जेव्हा तिन्ही अवस्थांमध्ये भगवद्भजन साधू लागतं तेव्हा मन समाधानानं भरून जातं. मग कवि सांगतो की, ‘‘मना होतां समाधान। समाधानें अधिक भजन। पूर्ण बाणलें अनुसंधान। ध्येय-ध्याता-ध्यान समरसें भजे।। ३५६।।’’ म्हणजे मनाला समाधान प्राप्त झालं म्हणजे त्यायोगे भजनही अधिकच वाढतं. अनुसंधान पूर्ण बाणल्यानं ध्येय, ध्याता, ध्यानही एकरूप होऊन भजन घडू लागतं. आता खरं पाहता ही ओवी ३५५व्या ओवीच्या आधीची पायरी वाटते. पण या दोन्ही ओव्या एकमेकींत गुंफलेल्या आहेत. आपला अनुभव ताडून पाहता हे लक्षात येईल. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्थांमध्ये आपली भावनिक एकसमानता असतेच असं नाही. म्हणजे जागृतीत उपासना घडत असली, तरी तिचा मनातला भावनिक पाया पक्का नसतो. त्यामुळे जागृती मावळली की मनातल्या भौतिक ओढी उफाळून येतात आणि मग स्वप्नावस्थेत मन अशांत, अस्थिर होऊ शकतं. गाढ निद्रेवरही या अस्वस्थतेचा परिणाम होतो. तेव्हा जोवर तिन्ही अवस्थांमध्ये भगवद्भावाची एकतानता येत नाही तोवर खऱ्या अर्थानं पूर्ण समाधान अनुभवता येत नाही. या समाधानाची किल्ली एका सद्गुरूवाचून अन्यत्र कुणाकडेच नाही! हे समाधान नुसत्या उपासनेचा जोर लावल्यानं लाभत नाही, शेकडो माळा जप करून, पारायणं करून किंवा उपास-तापास करून लाभत नाही. तर बाह्य़ कृती आणि तिचा आंतरिक हेतू यात शुद्ध भाव असेल, आंतरिक शुद्ध हेतूशी बाह्य़ कृती विसंगत नसेल, मनाची धारणा ध्येयसंगत म्हणजेच स्थिर असेल तर आणि तरच समाधान लाभू शकतं. यासाठी सद्गुरूबोधानुसार जगण्याचा अभ्यास केल्यावाचून गत्यंतर नाही. मग जेव्हा असं जगणं साधू लागेल तेव्हाच जगण्यातली सर्व विसंगती ओसरेल आणि जगातल्या परीघात जखडलेल्या आपल्या क्षुद्र भावनिक ओढी नष्ट होतील. आपलं मन अतिशय फसवं आहे, हे कधीच विसरू नका. आपण अध्यात्माच्या मार्गावर लागल्यानं जगातली आपली आसक्ती संपली आहे, असा भ्रमही बाळगू नका. कारण या मार्गावर आल्यानं आपलं जग बदलतं, पण जगातली आसक्ती बदलत नाही! त्यामुळे साधनपंथावर आपण सद्गुरूंव्यतिरिक्त नाती जोडू पाहतो, आधार मिळवू पाहतो. हे सारं आपल्या साधनेला पोषक आहे, असा युक्तिवादही मन करीत असतं. पण त्यातूनच क्षुद्र भावनिक ओढी पुन्हा निर्माण होतात आणि त्या पुन्हा पुन्हा जन्म-मृत्यूच्या चक्रात परतण्याचीच सोय करीत असतात. तेव्हा जो आत्माभ्यास हवा तो अगदी शुद्ध पायावर उभा हवा. आता सद्गुरू बोधानुसार जगण्याचा अभ्यास काही सोपा नाही. सुरुवातीला मन नाना विकल्प निर्माण करतं. पण तरीही निर्धारानं, निश्चयानं आणि नेटानं हा अभ्यास सुरू ठेवला तर सद्गुरू जे सांगत आहेत त्यातलं तथ्य अनुभवानं उमगू लागतं. निसर्गदत्त महाराजही म्हणत ना? की, पहिलं पाऊल फक्त तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवून टाकायचं आहे, त्यापुढचं पाऊल तुम्ही अनुभवानं आलेल्या विश्वासातून टाकणार आहात! तसं आहे हे. म्हणजे आपण चुकीच्या दिशेनं आजवर समाधानासाठी तंगडतोड करीत होतो, पण समाधान नेमकं कोणत्या दिशेनं गेल्यानं लाभतं, हे सद्गुरू सांगतात. त्या दिशेनं पहिलं पाऊल टाकण्याचा निर्धार तेवढा आपल्याला दाखवावा लागतो. मग पहिल्या पावलातही जे समाधान लाभतं त्यातून विश्वास दुणावतो आणि पुढचं पाऊल टाकलं जातं!

– चैतन्य प्रेम