हर्षवर्धन पाटील यांची नाराजी दूर करण्यातही दोन्ही काँग्रेसना यश 

मुंबई : मुलाच्या प्रचारासाठी अजित पवार मावळ मतदारसंघात अडकून पडल्याची टीका होत असताना त्यांनी बारामती मतदारसंघात सभा घेण्यास सुरुवात केली आहे. तर काँग्रेसनेते हर्षवर्धन पाटील यांची नाराजी दूर करण्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना यश आले आहे.

बारामती मतदारसंघातील सुप्रिया सुळे यांची निवडणूक राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेची आहे. यंदा बारामती जिंकणारच, असा निर्धार भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. भाजपच्या आक्रमक भूमिकेमुळे राष्ट्रवादीचे नेते सावध झाले आहेत. गेल्या वेळी सुप्रिया सुळे यांचे मताधिक्य कमालीचे घटले होते. यंदा कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून राष्ट्रवादीने खबरदारी घेतली आहे. कोणत्याही परिस्थितीत चांगल्या मताधिक्याने बारामती जिंकायची, असा सुप्रिया सुळे यांचा प्रयत्न आहे.

पुत्र पार्थमुळे अजित पवार मावळ मतदारसंघातच अडकून पडल्याची टीका सुरू झाली होती. समाज माध्यमांवर ‘अजितदादा अन्यत्र कुठे फिरकत नाहीत’, असा संदेश फिरू लागला होता. भाजपनेते विनोद तावडे यांनीही यावरून चिमटा काढला होता. अजितदादा आज इंदापूर-भिगवण भागातील प्रचार सभेत सहभागी झाले होते. पुढील दोन दिवसांत अजितदादा आणखी सभा घेणार आहेत. याशिवाय काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटीलही सहभागी झाले होते. इंदापूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीने आपल्याला पाठिंबा द्यावा, अशी हर्षवर्धन पाटील यांची भूमिका आहे. गेल्या वेळी या मतदारसंघातून राष्ट्रवादीचे दत्ता भारणे विजयी झाले होते. यामुळे इंदापूरवर राष्ट्रवादीचा दावा आहे. हर्षवर्धन पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. या पाश्र्वभूमीवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मध्यंतरी अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांची संयुक्त बैठक पुण्यात घेतली. इंदापूरच्या जागेचा प्रश्न राहुल गांधी आणि शरद पवार यांच्या पातळीवर सोडवावा हा पृथ्वीराज चव्हाण यांचा प्रस्ताव अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील या दोघांनीही मान्य केला. या तोडग्यानंतर हर्षवर्धन पाटील बारामतीमधील प्रचारात सहभागी झाले आहेत.

‘भाजपची सोंगे’

भाजप उमेदवार कांचन कूल यांचे पती आणि आमदार राहुल कूल यांच्या साखर कारखान्यात कामगारांना गेले २२ महिने वेतन मिळालेले नाही याकडे अजित पवार यांनी लक्ष वेधले. एक कारखाना चालवू शकत नाहीत ते काय दिवे लावणार, असा सवालही त्यांनी केला. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या समोर झालेला गोंधळ आणि त्यांना भाजप कार्यकर्त्यांकडून झालेली धक्काबुक्की, नगरच्या सभेत खासदार दिलीप गांधी यांना बोलण्यापासून रोखण्याचा झालेला प्रयत्न, सोलापूरचे उमेदवार सिद्धेश्वर महाराजांची वक्तव्ये यावरून भाजपची सोंगे सुरू असल्याची टीकाही अजित पवार यांनी केली.