22 January 2021

News Flash

विनय सर (पेशवे)

विनय सर त्यानंतर काही दिवसांतच गुरूपासून मित्र झाले होते. पण मी आजही त्यांना ‘सर’च म्हणतो

विनय सर त्यानंतर काही दिवसांतच गुरूपासून मित्र झाले होते.

साल १९९८. मी डिग्री कॉलेजच्या दुसऱ्या वर्षांला होतो. कॉलेज संपलं की आपण राष्ट्रीय नाटय़ विद्यालयाच्या कोर्ससाठी अप्लाय करायचं, हे ठरलं होतं. आमच्या ‘संवेदना परिवार’ या संस्थेच्या अ‍ॅक्टिव्हिटीज् तेव्हा फारच जोरात होत्या. रोज संध्याकाळी शिवाजी पार्कला भेटणे, नाटकाचं वाचन, तालमी.. मग रात्री दादर स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक एकच्या बंद तिकीट खिडकीपाशी रात्रीची सभा. तिथे बबनचा चॉकलेट चहा, अंडा पोहे किंवा तत्कालीन आर्थिक स्थितीत जे शक्य असेल ते पोटात ढकलणे.. आणि रात्री एक चाळीसची शेवटची बोरीवली लोकल पकडून घरी.. असा जवळजवळ रोजचा दिनक्रम होता. ‘संवेदना’च्या या सगळ्या उचापतींमध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट होती. आमच्याच ग्रुपमधल्या पंकज पुरंदरेचं दादर कबुतरखान्याजवळ ‘श्रमसाफल्य’ नावाच्या इमारतीत घर होतं. दोन खोल्यांचं छोटेखानी घर. पण त्या घराला एक छोटी गच्चीही होती. या गच्चीला जवळजवळ तीर्थक्षेत्राचं महत्त्व आहे असं मला वाटतं. तीर्थक्षेत्रांमध्ये पंढरपूर थोर. केवळ तिथे विठूराया आहे म्हणून नाही, तर त्याच्या ओढीनं ज्ञानोबा-तुकोबांपासून अनेकांचे पाय त्या पंढरीला लागले, म्हणून. पंकजच्या घराच्या गच्चीचंही तसंच होतं. ‘संवेदना’चा म्होरक्या अमरजीत आमले नाटय़-सिनेसृष्टीतल्या अनेक थोरामोठय़ांना आमच्या भेटीला आणत असे. आणि या सगळ्या भेटी पंकजच्या घराच्या गच्चीत होत. इथे विनय आपटे, डॉ. गिरीश ओक, चंद्रकांत कुलकर्णी, प्रशांत दळवी, निर्मल पांडे, सौरभ शुक्ला, डॉ. हेमू अधिकारी, कमलाकर नाडकर्णी यांसारखे अनेक मोठे नट, दिग्दर्शक, लेखक, समीक्षक तिथे येऊन गेलेत.

अशाच एकदा सुलभा देशपांडे आल्या होत्या. आमच्याशी खूप बोलल्या. जाता जाता म्हणाल्या, ‘‘आविष्कारमध्ये सध्या एक वर्कशॉप सुरू आहे. एन. एस. डी.हून एक नवीन मुलगा आलाय विनय पेशवे नावाचा.. तो घेतोय. एक वर्षांचं वर्कशॉप आहे.. अ‍ॅिक्टगचं.’’ माझे आणि माझ्यासारख्या काहींचे कान टवकारले. जाता जाता अमरनं सुलभाताईंकडे आमच्यासाठी शब्द टाकला. सुलभाताई म्हणाल्या, ‘‘कार्यशाळा सुरू होऊन महिना झालाय. विनय मधूनच कुणाला घेईल की नाही, माहीत नाही. तुम्ही त्याच्याशीच बोला.’’

आम्ही माहीमच्या शाळेत त्यांना भेटायला गेलो तेव्हा माझ्या डोळ्यांसमोर ‘विनय पेशवे’ या नावानं एक विशिष्ट चित्र रंगवलं होतं. उंच, जाड मिशी, बेसचा आवाज, तोंडात सिगेट्र, वगैरे. आम्ही माहीमच्या शाळेच्या आवारात उभे असताना माझ्याच उंचीचा एक माणूस आमच्या जवळ आला आणि अत्यंत मृदू आवाजात त्यानं विचारलं, ‘‘वर्कशॉपसाठी आलाय?’’ मी मान हलवली आणि आता हे पेशवे सर कुठल्या दरवाजातून येतायत ते शोधू लागलो. त्या मृदू माणसानं हात पुढे केला.. ‘‘हाय.. मी विनय.’’ दिवाळीच्या दिवसांत आपल्याच पायाखाली आपटबार फुटल्यावर जे होतं, ते माझं झालं. मी झटकन् त्या माणसाकडे पाहिलं. हात पुढे केला. ‘‘या..’’ त्यानं हसून जवळजवळ स्वागतच केलं.

‘तुमच्या आयुष्यातला टर्निग पॉइंट कुठला?’ असं जेव्हा सुहास्यवदन मुलाखतकार तुमची मुलाखत घेताना विचारतात तेव्हा उत्तरात काहीतरी नाटय़ असावं अशी त्यांची अपेक्षा असते. उदाहणार्थ, ‘मी जुहूच्या रस्त्यावर पतंग पकडत धावत होतो. अचानक एक गाडी समोर आली आणि मी गाडीवर आपटता आपटता राहिलो. आणि दुसऱ्याच क्षणी त्या गाडीतून सुभाष घई उतरून म्हणाले, ‘माझ्या पुढच्या सिनेमाचा नायक तूच.’ किंवा ‘मी एकदा टमरेल घेऊन चाळीच्या मोरीवरून जात असताना पाय घसरून पडलो. हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट झालो. माझ्या बाजूच्या बेडवरच चित्रपट निर्माते..!’ तुम्हाला कळलंच असेल- मला काय म्हणायचंय! पण नेहमीच आयुष्याची गाडी वेगळ्या धक्क्याला लावणारा ‘टर्निग पॉइंट’च असतो असं नाही; तो सहा महिने, वर्षभराचा मोठा टप्पाही असू शकतो. ज्यातून पार पडल्यावर तुम्ही बदलता, तुमची दृष्टी बदलते. विनय पेशवेंच्या त्या एक वर्षांच्या वर्कशॉपचं माझ्या आयुष्यात तेच स्थान आहे. दर शुक्रवार, शनिवार, रविवार सायंकाळी सहा ते नऊ अशी या कार्यशाळेची वेळ होती. सुरुवातीला आम्ही बारा-तेरा जण होतो. वर्ष संपलं तेव्हा सात जण. आज चार आठवडय़ांत तुम्हाला ‘अभिनय प्रशिक्षण’ देऊन स्वप्नपूर्तीची भंपक आश्वासनं देणाऱ्या बाजारू कार्यशाळांचा सुळसुळाट झालाय. पण जवळजवळ वीस वर्षांपूर्वी विनय पेशवे यांनी आपल्या आयुष्यातलं अख्खं एक वर्ष या कार्यशाळेला दिलं होतं. आणि त्याचा आर्थिक मोबदला अतिशय तुटपुंजा होता.

विनय सर त्यानंतर काही दिवसांतच गुरूपासून मित्र झाले होते. पण मी आजही त्यांना ‘सर’च म्हणतो. माझ्या-त्यांच्या वयातही फार मोठा फरक आहे असं नाही. पण एखाद्याच्या ज्ञानानं आणि त्याच्या शिकवण्याच्या निगुतीनंच ते तुमच्या मनात आदराचं स्थान निर्माण करतात. विनय सर मूळ पुण्याचे. त्यांनी मला एकदा सांगितलं होतं, की शाळेत असताना ते ‘स्काऊट’मध्ये होते. तिथे त्यांच्या गुरुजींकडून त्यांना नीटनेटकेपणा आणि शिस्तीची दीक्षा मिळाली होती. हा नीटनेटकेपणा, ही शिस्त त्यांच्या प्रत्येक गोष्टीत दिसत असे. गोरेगावची ‘वनराई’ कॉलनी ही त्यावेळी मुंबईबाहेरून आलेल्या स्ट्रगलर्सचं आगार होती. त्यातल्या खोल्या-खोल्यांत माझे मित्र तेव्हा राहत असत. त्यांच्या घरी गेलं की चहाचे कप, सिगेट्रची पाकिटं आणि काल-परवाची अंतर्वस्त्रं यांची एक सामूहिक रांगोळी तुमचं स्वागत करत असे. पण विनय सरांचं ते इवलंसं एका खोलीचं घर आजही डोळ्यासमोर उभं राहतं. घरात पलंग नव्हता की कपाट; पण तरीही घरातलं सगळं सामान, पुस्तकं, कपडे, मांडणीवरची भांडी.. सगळ्या वस्तू ‘जगात प्रत्येक वस्तूची एक जागा आहे आणि त्या जागेवरच ती वस्तू हवी’ या तत्त्वानंच वागत असत. कुठल्याही प्रहरी गेलात तरी काय बिशाद गादीवरच्या चादरीला एक चुणीही असेल! हाच नेमकेपणा सरांच्या कामातही होता. एक वर्ष त्यांनी कार्यशाळा घेतली. वर्गाच्या आधी ते रीतसर तयारी करत असावेत हे जाणवायचं. वर्षांच्या शेवटी त्यांनी आमची एक एकांकिका आणि काही मोनोलॉग्ज् बसवले. एका दिग्दर्शकानं एका अभिनेत्याकडून काम कसं करून घ्यायचं, याचा हा वस्तुपाठच होता.

विनय सरांचं वर्कशॉप संपत असतानाच मी एन. एस. डी.चा इंटरव्ह्य़ू दिला. एखाद्या कोचनं बॉक्सरला ट्रेन करावा तसं सरांनी मला ट्रेन करायला घेतलं.

‘‘तुला हवं तेव्हा घरी येत जा.’’ आम्ही एकदा माहीम स्टेशनवर ट्रेनची वाट पाहत उभे असताना सरांनी मला सांगितलं.

‘‘सर, पण त्याचे पैसे..’’ मी चाचरत विचारलं.

सरांना रागावता येत नसे. इतक्या वर्षांच्या आमच्या ओळखीत मी त्यांना कधीच रागावलेलं नाही पाहिलं. मनाविरुद्ध एखादी गोष्ट झाली किंवा चीड आणणारं खरंच काहीतरी घडलं, की त्यांच्या चेहऱ्यावर संतापापेक्षा दुखावले गेल्याचे भावच अधिक उमटत. तेच भाव आताही त्यांच्या चेहऱ्यावर उमटले.

‘‘तू ये. आणि असे प्रश्न पुन्हा विचारत जाऊ नकोस.’’ हे वाक्य मी सरांना त्यावेळीच बोलताना ऐकलं. एरवी ते प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला तत्पर असत.

माझी एन. एस. डी.त निवड झाली. मी तीन वर्षांसाठी दिल्लीला गेलो. तीन वर्षांनी परत आलो तेव्हा सर पुण्यात होते. मी पुण्यात त्यांना भेटायला गेलो. आमची भेट एका जिममध्ये झाली. ‘‘मी आणि माझ्या मित्रानं मिळून सुरू केलीय..’’ सरांनी मला सांगितलं.

मला किंचित आश्चर्य वाटलं. एन. एस. डी.हून अभिनयाचं प्रशिक्षण घेऊन आलेला अभिनेता, उत्तम दिग्दर्शक असलेला हा माणूस पुण्यात जिम का काढतो?

‘‘करून पाहिल्या मी काही सीरियल्स. पण मला ते नाही जमू शकत. मुळात माझं माझ्या कामावर खूप प्रेम आहे. त्यामुळे निव्वळ दिवस भरण्यासाठी काम करणं मला मान्य नाही. अ‍ॅण्ड देअर हॅज टू बी अ म्युच्युअल रिस्पेक्ट. अभिनेता नवीन असो, जुना असो; तो अभिनेता आहे. त्याच्यात काहीतरी हुन्नर आहे म्हणून तुम्ही त्याला घेतलंय. डोन्ट ट्रीट हिम लाइक अ कमॉडिटी.’’ सरांच्या बोलण्यात त्यांचा नेहमीचा सात्त्विक कळवळा होता.

सर काही दिवसांतच पुन्हा मुंबईला आले. आता त्यांनी ‘वनराई’मध्येच स्वत:चं घर घेतलं होतं. माझ्या कामाच्या व्यापांमध्ये आमच्या भेटी कमी झाल्या. मला नेहमी वाटायचं, या माणसाचं कॅलिबर खूप मोठं आहे, पण.. ‘पेशवेंना स्वत:ला विकता येत नाही..’ माझा एक मित्र एकदा त्यांच्याबद्दल बोलला होता. त्यावेळी मला सरांचं वाक्य आठवलं- ‘डोन्ट ट्रीट हिम लाइक अ कमॉडिटी.’

विनय सर त्यानंतर गोरेगावच्या ‘गोकुळधाम’ शाळेत शिकवत असत. ते उत्तम शिक्षक आहेत. आणि ते जर शाळेतल्या लहान मुलांना अभिनयाचं बाळकडू पाजत असतील तर ती मुलं खरंच भाग्यवान आहेत. एन. एस. डी.सारख्या संस्थेतून आल्यावर तुम्ही किती चित्रपट मिळवलेत आणि किती मोठे स्टार झालात, याच मापात तुमचं ‘यश’ मोजलं जातं. पण माझ्या लेखी विनय पेशवे कमालीचे यशस्वी आहेत. कारण त्यांच्यासारखा ज्ञानाचे दरवाजे हळुवार उलगडून दाखवणारा उत्तम शिक्षक मी तरी पाहिला नाही.

चिन्मय मांडलेकर aquarian2279@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2017 3:40 am

Web Title: chinmay mandlekar article on vinay apte part 2
टॅग Vinay Apte
Next Stories
1 विनय सर
2 विशाल विजय माथुर (भाग ३)
3 विशाल विजय माथुर (भाग २)
Just Now!
X