‘‘पत्रकार आणि कार्यकर्ता या दोन्ही भूमिकेत जगताना मी काहीबाही लिहीत गेले. पण माझ्या मते मी तशी लेखक नाही. ना मी विचारवंतांसारखं वैचारिक लेखन केलं ना सर्जनशील ललित लेखनात कथा, कादंबऱ्या, कविता लिहिल्या. हो, मी लिहिते, पण ते लेखन भारवाहकासारखं आहे. मला हे जग बघता अनुभवताना जे स्वत:ला नव्यानं समजलं असं वाटतं ते मी लिहिते किंवा थोरामोठय़ांच्या लेखनातून किंवा जगण्यातून जे मला मोलाचं वाटतं, ते त्यांच्या नावानेच पण आपलंसं करून लोकांपर्यंत पोचवते.’’
शाळकरी वयात नेहमीच विचारलं जातं ‘मोठेपणी कोण होणार?’ या प्रश्नाचं मी तेव्हा काय उत्तर दिलं होतं मला आठवत नाही. पण त्याबरोबरच हेही नक्की आठवतं की मी असं काहीच ठरवलं नव्हतं! खरं तर लग्न झाल्यानंतर, ओढगस्तीच्या संसाराला आíथक मदतीची गरज होती आणि शिवाय मलाही नुसता स्वयंपाकपाण्याचा संसार करण्यात फारसा रस नव्हता. यामुळे मी नोकरीच्या शोधात होते. लिहिण्यावाचण्याची आवड आणि पुणे आकाशवाणीतला वर्ष दीडवर्षांचा नोकरीचा अनुभव, एवढय़ाशा ‘पात्रतेवर’ मी शांताबाई किर्लोस्करांना फोन केला. ‘स्त्री’ मासिकात काम मिळावं म्हणून त्यांना भेटायला गेले आणि माझा किर्लोस्कर प्रकाशनात प्रवेश झाला. आज वळून बघताना वाटतं की केवळ पोटापाण्यासाठीची एक नोकरी एवढय़ाच मर्यादित हेतूनं, तिथे मी पहिलं पाऊल टाकलं होतं. बावीस वर्षांनंतर मी तिथून बाहेर पडले तेव्हा मी केवळ ‘स्त्री’ मासिकाची संपादकच झाले नव्हते तर पुढच्या संपूर्ण आयुष्यासाठीची केवढी तरी मोठी शिदोरी माझ्या पदरात जमा झाली होती!

20पत्रकारितेमध्ये समाजाचं प्रबोधन, परिवर्तन घडवण्याचं केवढं सामथ्र्य आहे हे माझ्या लक्षात आलं होतं. त्याचं महत्त्व समजून घेताना, त्याची सुरुवात गांधीजी म्हणत तशी, स्वत:मधल्या बदलापासून करायची असते, हेही लक्षात आलं. आणि वयाच्या पस्तिशीनंतर पुन्हा एकदा (वैचारिक अंगानं) ‘शहाणी’ आणि ‘मोठी’ होण्याची प्रक्रिया माझ्यामध्ये सुरू झाली. मी दोनदा वयात आलेलं माणूस आहे. एकदा शरीरानं आणि मग विचारानं. ‘स्त्री’ मासिक हे प्रगतिशील विचारांचंच मासिक होतं. त्यामुळे माझ्या मध्यमवर्गीय, बंदिस्त चौकटीतल्या मानसिकतेतून, बाहेरच्या मोकळ्या निरभ्र अवकाशात पाऊल टाकायला, ‘स्त्री’मधल्या कामाची मला मोठीच मदत झाली. एका टप्प्यानंतर तर या नव्या अवकाशात, काही नव्या जाणिवा स्वानुभवातून आणि सहानुभवाच्या माध्यमातून माझ्यात निर्माण झाल्या आणि वाचकांपर्यंत त्यांना पोचतं करण्याच्या अनेक वाटा मला सापडल्या.

माझ्या लक्षात आलं की संपादक त्याच्या स्वत:च्या लेखनातून आणि त्याने संपादित केलेल्या साहित्यातूनच मुख्यत: वाचकांना भेटतो. त्यामुळे तो वाचकांसाठी हवा तेवढा दूरचा आणि हवा तेवढा जवळचा वाटू शकतो. प्रत्यक्ष भेट नसल्यामुळे अनोळखी तर लेखनवाचनातल्या संवादामुळे थोडा ओळखीचा वाटत असतो. वाचक संपादकांच्या व्यवहारात तो हवा तेवढा अनाम किंवा सनाम राहू शकतो. यातून घडणारा संवाद हृद्य, जीवघेणा, अस्वस्थ करणारा असा विविधरंगी असल्याचा माझा अनुभव आहे.

१९७५ नंतरचा काळ. संयुक्त राष्ट्रसंघाने हे महिला आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून जाहीर केलं. पुढे त्याचाच दशकात विस्तार झाला. नवे विचार, नवी नावं – देशातली आणि परदेशातली पुढे यायला लागली. म्हटलं तर लौकिकदृष्टय़ा सारं काही आलबेल असूनही, अधूनमधून कसली तरी अस्वस्थता माझ्या मनात हेलावायला लागली! स्त्री-पुरुष विषमता हा तर अनुभवच होता, पण त्याविषयी फारशी स्पष्टशी जाणीव जागी झाली नव्हती. तिला जाग यायला लागली आणि हे मनातले कवडसे प्रकाशताना चक्क उन्हाचे चटकेच बसायला लागले! त्याची छोटी-मोठी प्रतििबबं ‘स्त्री’च्या माझ्या ‘संवादा’त किंवा संपादनातून तयार झालेल्या अंकात उमटायला लागली. वाचक त्यापूर्वीही पत्रं लिहीतच होते. पण आता त्यांचा नूर पालटला. त्यात कधी विचार न पटल्यामुळे, वाचकाच्या कपाळावर उमटलेल्या आठय़ा दिसायच्या, तर कधी दिसेल न दिसेलसं ओठांच्या कोपऱ्यातलं पसंतीचं हसू दिसायचं. यातले प्रत्यक्ष भेटीचे आणि पत्रातून भेटलेले अनुभव आजही माझ्या मनात घर करून आहेत.

एके दिवशी, ‘स्त्री’च्या कार्यालयात, साधारण पन्नाशीच्या पुढच्या वयाच्या बाई अचानकच माझ्याकडे आल्या. आपणहून काहीच न बोलणाऱ्या त्या बाईंकडे मी बघत होते. सुखवस्तू, खरं तर त्याही वरच्या आíथक स्तरावरच्या त्या बाई झुळझुळीत साडी, हातात पर्स, पण चेहरा काहीसा उदासलेला. मी नाव, गाव, काम याबाबत थोडे जुजबी प्रश्न विचारल्यावर त्या म्हणाल्या, ‘खूप अवघड वाटतंय पण असह्य़ झालं म्हणून आले. ताज्या मासिकातला तुमचा ‘संवाद’ वाचला आणि धीर करून आले इथवर. पुण्यात माहेर आहे पण आम्ही महूला असतो. यांची नोकरी आणि खाक्या सगळंच लष्करी. या वयात ते माझ्यावर राजरोस हात टाकतात. मुलं मोठी आहेत, पण समोर असली तरी मध्ये पडत नाहीत. कुणाला खरं वाटू नये असं घराबाहेर यांचं वागणं! मला समजलंय मी काहीच करू शकत नाही. पण वाटलं, आज निदान हे तुमच्याशी येऊन बोलावं.’ बाईंचा स्वर गदगदलेला, डोळे भरून आलेले. माझ्या खुर्चीवरून उठून, त्यांच्याजवळ जात मी त्यांच्या खांद्यावर आश्वासक हात ठेवला. समजावणीचं, धीराचं काही बोलले. खरं तर हे सगळंच अपुरं होतं! त्या चेहरा ठाकठीक करत, माझ्या केबिनमधून बाहेर पडल्या.

काही महिन्यांनंतरची गोष्ट. अशीच एक मुलगी, गावाकडून आलेली. माझ्या समोर बसलेल्या बाईंसोबतच आत आली. त्या बाईंबरोबर बोलणं चालू असताना, माझ्या टेबलावर तिनं डोकंच टेकवलं. ती काही बोलेना, हलेना. तिला चक्कर आली असावी. त्या बाई जायला उठताउठताच हे घडलं. तेव्हा माझ्या लक्षात आलं की त्या दोघी एकाच वेळी आत आल्या तरी, त्या वेगवेगळ्याच आल्या होत्या. आम्ही दोघींनी तिला पाणी देऊन, पाठीवर हात फिरवून जागं केलं. ती पार थकून गेली होती. थोडी बोलती झाल्यावर कळलं की ती कोकणातल्या एका छोटय़ा गावातून आली होती. तिचं पाकीट आणि पोट बहुधा दोन्ही रिकामं असावं! तिला मी कँटीनमधून थोडं खाऊपिऊ घातलं. ती म्हणाली, ‘तुमचं मासिक मी वाचते. आईवडिलांच्या विसंवादातून माझं घर फुटलय. मी एकटी घर सोडून दुसऱ्या गावी राहाते आहे. शिकवण्या घेते. पण माझं असं केस कापलेल्या केसांचं डोकं, घरात गाऊन घालणं आणि मुख्य म्हणजे महिन्याचे चार दिवस ‘वेगळं न बसणं’ हे माझ्या घरमालकांना पसंत नाही. ते जागा सोडायला सांगताहेत. मला इथवर येण्याचं, घर सोडून एकटं राहाण्याचं बळ तुमच्या मासिकानं दिलंय. तुम्हाला कल्पना नसेल अशा माझ्यासारख्या छोटय़ा गावात ‘असं’ सन्मानानं स्वावलंबनानं जगताना, तुमचे शब्द केवढं बळ देतात. म्हणून तर एवढा प्रवास करून प्रत्यक्ष ओळख नसताना मी इथवर आले. ‘हे मासिक, ते लिहिणारं माणूस आणि मासिकाचं जन्मस्थान बघायला मी इथं आले आहे.’ आता अनेक कारणांमुळे डोळे भरून येण्याची माझी पाळी होती! गोष्ट इथेच संपली नाही या मुलीचं नाव, गाव ओळख पूर्ण बदलून मी तिच्यावरच एक ‘संवाद’ लिहिला. ते वाचून मुंबईच्या एका गृहस्थांचा फोन आला. रागारागाने ते बोलत होते, तुम्ही लिहिलंय तसं काही झालेलं नाही. माझ्या बहिणीच्या बाबतीत तुम्हाला हे सारं लिहिण्याचा अधिकारच काय? इ. इ.’ त्यांच्याशी बोलल्यावर लक्षात आलं की त्यांच्या बहिणीच्या आणि या कोकणातल्या मुलीच्या बाबतीत काही साम्यस्थळं नक्कीच होती. पण त्या वेगवेगळ्या ठिकाणच्या दोघीजणी होत्या. आणि त्या ‘संवादा’मुळे हा काहीसा विसंवादी अनुभव मला आला होता. असे कितीक अनुभव मला भेटले. त्यातले दोन हे वानगीदाखल म्हणून सांगितले. हे दोन्ही अनुभव ‘स्त्री’ मासिकात काम करत असतानाचे म्हणजे १९८०-८५च्या आसपासचे. दोन्ही अनुभवात, दोघींची वयं, आíथक स्तर, कौटुंबिक परिस्थिती सगळंच वेगळं होतं. वास्तवाची ही एकेकटी आणि तरीही प्रातिनिधिक रूपं होती.

21‘मिळून साऱ्याजणी’मधल्या कामातही किती तरी अनुभव आले. नावामुळे हे मासिक अनेकांना केवळ स्त्रियांचं, स्त्रियांसाठीचं मासिक आहे असं वाटतं. ते तसं नाही हे कारणाकारणाने मी स्पष्ट करत असते. आपल्या संस्कृतीचं प्रतििबब आपल्या भाषेत पडत असतं. त्यामुळे एखाद्या कार्यक्रमाचं निमंत्रण देताना. ‘या हं सगळेजण’ असं निमंत्रणात म्हटलं तरी ‘सगळ्याजणी’ त्यात गृहीत धरल्या जातात आणि त्यानुसार आम्ही त्या त्या वेळी सहभागी झालोही. आज होतोही. मासिकाचं नाव निश्चित करताना म्हणूनच असा विचार केला की नाव ठेवू या ‘मिळून साऱ्याजणी’ आणि साऱ्या जणांचं त्यात स्वागत आहे असं सांगत, म्हणत आणि वागतही राहू या. म्हणूनच यानिमित्ताने पुन्हा एकदा संधी घेऊन सांगते की हे मासिक साऱ्याजणींचं आहे. सारेजण मध्ये साऱ्याजणी तसंच साऱ्याजणीत सारेजण. त्यात साऱ्या पुरुषांचं स्वागत आहे. या भूमिकेतून अनेकदा पुरुषांच्या सहभागासाठी चर्चा योजली जाते. एकदा घरच्या कर्त्यां पुरुषाला उद्देशून विषय दिला होता, ‘तुमच्या घरात, तुमच्या पत्नीला (ती नोकरी करत असो की नसो) खास तिच्यासाठी काही पॉकेटमनी म्हणून पसे दिले जातात का?’ यावर एका नवऱ्याचा जरा रागारागानेच फोन आला, ‘असला विषय देऊन तुम्ही घरोघर नवरा-बायकोत भांडणं लावू बघता आहात का?’ या चच्रेत जे अनेक पुरुष सहभागी झाले होते, त्यात याही गृहस्थांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. त्यांनी लिहिलं होतं, ‘आमच्या घरात सर्वासाठी, खर्च करण्याचे पसे एका डब्यात ठेवलेले असतात. त्यातून कुणीही पसे घेऊन खर्च करू शकतं. अट एकच, केलेल्या खर्चाचा तपशील लिहिलेला कागद डब्यात टाकायचा.’ ही पद्धत केवळ बायकोच्या संदर्भातली नाही हे खरं, पण तरी मला ती फारच लोकशाहीला धरून वाटली. आणि आलेल्या सहभागींपकी ती तशी फक्त एकमेव होती. आणि तरी बघा, त्या गृहस्थांनी आवाहनाला फोनवरून रागीट प्रतिसाद, प्रतिप्रश्न केला होता! बापलेकीच्या नात्यासंबंधीचा अशाच एका वाचकचच्रेत, एका बापानं लिहिलं होतं – ‘मुलगी आता मोठी झाली आहे पण मला प्रश्न पडतो की मी मुलीला वाढवलं की मुलीनं मला वाढवलं?’

संपादक आपलं नियतकालिक केवळ एक धंदा म्हणून चालवत नसेल, आपल्या मनातलं एक छोटंसं पण निश्चित उद्दिष्ट ठेवून काम करत असेल तर एका परीने संपादक-वाचकांचं एकमेकांत एक प्रकारचं जैविक नातं उभरत राहातं. ते केवळ लेखणी कागद एवढय़ापुरतं मर्यादित न राहाता, त्याला एक मानवी स्पर्श आणि चेहरा मिळतो. यातून संपादकाला आपल्या एका आयुष्याबरोबर कित्येक शेकडो माणसांच्या घरात, मनात पोचण्याची संधी लाभते. त्यातून तुम्हाला पत्रव्यवहारात रस असेल तर मग बातच सोडा. त्या पत्रांनी विणलेले धागे तर जवळपास अजरामर होतात!

माझ्या वाचक पत्रव्यवहारात स्त्रियांनी आपल्या मनातली सल, घुसमट व्यक्त करण्यासाठी लिहिलेल्या पत्रांना मी कधीही अनुत्तरित ठेवलं नाही. माझा काळ फेसबुक, ब्लॉग, ई-मेलचा नव्हता. त्या वेळच्या या पत्रांना एक वेगळाच स्पर्श आणि गंधही होता.
शांताबाई किर्लोस्करांनी मला एकदा बोलताबोलता सांगितलं होतं, ‘शंकरभाऊ (किर्लोस्कर) नेहमी सांगत, आपला वाचक एक आणा खर्चून जेव्हा पत्र पाठवतो तेव्हा त्याला उत्तर देणं हे आपलं कर्तव्यच असतं!’ मला पत्र लिहिण्यात रस होताच, पण हे ऐकल्यावर मला माझ्या संपादकीय जबाबदारीचं भान आलं. ‘स्त्री’मधल्या, शेवटच्या टप्प्यावरच्या काळात, नव्यानं अन्याय, आत्मसन्मान याविषयीची मनोगतं सांगणारी वाचकांची पत्रं वाढली होती. पण ती प्रसिद्धीसाठी नव्हती, केवळ मन मोकळं करण्यासाठीची होती. मी त्यांना मनापासून उत्तरं देत, एक प्रकारची फुंकरच घालत होते. मला एक मानसिक समाधान वाटत होतं. बहुधा लिहिणारीलाही वाटत असावं. पण लवकरच लक्षात आलं की हे सारं किती अपुरं आहे. न पाहिलेल्या, भेटलेल्या मध्य प्रदेशातल्या, विदर्भातल्या किंवा धारवाडच्या या पत्रलेखिकेला एवढय़ाशा फुंकरीने खरं तर काय मिळणार! ती फुंकर हवीच पण त्या शब्दांच्या फुंकरीपलीकडे काही कृतीही आवश्यक आहे ही भावना दृढ व्हायला लागल्यावर, आमच्या समविचारी गटातल्या मित्रमत्रिणींनी एक निर्णय घेतला. त्यात सत्यरंजन साठे, समर नखाते, अजित आणि वसुधा सरदार, नीलम गोऱ्हे, साधना, जयदेव गायकवाड असे काहीजण होते. आम्ही कृतीच्या दिशेनं पाऊल उचलायचं ठरवलं आणि त्यातूनच १९८२ मध्ये ‘नारी समता मंचा’ची स्थापना झाली. मी पत्रकार झाले होतेच पण आता मी एक कार्यकर्ती म्हणून वाट चालायला सुरुवात केली. जगभरात स्त्री-चळवळीतला सुरुवातीचा ‘वीमेन ओन्ली’चा तो काळ होता. पण आम्ही मात्र स्त्री अत्याचाराविरोधात तेव्हापासून आजतागायत स्त्री-पुरुष मिळूनच काम करत आहोत.

‘नारी समता मंचा’त एकदा एक स्त्री तक्रार घेऊन आली. एक पुरुष तिच्याशी जबरदस्ती करत होता- असं म्हणत तिनं सारा तपशील सांगितला. का कोण जाणे ऐकताना असं वाटत होतं की हे काही खरं नसावं, काही बनाव असावा. आम्ही सात आठजण ४/५ स्कूटर्सवरून पार सांगवीला गेलो. १९९० च्याही आधीची ही घटना. त्या संबंधित सरदारजीशी बोलून परतताना आम्हा सगळ्यांनाच तो साधा सरळ आणि निर्दोष वाटला आणि बाईनं हे कुभांड रचलंय असं वाटलं. आम्ही अधिक चौकशीनंतर त्या स्त्रीची तक्रार निकाली काढून त्या पुरुषाला आश्वस्त केलं. आमची ती संध्याकाळ एका वेगळ्या समाधानानं भरून गेली.

दुसरी एक घटना मात्र एखाद्या खोलवरच्या जखमेसारखी आजही प्रचंड अस्वस्थता आणि हताशाच देत राहिली आहे. पुण्यातल्याच एका वाडय़ात, एका मुलीचं सासर होतं. सासरी प्रचंड छळ होता. २-३ महिन्याचं तान्हं बाळ होतं. तिला दिवस राहिल्यापासूनच तिचे वडील, ‘नारी समता मंचा’त तक्रार दाखल करायला, भेटायला येत होते. त्यांचं एक वाक्य मी विसरू शकत नाही. मुलीच्या छळवादाची दीर्घकहाणी ऐकल्यावर आम्ही विचारलं- ‘भाऊ, या आधीच का नाही आलात इकडे? पोरीला किती सोसायला लावलंत?’ ते म्हणाले, ‘ताई, एवढं नव्हते हो मारत सुरुवातीला. पुढे लईच झालं. तेव्हा आलो ना!’ म्हणजे थोडा मार खाणं हा बाईच्या जन्माचा भोगच असतो, असं मानणारे लोक अजून पुण्यातसुद्धा आहेत, हे कळल्यामुळे आम्ही सुन्न झालो! त्या मुलीच्या घरात जायचं आणि तिला घेऊनच यायचं असा आमचा बेत आखून पक्का झाला. तिचं कोणतं सामान कमीत कमी वेळात उचलता येईल, कोण काय उचलेल, किती वाजता, कुठे जमायचं- साऽरं ठरलं. तिचे वडील घर दाखवायला फडके हौदापाशी यायचे होते. दिल्या वेळेपेक्षा तासभर जास्त वेळ गेला. ते आलेच नाहीत. कार्यकत्रे नाराज होऊन परतले. संध्याकाळी आम्ही एकत्र जमलो तेव्हा सगळा उलगडा झाला. त्याच दिवशी सकाळी तिच्या सासरच्यांनी तिला जाळून मारली होती. ही संध्याकाळ मोठाच धडा शिकवून गेली. अगदी खचायला झालं. त्या वेळी आमच्या एका ज्येष्ठ समुपदेशक, संवादक मत्रिणीने या कामातल्या कार्यकर्त्यांना सांगितलं होतं ते आठवलं. ती म्हणाली होती, ‘लक्षात ठेवा. प्रत्येक वेळी आलेल्या व्यक्तीच्या भल्यासाठी, सुटकेसाठी आटोकाट प्रयत्न करायचा. पण म्हणून प्रत्येक वेळी आपल्याला यश येईलच असं गृहीत नाही धरायचं. म्हणजे मग ‘बर्न आऊट’ न होता हे काम बरीच र्वष सातत्यानं करता येतं. स्त्री प्रश्नावर काम करताना, अशा घटना हाताळताना, जीव पणाला लागतो. तिच्याबरोबरीने आपल्या जिवाला घोर लागतो. सारखा सारखा असा घोर लावून घेतला तर आपण मेणबत्तीसारखे वितळून जातो.’ त्या मत्रिणीचा सल्ला फार मोलाचा आहे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी!

पत्रकार आणि कार्यकर्ता या दोन्ही भूमिकेत जगताना मी काहीबाही लिहीत गेले. पण माझ्या मते मी तशी लेखक नाही. ना मी विचारवंतांसारखं वैचारिक लेखन केलं ना सर्जनशील ललित लेखनात कथा, कादंबऱ्या, कविता लिहिल्या. हो, मी लिहिते. पण ते लेखन भारवाहकासारखं आहे. मला हे जग बघता अनुभवताना जे स्वत:ला नव्यानं समजलं असं वाटतं ते मी लिहिते किंवा थोरामोठय़ांच्या लेखनातून किंवा जगण्यातून जे मला मोलाचं वाटतं, ते त्यांच्या नावानेच पण आपलंसं करून लोकांपर्यंत पोचवते. अनुभवांना, निरीक्षणांना कलात्मक रूप देण्याची माझी कुवत नाही. हे मी ‘स्त्री’च्या संपादनाचं काम करताना माझ्या लक्षात आलं. तोपर्यंत लिहिलेल्या, प्रसिद्ध झालेल्या कथांनंतर मी कथालेखन थांबवलं आणि माझ्या मते वाचकांना एका संकटातून वाचवलंसुद्धा.

आज वयाच्या ऐंशीव्या वर्षी मागे वळून बघते तेव्हा लक्षात येतं की, पत्रकारितेतल्या प्रवेशापासून आज पन्नास वर्षांचा काळ लोटला. ३०-३५ र्वष माझ्या कुवतीनुसार सामाजिक कामात कार्यकर्ता म्हणून वावरते आहे. मागे बघायला आणि आठवायला हा खूपच मोठा आणि वळणावळणाचा पस आहे. पुढे आणि समोर बघताना मात्र आता एकच वळण बाकी आहे. पण या अखेरच्या वळणापर्यंत पोचण्याआधीपासून म्हणजे ३०-३५ वर्षांपूर्वीपासूनच हे वळण मी डोळ्यासमोर ठेवून आहे. निराशा-हताशा या मन:स्थितीतून नाही तर ‘सन्मानाने मरण्याचा हक्क’ या जाणिवेतून. याच नावाचं पुस्तक वि. रा. लिमये (सांगली) यांनी १९८५ साली लिहिलं. ते माझ्या वाचनात आलं आणि गुणवत्तापूर्ण जगण्याबाबतचं माझं भान अधिक समृद्ध झालं. ‘स्वेच्छामरण’ हा मरणापेक्षा, गुणवत्तापूर्ण जगण्याचाच विचार आहे याची मला खात्री पटली. त्याबाबतचं जनजागरणाचं काम मी एका गटासोबत करते आहे. नेहमीसाठीच पण निदान साठी-सत्तरीनंतरच्या आयुष्यात तरी या उरलेल्या मर्यादित दिवसात (ते किती आहेत नसेना का माहीत) लोकांसाठी किंवा लोकांपुढे नाही, तर स्वत:साठी, स्वत:च्या समोर उभं राहायला हवं. अर्थपूर्णता, शांतता, समाधान, कृतज्ञता आणि त्याबरोबरच जे राहून गेलं किंवा जाणते-अजाणतेपणी वागू नये तसं वागणं झालं त्याबद्दलचाही माझ्या मनात एक जमाखर्च आहे. लौकिक पातळीवर काही जमा आहे माझ्या नावावर पण ते खरं तर माझ्या कुवतीपेक्षा अधिकच जमा आहे, असं मला वाटतं.

एकटीनं जगण्याच्या स्वेच्छानिर्णयाची पंचविशी होऊन गेली आहे. आज मी अतृप्त नक्कीच नाही. पण अस्वस्थ मात्र जरूर आहे अशी अस्वस्थता मला जीवनावश्यकच वाटते. भवतालाकडे सजगपणे बघत जगताना या अवस्थतेतून मनात प्रश्नाचं काहूर माजतं त्याबाबत आपल्या कुवतीप्रमाणे काम करत राहायचं. यशापयशाचा विचार करायचा नाही. विवेकाचा आधार घेत भावनेला त्यासोबत ठेवून चालण्याचा माझ्या प्रयत्न आहे. कधी तरी एखाद्या निवांत क्षणी, कितव्यांदा तरी लक्षात येतं की विवेकासारखा सच्चा सोबती कुणी नाही.