मोहन अटाळकर

वैयक्तिक आरोप-प्रत्यारोप नाहीत

गेल्या निवडणुकीतील राष्ट्रवादीच्या उमेदवार नवनीत राणा आणि शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांच्यात एका टीव्ही कार्यक्रमादरम्यान झालेल्या वादानंतर नवनीत यांनी अडसूळ यांच्या विरोधात दाखल केलेली तक्रार, समाजमाध्यमांवरील स्फोटक शेरेबाजी या कटू आठवणींच्या पार्श्वभूमीवर यावेळी दोन्ही उमेदवारांनी प्रचाराच्या सुरुवातीला अतिशय सावध पवित्रा घेतला आहे.

पूर्वाश्रमीच्या दाक्षिणात्य अभिनेत्री नवनीत कौर-राणा यांच्या चित्रपटांतील दृश्यांचे समाजमाध्यमांवरील बहुचर्चित प्रसारण यावेळी नाही. अद्याप तरी वैयक्तिक पातळीवर चिखलफेक झालेली नाही. पण, नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्रावरून उडालेल्या संघर्षांतून सुमारे सहा महिन्यांपूर्वी आव्हान-प्रतिआव्हानाची भाषा बोलली जाऊ लागली. अडसूळ आणि नवनीत राणा यांचे समर्थक आमने-सामने उभे ठाकले. प्रकरण पोलीस ठाण्यांपर्यंत पोहचले होते.

अडसूळ यांच्या विरोधातील तक्रारीचे प्रकरण पोलिसांनी निकाली काढले होते खरे, पण त्यावेळी तक्रारदारांना कळवण्यात आले नाही, हे कारण दशर्वून राणा यांनी गेल्या वर्षी जूनमध्ये पुनर्विचार याचिका दाखल केली होती, त्यावर सुनावणी सुरू आहे.

यावेळी प्रचाराचा सूर आक्रमक नाही. ‘अडसूळ हे आपल्या आजोबाच्या वयाचे आहेत, त्यांनी आता विश्रांती घ्यावी’, असा टोला नवनीत राणा यांनी उमेदवारी अर्ज सादर करताना लगावला, त्यावेळी मंचावरील नेतेही अवाक् झाले होते. ‘अडसूळ हे बाहेरचे ‘पार्सल’ आहे, ते परत पाठवलेच पाहिजे’, असे आमदार रवि राणा आपल्या भाषणांमधून सांगतात. संक्रांती सणादरम्यान महिला मेळाव्यांच्या माध्यमातून नवनीत राणा यांनी प्रचाराची संधी साधली होती. त्यांच्या सभांना महिलांची गर्दी दिसते. त्यामुळे अडसूळ यांनादेखील त्याची दखल घ्यावी लागली आहे. अडसूळ यांच्या प्रचारासाठी शिवसेनेचे स्टार प्रचारक आदेश बांदेकर यांनी अमरावतीत येऊन महिला मेळाव्यात सांस्कृतिक रंग भरला.

अडसूळ यांच्या प्रचाराचा नारळ देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत फुटला. त्यावेळी अडसूळ यांनी रवि राणा यांचा ‘गारुडी’ असा उल्लेख करताना मुख्यमंत्र्यांनी रवि राणांसोबत सलगी ठेवू नये, असे आवाहन केले खरे, पण त्यातून राणा यांचे ‘उपद्रवमूल्य’ खोलवर रुजल्याचेच ध्वनित झाले. उद्धव ठाकरेंनीदेखील आपण वाघ आहोत, असे सांगत साप, गारुडय़ांना हाकलून लावू, असा इशारा दिला. आतापर्यंतच्या प्रचार सभांमधून नवनीत राणा किंवा अडसूळ यांनी वैयक्तिक पातळीवर कुणीही वाईट टीका केलेली नाही.