भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी गांधीनगर मतदरासंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थिती लावली. एकेकाळी अमित शाह यांना अफजल खान यांची उपमा देणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांच्यासोबत हजेरी लावल्याने विरोधक त्यांच्यावर टीका करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावत असले फितूर वाघ असूच शकत नाहीत असं म्हटलं आहे.

अजित पवार यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, ‘५ वर्ष एकमेकांना ‘पटकणारे’, कोथळा बाहेर काढण्याची भाषा करणारे, आज अफझलखानाच्या सेनेच्या सेनापतीचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी थेट गांधीनगर गाठतात! असले फितूर वाघ असूच शकत नाहीत. शिवसैनिक तर मुळीच नाही’. शिवरायांच्या नावानं मतं मागणं म्हणजे महाराजांच्या गौरवशाली इतिहासाचा अपमान आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.

अर्ज भरण्याआधी अमित शाह यांनी शक्तीप्रदर्शन केलं. विजय संकल्प सभेच्या माध्यमातून अमित शाह लोकांशी संवाद साधला. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अमित शाह यांनी सभेला सुरुवात केली. या सभेला एनडीए घटकपक्षांचे सर्व नेते उपस्थित होते. त्यानंतर चार किमीचा भव्य रोड शो करण्यात आला.

अमित शाह गांधीनगरमधून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. गांधीनगर हा भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांचा मतदारसंघ असून यावेळी अमित शाह यांना येथून उमेदवारी देण्यात आली आहे.