीडी १०० गाडी मी घेतली होती. या पहिल्या कमाईचा आनंद द्विगुणित करण्यासाठी मी सातारा जिल्ह्य़ातील रहिमतपूर येथून कोल्हापूर जिल्ह्य़ातील चावरे या मूळगावी परतत होतो. तिथे माझे आई-बाबा, सगेसोयरे तसेच मित्रमंडळी होती. त्यांना आपण घेतलेली बाइक दाखवावी आणि दोन दिवस गावात मनसोक्त भटकून पुन्हा रहिमतपूरला परतायचे असा प्लॅन आखून मी निघालो (रहिमतपूरला नोकरीला होतो). रहिमतपूर ते चावरे हे ११० किमीचे अंतर आपण दोन-तीन तासांत पार करू असा विश्वास होता. त्यानुसार कराडमार्गे राष्ट्रीय महामार्गावरून कोल्हापूरच्या दिशेने ताशी ४० किमी या वेगाने मी चाललो होतो. कराड सोडल्यावर पेठनाका हे एक मोठे गाव लागते. तिथून एक फाटा इस्लामपूरमार्गे पुढे मिरज-सांगलीला जातो. त्यावेळी महामार्ग अर्थातच चौपदरी नव्हता आणि दुभाजकही नव्हते. पेठगाव पार करून मी या महामार्गावरू जात होतो. अचानक एका महिला रस्ता ओलांडून जात असलेली दिसली. माझा वेग नियंत्रणात असल्याने ती रस्ता पार करून जाईपर्यंत काही धोका नव्हता. मात्र, रस्ता ओलांडत असतानाच ती महिला मागे फिरली आणि पुन्हा रस्त्याच्या कडेला येऊ लागली. तिच्या या निर्णयामुळे माझी मात्र धांदल उडाली. कारण गाडीवर नियंत्रण ठेवण्याच्या आणि ब्रेक दाबण्याच्या नादात तिला माझ्या गाडीचा उजव्या बाजूकडील हँडलचा दणका बसला. मीही ब्रेक दाबण्याऐवजी क्लच दाबल्यामुळे गाडी तशीच २५-३० फूट पुढे निघून गेली व मी पडतापडता वाचलो. गाडीचा वेग कमी होता म्हणून वाचलो. नाहीतर पडून हात-पाय फ्रॅक्चर झाले असते. गाडी कशीबशी थांबवली. त्या महिलेला चांगलेच सुनावले. तिचा पती रस्त्याच्या पलीकडे गाडी लावून उभा होता. त्यामुळे ती रस्ता पार करत होती. तिने व तिच्या पतीने माझी माफी मागितली. मीही पुढच्या प्रवासाला लागलो. मात्र, तेव्हापासून मी गाडी चालवत असताना समोरून कोणीही रस्ता पार करत असेल तर अलीकडेच गाडी थांबवण्याची दक्षता घेतो. हा किरकोळ अपघात माझ्या मनावर असा परिणाम करून गेला आहे..
प्रा. रमेश जाधव, वाई
मिशन लेह-लडाख
मला बाइकचे प्रचंड पॅशन आहे. इतके की माझ्या गावात बाइक चालवायला मीच पहिले शिकले. कॉलेजमध्ये बिनधास्तपणे बाइक घेऊन जायची. लग्न झाल्यावर मी व माझा नवरा आम्ही दोघेही बाइकवर लोणावळ्याला गेलो. त्यावेळी भर पावसात मीच गाडी चालवली. अगदी मागच्याच महिन्यात आम्ही दोघेही सिंहगडावर बाइकने जाऊन आलो. चक्क २२० सीसीची गाडी मी अगदी आरामात आणि आत्मविश्वासाने चालवली. खूप आनंद होतो बाइक चालवताना. मला बाइकवरून लेह-लडाखचा प्रवास करायचाय. तेवढे नक्की करणारच.
दीपा कानेगावकर, पुणे</strong>