09 March 2021

News Flash

नाशिक, दिंडोरीत १३ जणांचे अर्ज अवैध

छाननी प्रक्रियेत नाशिक लोकसभा मतदार संघात सात, तर दिंडोरीमध्ये सहा अशा एकूण १३ उमेदवारांचे अर्ज बाद झाले

नाशिक येथे अर्ज छाननीची प्रक्रिया सुरू असतांना     (छाया- यतीश भानू)

छाननीनंतर नाशिकमध्ये २३, तर दिंडोरीत नऊ उमेदवार; माघारीसाठी मनधरणी सुरूच

छाननी प्रक्रियेत नाशिक लोकसभा मतदार संघात सात, तर दिंडोरीमध्ये सहा अशा एकूण १३ उमेदवारांचे अर्ज बाद झाले. यामुळे नाशिकमध्ये आता २३ आणि दिंडोरीत नऊ उमेदवार रिंगणात आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी शुक्रवापर्यंत मुदत आहे. बंडखोर, अडचणीच्या ठरू शकणाऱ्या अपक्षांच्या मनधरणीसाठी राजकीय पातळीवर जोरकसपणे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यात साम, दाम, दंड, भेद अशी रणनीती अवलंबली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

नाशिक, दिंडोरी लोकसभा मतदारसंघात उमेदवारी पत्र दाखल करण्याची मुदत संपुष्टात आल्यानंतर बुधवारी अर्जाची पडताळणी प्रक्रिया पार पडली. नाशिकचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सूरज मांढरे, दिंडोरीचे निवडणूक निर्णय अधिकारी नीलेश सागर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर आदी उपस्थित होते. नाशिक लोकसभेसाठी ३०, तर दिंडोरीसाठी १५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. अर्जांची पडताळणी करण्यात आली. वेगवेगळ्या त्रुटींवरून काही अर्ज अवैध ठरले. त्यात नाशिकमध्ये शिवाजी वाघ, भिमराज पांडवे, मंगेश ढगे, शत्रुघ्न झोंबाड, शेफाली भुजबळ, विष्णू जाधव आणि रंगा सोनवणे यांच्या अर्जाचा समावेश आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीचे समीर भुजबळ, सेना-भाजप महायुतीचे हेमंत गोडसे, वंचित बहुजन आघाडीचे पवन पवार या प्रमुख राजकीय पक्षांसह २३ जणांचे अर्ज वैध ठरले.

दिंडोरीत बाळासाहेब बर्डे, शिवाजी मोरे (राष्ट्रीय किसान काँग्रेस पार्टी), प्रवीण पवार (भाजप), हेमंत वाघेरे (माकप), वैभव महाले (राष्ट्रवादी), गाजी एतेजाद अहमद खान या सहा जणांचे अर्ज अवैध ठरले.  डॉ. भारती पवार (सेना-भाजप महायुती), धनराज महाले (काँग्रेस-राष्टवादी महाआघाडी), जिवा पांडू गावित (माकप), बापू बर्डे (वंचित बहुजन आघाडी), अशोक जाधव (बसपा), दत्तू बर्डे, अ‍ॅड. टिकाराम बागूल, हेमराज वाघ, दादासाहेब पवार (राष्ट्रीय मराठा पक्ष) या नऊ जणांचे अर्ज वैध ठरले.

छाननीअंती रिंगणातील उमेदवारांची आकडेवारी समोर आली असली तरी प्रत्येक मतदारसंघातील अंतिम चित्र माघारीनंतर स्पष्ट होईल. अडचणीच्या ठरू शकणाऱ्या अपक्षांची मनधरणी करण्याचे प्रयत्न राजकीय पातळीवर सुरू आहेत. भाजपचे अपक्ष बंडखोर माणिक कोकाटे यांनी भाजपवर टिकास्त्र सोडत कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. माघारीच्या मुदतीपर्यंत काय घडामोडी घडतात, याकडे सर्वाचे लक्ष आहे.

चिल्लर, धनादेशवालेही बाद

छाननी प्रक्रियेत वेगवेगळ्या कारणास्तव उमेदवारी अर्ज अवैध ठरले. त्यामध्ये १० हजार रुपयांची चिल्लर घेऊन आलेल्या शंकर वाघचाही समावेश आहे. नाशिक लोकसभेसाठी अर्ज भरण्यासाठी वाघ हे अनामत म्हणून १५ हजार रोकड आणि १० हजार रुपये चिल्लर स्वरुपात घेऊन आले होते. चिल्लरची मोजदाद करता करता उशीर झाला. अर्जासोबत अनामत रक्कम न भरल्याने त्यांचा अर्ज बाद ठरला. मंगेश ढगे यांनी अनामत रकमेचा धनादेश दिला होता. अनामत रोख स्वरुपात जमा करणे बंधनकारक आहे. यामुळे त्यांचाही अर्ज बाद झाला. मदतनीसाला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनात प्रवेश न दिल्यामुळे आत्महत्येची धमकी देणाऱ्या शत्रुघ्न झोंबाड यांचा अर्ज अनामत रक्कम न भरल्याने बाद झाला. भिमराव पाडवे यांच्या अर्जात त्रुटी होत्या, तर विष्णू जाधव यांनी स्वाक्षरी केलेली नव्हती. काही एबी अर्ज न दिल्याने बाद झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 11, 2019 1:23 am

Web Title: 13 people have invalid application in nashik dindori
Next Stories
1 अशोक चव्हाण यांचा ‘प्रदेश’ नांदेडपुरताच!
2 संपत्तीसह दाखल गुन्ह्य़ांबाबतही स्पर्धा
3 काँग्रेसकडून तुघलक रोड घोटाळा : पंतप्रधान मोदी
Just Now!
X