मागील भागात आपण पाहिले की, लोक अदालतमध्ये तडजोडीने तर गुन्हा कबुलीनेही अपघात प्रकरणांचा निपटारा करता येतो. पण या दोन्ही मार्गाच्या काही मर्यादा आहेत. न्यायव्यवस्थेने गुन्ह्यांचे तडजोडपात्र व अतडजोडपात्र गुन्हे असे प्रकार पाडले आहेत. लोक अदालतमध्ये केवळ तडजोडपात्र गुन्हे असलेली प्रकरणे मिटवता येतात, तर गुन्हा कबुलीमध्ये शिक्षेचे प्रमाण व प्रकार हे न्यायाधीशांच्या मर्जीवर अवलंबून असते. बऱ्याचदा छोटीशी शिक्षा किंवा दंडदेखील व्यक्तीला बऱ्याच अडचणींना सामोरे जाण्यास भाग पाडतो. उदाहरणच द्यायचे झाले तर सरकारी कर्मचारी अथवा परिवहन विभागातील वाहनचालक यांच्यावर शिक्षेमुळे खात्यांतर्गत बडतर्फी अथवा पगारवाढ थांबवणे यांसारखी कारवाई होऊ शकते. तेव्हा अशा प्रकारणांत वर नमूद लोक अदालत किंवा गुन्हा कबुली आरोपीच्या मदतीस येत नाही. तसेच अपघाताची काही गंभीर कलमे पाहिली असता लक्षात येते की, न्यायालयांत वरील गुन्ह्यांबाबत तडजोड केली जात नाही. तसेच त्यांची कार्यवाही कठोर स्वरूपाची असते. उदा. हलगर्जीपणा अथवा निष्काळजीपणामुळे एखाद्याला गंभीर दुखापत करणे (कलम ३३८ आयपीसी), अथवा मृत्यूस कारणीभूत ठरणे (कलम.. आयपीसी). या दोन्ही प्रकारच्या कलमांमधून बाहेर पडण्यासाठी एक मार्ग वापरला जातो, तो म्हणजे फिर्यादी, अपघातग्रस्त, साक्षीदार व आरोपी यांच्यात न्यायालयाबाहेर तडजोड केली जाते. यात न्यायालयाबाहेर तडजोड झाली असल्याबाबतचा अर्ज दिला जातो. तसेच फिर्यादी व अपघातग्रस्त, साक्षीदार हे खटला चालवण्यास व साक्ष देण्यास नकार देतात. तसेच सरकारी वकिलांनी त्यांना साक्षीसाठी बोलावल्यास न्यायालयाच्या बाहेर तडजोड झाल्याने ते सरकार पक्षास मदत करत नाहीत. त्यांना सरकारतर्फे फितूर घोषित करून सरकारी वकील उलटतपासणी घेतो. अशा प्रकारे पुराव्याअभावी आरोपीला निर्दोष ठरवले जाते.
हा मार्ग न्यायालयाबाहेरच्या तडजोडीने व सामंजस्याने, सहानुभूतीने मिटवल्यास यशस्वी होतो. मात्र, या मार्गात दबाव, भीती, पसे या तंत्रांचा गैरवापर होण्याची शक्यता असते. तसेच त्यामुळे सामाजिक न्यायालाही धक्का पोहोचू शकतो. तरीही केवळ कायद्याच्या तांत्रिक कार्यप्रणालीच्या दोषामुळे वा परिस्थितीजन्य न्याय निर्माण करण्यासाठी या मार्गाचा वापर केला जातो. हा मार्ग कितपत कायदेशीर व नैतिक आहे हे सांगता येत नाही. तरीही त्याचा योग्य परिस्थितीत वापर केला असता आरोपीवरील अन्याय थांबवता येतो. या मार्गाचा वापर हा अतिशय काळजीपूर्वक केला पाहिजे. या मार्गाने आपण आरोपीचे होणारे नुकसान थांबवू शकतो व योग्य अशी न्याय्य परिस्थिती निर्माण करू शकतो. गुन्हा तडजोडपात्र नसला तरी वरील मार्गाने प्रकरण मिटवता येते.