03 June 2020

News Flash

सुख-दु:ख किनारे

स्वामी स्वरूपानंद म्हणत की, ‘‘फूल उमललं की त्याचा सुगंध लपत नाही!’’ त्याप्रमाणेच निसर्गदत्त महाराजांच्या बोधाचा सुगंध लपला नाही.

चैतन्य प्रेम

श्रीनिसर्गदत्त महाराज म्हणून एक साक्षात्कारी सत्पुरुष मुंबईच्या गिरगावातल्या एका लहानशा घरात राहायचे. स्वामी स्वरूपानंद म्हणत की, ‘‘फूल उमललं की त्याचा सुगंध लपत नाही!’’ त्याप्रमाणेच निसर्गदत्त महाराजांच्या बोधाचा सुगंध लपला नाही. खऱ्या आत्मज्ञानाची ओढ असलेले अनेक जिज्ञासू आणि मुमुक्षू देश-विदेशातून त्यांच्याकडे येऊ लागले. महाराजांचा नावलौकिक कमालीचा वाढला, तरी त्यांची साधी राहणी बदलली नाही. गिरगावातल्या त्या खोलीचं दर्शन मला एकदा घडलं बरं का! तर याच खोलीच्या अवकाशात ज्ञानचर्चा भरून राहिली आहे, या जाणिवेनं मन तेव्हाही मोहरलं होतं. ही सगळी ज्ञानचर्चा जगातील सर्वच प्रमुख भाषांमध्ये आता भाषांतरित झाली आहे. महाराजांकडे अनेक देशांतून लोक येत. त्यामुळे त्यांचे रंग-रूप, राहणीमान, धारणा, सांस्कृतिक वारसा अगदी भिन्न असे. पण काही प्रश्नांची जातकुळी अगदी समान असे. सुख, दु:ख, भीती याबाबतचे प्रश्न जणू सर्वाच्या मनात तेव्हाही असत आणि आजही आहेतच. माणसाला सुखाची आस आणि दु:खाची भीती अगदी अनादी काळापासून आहे. पण नुसती सुखाची इच्छा आहे म्हणून सुखच सुख वाटय़ाला येत नाही आणि दु:खाची तीव्र नावड आहे, एवढय़ावरून दु:ख टळता टळत नाही! जे हवं असतं ते मिळत नाही आणि नको असतं ते टळत नाही. यामुळे मन सतत अस्वस्थ असतं. एका साधकानं मनाच्या या दशेवर उपाय विचारला. त्यावर निसर्गदत्त महाराज म्हणाले, ‘‘सुखावह असेल ते शोधण्यात आणि दु:खकारक असेल ते टाळण्यात मनाची काय चूक आहे? सुख-दु:खाच्या किनाऱ्यांमधून जीवनरूपी नदी वाहत आहे. पण मन जेव्हा प्रवाहाबरोबर न वाहता किनाऱ्यावर अडकून पडतं, तेव्हा मनाची समस्या निर्माण होते. जीवनप्रवाहाबरोबर वाहणे म्हणजे स्वीकार करणे. जे येणार असेल ते येवो आणि जे जाणार असेल ते जावो; इच्छा धरू नका, भयभीत होऊ नका. जेव्हा जसे काही प्रत्यक्ष घडेल तेव्हा त्याचे निरीक्षण करा.’’ महाराजांनी इथं एक सत्य सहजपणे सांगितलं आहे की, सुख शोधण्याची आणि दु:ख टाळण्याची इच्छा माणसाच्या मनात स्वाभाविकपणे असते. म्हणजे इथे सुख भोगण्याची किंवा दु:ख टाळण्याची इच्छा ते चुकीची मानत नाहीत. पण कोणत्याही एकाच गोष्टीची प्राप्ती माणसाला होत नाही, असंही ते बजावतात! जीवनरूपी नदीचे सुख आणि दु:ख हे दोन किनारे आहेत. केवळ सुखाच्याच किनाऱ्यापाशी मन अडकून पडलं, तर वाहत राहणं थांबेल. अपेक्षांचं डबकं साचू लागेल. त्यात अहंकाराची दुर्गंधी सुटेल. तसंच जो आज सुखाचा वाटत आहे त्या किनाऱ्यावरच अडकून पडलो, तर कालांतरानं जे आज सुखाचं वाटत आहे तेच अपुरं भासू लागेल, दु:खाचं भासू लागेल. तेव्हा जीवन म्हणजे देहबुद्धी मावळून आत्मबुद्धी उमलू देण्याची सहज प्रक्रिया. संकुचितपणा ओसरून व्यापक होण्याचा प्रवास. त्यासाठी सुख आणि दु:ख जे जे येईल ते ते देहानं नव्हे, तर मनानं ओलांडत पुढे जाण्याचा अभ्यास केला पाहिजे. सुखासाठी तळमळत न बसता आणि दु:खाच्या भीतीनं पोळत न बसता, जे प्रत्यक्ष घडेल त्याचं निरीक्षण करण्याचा सल्ला महाराज देत आहेत. हा सल्ला मोठा मार्मिक आहे खरा! कारण हे निरीक्षण म्हणजे वरवरचं पाहणं नव्हे! ते अवधानपूर्वक पाहणं आहे. कारण अनवधानानंच बरीचशी दु:खं आपण स्वत:हून ओढवून घेतो, हेच आपल्याला उमगत नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2020 12:06 am

Web Title: loksatta tatvabodh article abn 97 10
Next Stories
1 लाट आणि समुद्र
2 तत्त्वबोध : जगण्याचं भय!
3 शाश्वत अभ्यास
Just Now!
X