03 June 2020

News Flash

अंतर्मुखतेकडे..

जीवनाची गती थोडी कमी केल्याशिवाय आपण वाट फुटेल तिकडे निरुद्देश आणि निर्थक धावत आहोत, हे उमगत नाही.

चैतन्य प्रेम

जीवनाची गती थोडी कमी केल्याशिवाय आपण वाट फुटेल तिकडे निरुद्देश आणि निर्थक धावत आहोत, हे उमगत नाही. ते उमगावं आणि जगण्याची योग्य दिशा कोणती आणि वाट कोणती, हे उमगावं यासाठी संत-सत्पुरुषांच्या बोधप्रकाशात चाललं पाहिजे. त्यादृष्टीनं पुदुच्चेरीच्या श्रीमाताजींच्या एका प्रवचनावर आपण चिंतन करीत आहोत. माताजी म्हणतात की, ‘‘तुम्ही बहुतेक जण तुमच्या जाणिवेच्या पृष्ठभागावर राहता. जणू स्वत:च्या शरीराच्या बाहेर प्रक्षेपित होऊन वावरत असता. पण तुम्ही नेहमी अंतर्मुख व्हायला पाहिजे. अंतरंगामध्ये खोल जाण्यास शिकले पाहिजे.’’ आपण जाणिवेच्या पृष्ठभागावर सतत वावरत असतो, म्हणजे काय? श्रीनिसर्गदत्त महाराज म्हणत की, ‘‘आपला जन्म झाला आहे आणि आपण मरणार आहोत या कल्पनेत तुम्ही अडकून जगत आहात!’’ आता या दोन गोष्टी खोटय़ा आहेत का? तर नाही. ‘जन्म’ही खरा आहे आणि ‘मृत्यू’ही खरा आहे; मग महाराजांच्या म्हणण्याचा रोख नेमका काय आहे? तर ‘मी जन्मलो’ यास जन्मत:च किती गोष्टी चिकटतात? प्रथम इतरांनी दिलेलं नाव चिकटतं, जात-धर्म चिकटतो, जन्म झाला त्या घरची आर्थिक, सामाजिक पृष्ठभूमी चिकटते, मान-उपेक्षा चिकटते, जीवनसंघर्षांचे रूप चिकटते! त्यातील जे देह-मनाला चांगलं वाटतं ते टिकवणं, वाढवणं आणि जे देह-मनाला रुचत नाही, ते दूर करीत संपवू पाहणं, हे म्हणजेच जगणं ठरतं! त्या देह-मनाच्या आवडींची कधी तपासणी होत नाही. जगण्यासाठी देह महत्त्वाचा आहेच आणि या देहावर माणूस जीवापाड प्रेम करतो, पण मुळात आपलं देहावर टोकाचं प्रेम असतं का हो? तर नाही! जर पायात विष भिनू लागलं व ते शरीरभर पसरण्याचा धोका निर्माण झाला, तर माणूस आपलाच पाय कापून घ्यायलाही तयार होतो! तेव्हा आपलं खरं प्रेम जीवनावर आहे, जगण्याच्या इच्छेवर आहे! पण आपण एका जन्माच्या ओळखीत स्वत:ला चिणून टाकलं आहे आणि त्यामुळे त्या ओळखीपलीकडे आपल्या जाणिवेची कक्षाही कधीच रुंदावलेली नाही! आपली प्रत्येक जाणीव ही देह-मनाच्या आवडीनावडीनुसार बद्ध आहे! त्या देह-मनाला प्रत्येक क्षणी जपण्यापुरत्या जाणिवा जागृत असतात. त्या शरीराबाहेर पसरतात; पण देहभावालाच अखंड चिकटून असतात. आता गंमत पाहा.. मूल जन्माला येतं तेव्हा सगळ्यांना कोण आनंद होतो; पण ते जन्मत:च रडलं नाही तर चिंता वाटू लागते! इतकं जन्मापासूनच रडणं मोलाचं ठरलं आहे! देह-मनासाठी जन्मभर लढण्याची नाही तर कुढण्याची आणि रडण्याची सवय चिकटली आहे. या रडण्या-कुढण्यात जसा अविचारच आहे, तसंच त्या लढण्यातही अनेकदा अविचारच आहे. कारण तो लढा संकुचित ‘मी’च्या तात्कालिक सुखाभासाच्या प्राप्तीपुरता आहे. तेव्हा ‘मी’ची जी ओळख आहे तिच्यातच बद्ध जाणिवेसह मी जगत आहे. श्रीमाताजी म्हणतात त्यानुसार, या वरवरच्या जाणिवेत न वावरता आपण खोलवर गेलं पाहिजे. अंतर्मुख झालं पाहिजे. देहतादात्म्यामुळे आपल्या जाणिवेला देहदु:खाच्या भयाचाही स्पर्श आहे. त्यावर मात करीत अंतर्मुख होण्यासाठी माताजी सांगतात की, ‘‘जरा मागे सरकून अलिप्त व्हा, म्हणजे तुम्हाला भय नाही. बाह्य़ जगामध्ये वावरणाऱ्या सामान्य शक्तींच्या आहारी जाऊ नका.’’ आता हे जरा मागे सरकून अलिप्त होणं म्हणजे काय? बाह्य़ जगात कोणत्या सामान्य शक्ती वावरतात आणि त्यांच्या आहारी जाणं म्हणजे काय? थोडा विचार करू..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2020 12:02 am

Web Title: article on to the introvert abn 97
Next Stories
1 तत्त्वबोध : कृपाहस्त
2 पुन्हा तटावर तेच पाय..
3 माणूस आणि माणुसकी
Just Now!
X