चैतन्य प्रेम

सर्व समाजाचं ध्येय काय असावं, असा प्रश्न गणपतीमुनी रमण महर्षीना विचारत आहेत. त्यावर महर्षी म्हणतात, ‘‘समुदायेन सर्वस्य संघस्य तनुधारिणाम्। सौभ्रात्रं समभावेन गन्तव्यं परमुच्यते।।’’ म्हणजे- तनुधारी, देहधारी व्यक्तींनी बनलेल्या या समाजाने ‘सौभ्रात्रभाव’ म्हणजे बंधुभाव आणि समभाव अर्थात समत्वानं जगावं, हेच परमोच्च ध्येय आहे. मग महर्षी सांगतात की, अशा बंधुभावानं समाजातील प्रत्येक घटक राहिल्यास समाजात शांतता नांदू लागेल (‘सौभ्रात्रेण परा शान्ति: अन्योन्यं देहधारिणाम्।’). मग ही भूमी म्हणजे एकाच घराप्रमाणे शोभून दिसेल (‘तदेयं शोभते सर्वा भूमिरेकं गृहं यथा।।’)! ‘समता’ आणि ‘बंधुभाव’ हे शब्द वापरून वापरून किती गुळगुळीत झाले आहेत! पण कृतीत काही ते अद्याप आलेले नाहीत. गणपतीमुनी आणि रमण महर्षी यांच्यात झालेला हा संवाद १५ ऑगस्ट १९१७ रोजीचा आहे. म्हणजे शतकभरापूर्वीचा आहे. तरी समाज म्हणून तो भ्रातृभाव आणि समभाव आपल्यात आलाय का? तर नाही! तो न येण्याचं कारण शोधण्यासाठी पुन्हा आपल्याला या समाजाचा लघुत्तम साधारण घटक असलेल्या ‘व्यक्ती’कडे म्हणजे स्वत:कडेच वळावं लागेल. आपल्या अंतरंगात समत्व आहे का? स्थैर्य आहे का? शांती आहे का? तर नाही! मग या समाजाशी म्हणजे माझ्या परिघातील व्यक्तींशी माझा जो जीवनव्यवहार सुरू आहे, तो माझ्या बाजूनं अशांतीचा, अस्थिरतेचा, विषमतेचा, अतृप्तीचाच होणार. मग मी जसं वागीन तसा प्रतिसादही मला स्वीकारावा लागेल! तेव्हा समाजात अशांती असेल, अस्थैर्य असेल, विषमता असेल, अतृप्ती असेल, तर त्याला आर्थिक, सामाजिक परिस्थिती आणि धोरणकर्त्यांच्या चुका जितक्या कारणीभूत असतात तितकीच व्यक्तीही असते! आपल्या अंतरंगात स्थैर्य, समत्व आणि शांती निर्माण करणारा जो आत्माभ्यास आहे तो आपणच सोडला का? जर तसं झालं असेल, तर आजचं अनिश्चिततेचं सावट हे अंतर्मुख होण्यासाठीचं निमित्त ठरणार आहे. ओशो रजनीश यांनी मांडलेली एक कल्पना फार छान आहे. ते म्हणाले, प्रत्येक घरात मौनाचा एक तास असला पाहिजे! त्याचं वळण आपोआप घरातल्या लहान मुलांना लागेल. मौन म्हणजे काय? पहिल्या पातळीवर वैखरीला म्हणजे बोलण्याला लगाम! तेव्हा तोंडानं बोललं जात नाही, पण मन जोरात बोलत असतं! हरकत नाही. हळूहळू त्या मौनाच्या तासातल्या शांतीचे संस्कार मनावर होऊ लागतील. एकाग्रता वाढीस लागेल. मनाला शांतीची आस आहे, पण शांततेची नाही! समजा वीज गेली. टीव्ही बंद पडला, संगणक बंद पडला, मोबाइल चार्ज नाही म्हणून तोही बंद पडला.. तर आपण वीज येईपर्यंत बेचैन होतो. इतके आपण आपणच बनवलेल्या उपकरणांच्या अधीन आहोत. कारण मनावर शांतीचा ठसाच नाही आणि त्यामुळे आपण लगेच अशांत होतो. आजच्या विषाणू-संकटाच्या काळात मनाची ही अशांत स्थिती, बेचैनी आपण अनुभवतो आहोत. पण त्या अशांतीच्या मुळाशी जाण्याची आपली इच्छा आहे काय? तर नाही! आपण प्रतीक्षेत आहोत की, पुन्हा एकदा स्थिती पूर्ववत होईल. आपण मन मानेल तसं आणि तिथं येऊ-जाऊ शकू. पुन्हा ती गर्दी.. तो गोंगाट.. तो कोलाहल.. तो दुनियेचा बहुरंगी-बहुढंगी पसारा यांत रमून जाऊ. अंत:करणात खऱ्या शांतीसाठी उमटणारा क्षीण स्वर त्या कोलाहलात सहज दडपला जाईल!