03 June 2020

News Flash

अभक्ताची भक्ती

भौतिक संपत्तीच्या कामनेच्या जागी संतोष, निर्लिप्तता, निर्भयता या आध्यात्मिक संपत्तीची दिव्य कामना उत्पन्न होते.

 

चैतन्य प्रेम

कलावतीआईंकडे एक माणूस प्रथमच आला. म्हणाला, ‘‘आई, मी गणपतीची खूप भक्ती करतो, तरीही माझ्यावर संकट आलं आहे. गणपती जर संकटनाशक आहे, विघ्नहर्ता आहे, तर मग माझ्यावर संकट आलंच कसं?’’ आता आपणही ‘भक्ती’ करतो आणि म्हणून संकट येताच हा प्रश्न आपल्याही मनात उद्भवतो. आता भक्ती म्हणजे काय करत होता तो? तर संकष्टी करायचा, रोज गणपती स्तोत्र वाचायचा, गणपतीच्या देवळात जाऊन अकरा प्रदक्षिणा घालायचा. आता बघा, आपणही अशा अनेक गोष्टी ‘भक्ती’ म्हणून करतो आणि स्वत:ला ‘भक्त’सुद्धा म्हणवून घेतो. आता उपवासाचंच पाहा. ‘उपवास’ या शब्दाची फोड दोन प्रकारे होते. श्रीगोंदवलेकर महाराज म्हणत की, ‘‘उपवास म्हणजे उप+वास, म्हणजेच भगवंताच्या जवळ मनानं राहणं.’’ गुरुजी एकदा म्हणाले की, ‘‘उपवास माने उपर वास!’’ म्हणजे आपण ज्या ‘मी’ आणि ‘माझे’नं व्यापलेल्या भौतिक विचारात नेहमी गुंतून असतो, त्या विचारांतून वर येऊन तो दिवस भगवंताच्या चिंतनात व्यतीत केला पाहिजे. अशी संकष्टी, अशी एकादशी आपण करतो का? तर नाही. त्यामुळेच संकष्टी करूनही आपण कष्टीच असतो, एकादशी करूनही एका दशेत स्थिर नसतो. आपण स्तोत्र वाचतो, मंत्र म्हणतो. पण ‘स्तोत्र’चा अर्थ काय? ‘स्तूयते अनेन इति स्तोत्रम्’ अशी एक व्याख्या आहे. त्यातील ‘अनेन’ हा ‘अनन्येन’च भासतो. म्हणजे त्रिगुणाच्या पसाऱ्यात राहूनही ज्यायोगे अनन्य भावानं परमेश्वराची स्तुती केली जाते ते म्हणजे स्तोत्र! याच त्रिगुणांच्या प्रभावातून मनाला जो सोडवतो तोच ‘मंत्र’! पण हा भाव लक्षात घेऊन आपण स्तोत्र वा मंत्र म्हणतो का? तर स्तोत्र वा मंत्र म्हणतानाही ‘त्र’चीच चिंता, ‘त्र’चंच अनन्य प्रेम आपण जोपासत असतो. आता अनेक स्तोत्रांची फलश्रुती ही भौतिक कामनेच्या पूर्तीची ग्वाही देते, हे खरं आहे. पण मूळ भाव जर हा ठेवला की, मी अमुक एका कामनेच्या पूर्तीसाठी हे स्तोत्र म्हणत आहे तेव्हा त्या कामनापूर्तीची चिंता भगवंतावर सोडून मी हे स्तवन मन लावून, आनंदानं वाचीन, तर काय हरकत आहे? असा भाव झाला ना, तर मग फलश्रुतीतील प्रापंचिक फळांचे आध्यात्मिक अर्थही प्रकाशमान होत जातात. भौतिक संपत्तीच्या कामनेच्या जागी संतोष, निर्लिप्तता, निर्भयता या आध्यात्मिक संपत्तीची दिव्य कामना उत्पन्न होते. आरोग्यप्राप्तीच्या कामनेच्या जागी भवरोग दूर व्हावा, ही कामना अपेक्षिली जाते. भौतिकाबाबत माणसानं बेफिकीर राहावं, असा याचा अर्थ नाही. पण या सर्व स्तोत्र, मंत्र पठणानं आसक्ती, मोह आणि भ्रमयुक्त त्रिगुणांचा प्रभाव दूर करणारी आंतरिक शक्ती जागी करायची आहे. ती जागी होत असतानाच भौतिकातील कामनांच्या पूर्तीसाठी भौतिकात प्रयत्न करायचेच आहेत. मग या स्तोत्र-मंत्रांमुळे काय होईल? तर, धारणा स्पष्ट होतील, आत्मविश्वास, निर्णयक्षमता आणि परिस्थितीला तोंड देण्यासाठीचं धैर्य वाढेल. पण असं स्तोत्र वा मंत्रपठण आपण करतो का? तिसरी गोष्ट मंदिरात जायची! आता मंदिराचं वेगळेपण काय असतं हो? आपण कुणाच्या घरी जातो, तर ते घर प्रापंचिक गोष्टींनीच भरलेलं असतं. तिथं आत्मस्तुती आणि परनिंदेनं भरलेल्या चर्चेलाच ऊत येतो. मंदिरात खरं तर देव आणि आपण यापलीकडे काही नाही. प्रपंचाचं स्मरण करून देणाऱ्या गोष्टीही नाहीत. पण तिथंही आम्ही एकदा देवाला हात जोडून झाल्यावर ओळखीचं कुणी भेटलं, की प्रापंचिक गप्पांतच रमतो!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2020 12:06 am

Web Title: article on devotion to the devotee abn 97
Next Stories
1 तत्त्वबोध : मुक्तद्वार
2 तत्त्वबोध – महाल आणि झोपडी!
3 अभिनव यज्ञ!
Just Now!
X