तृणमूल आणि भाजप यांच्यातील संघर्षांमुळे अस्वस्थ असलेले पश्चिम बंगाल आणि भाजपची सत्ता असलेले आसाम यांच्यासह चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकीची घोषणा शुक्रवारी करण्यात आली.

पश्चिम बंगाल, आसाम, तमिळनाडू, केरळ या राज्यांत आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशात २७ मार्च ते २९ एप्रिल अशा दोन महिन्यांच्या कालावधीत मतदान होईल. त्यांची मतमोजणी २ मे रोजी होईल, असे केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी सांगितले.

ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसची सत्ता असलेल्या अतिसंवेदनशील पश्चिम बंगालमध्ये यावेळी आठ टप्प्यांत मतदान घेण्यात येईल, असे निवडणूक आयोगाने जाहीर केले. गेल्या निवडणुकीत सात टप्प्यांत मतदान घेण्यात आले होते. या राज्यात २९४ जागांसाठी मतदान होईल. भाजपची सत्ता असलेल्या आसाममध्ये तीन टप्प्यांत मतदान घेण्यात येणार आहे. उर्वरित तीन राज्यांमध्ये म्हणजे, तमिळनाडू, केरळ आणि पुदुच्चेरीत एकाच टप्प्यात, ६ एप्रिल रोजी मतदान घेण्यात येणार आहे.

करोना महासाथीच्या काळात विधानसभा निवडणूक झालेले बिहार हे पहिले राज्य होते. तिथे पाच महिन्यांपूर्वी ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२० मध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने यशस्वीपणे निवडणूक प्रक्रिया पार पाडली होती. बिहारप्रमाणे या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीतही करोना प्रतिबंधाच्या नियमांचे पालन केले जाईल आणि मतदानासाठी विशेष व्यवस्था करण्यात येईल, असे मुख्य निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले.

करोनाचा साथरोगाची तीव्रता कायम असताना जून २०२० मध्ये १८ जागांसाठी झालेली राज्यसभेची निवडणूक आणि त्यानंतर बिहार निवडणूक हे निवडणूक आयोगासाठी महत्त्वाचे टप्पे होते, असे अरोरा म्हणाले.

केंद्रीय निवडणूक आयुक्त म्हणून अरोरा यांची ही अखेरची पत्रकार परिषद होती, १३ एप्रिल रोजी त्यांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे.

निवडणूक अधिकाऱ्यांचे लसीकरण

मतदानापूर्वी सर्व मतदान केंद्रांवरील निवडणूक अधिकाऱ्यांचे लसीकरण केले जाणार आहे. बिहारप्रमाणे मतदानाची वेळ दोन तासांनी वाढवली जाईल. करोना प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेऊ न मतदानकेंद्रे र्निजतुक केली जातील. घरोघर प्रचारात फक्त पाच व्यक्तींना सहभागी होण्याची मुभा असेल. फक्त पाच वाहनांचा ताफा घेऊन उमेदवाराला प्रचारफेरी काढता येईल.

राज्यांतील राजकीय परिस्थिती

– बिहारची निवडणूक झाल्यानंतर लगेचच भाजपने पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली होती. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यासमोर भाजपने आव्हान उभे केले आहे.

– आसाममध्ये २०१६ मध्ये भाजपने काँग्रेसचा पराभव करून पहिल्यांदा सत्ता मिळवली होती, आता ती कायम राखण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.

– तमिळनाडूमध्ये जयललिता आणि करुणानिधी या दिग्गजांच्या अनुपस्थितीत पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक होत आहे. तेथे भाजप व सत्ताधारी अण्णाद्रमुक यांच्या आघाडीला द्रमुक- काँग्रेस युतीशी संघर्ष करावा लागेल.

– पुदुच्चेरीतील सत्ता विधानसभा निवडणुकीच्या तोडांवर गमावण्याची नामुष्की काँग्रेसवर आली. सरकार अल्पमतात आल्यामुळे मुख्यमंत्री व्ही. नारायण स्वामी यांनी राजीनामा दिला.

– केरळमध्ये डावे पक्ष आणि काँग्रेस आघाडीत थेट लढाई होईल. इथे भाजपने ‘मेट्रो मॅन’ ई. श्रीधरन यांना पक्षात घेऊन दोन्ही आघाडय़ांना आव्हान देण्याचा इरादा स्पष्ट केला आहे.

२७ मार्चपासून प्रारंभ

* निवडणुकीचा पहिला टप्पा २७ मार्चपासून

* शेवटचा टप्पा २९ एप्रिल रोजी

* पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यांत मतदान

* मतमोजणी २ मे रोजी चार राज्ये आणि

एक केंद्रशासित प्रदेश

* एकूण मतदारसंघ : ८२४

* एकूण मतदार : १८ कोटी ६८ लाख

* मतदान केंद्रे : दोन लाख सात हजार

एकाच टप्प्यात..

केरळ, तमिळनाडू आणि पुदुच्चेरीमध्ये एकाच टप्प्यात,

६ एप्रिलला मतदान.

आसाममध्ये..

२७ मार्च, १ एप्रिल आणि ६ एप्रिल अशा तीन टप्प्यांत मतदान.

पश्चिम बंगालमध्ये आठ टप्पे

टप्पे    मतदान जागा

पहिला २७ मार्च    ३०

दुसरा   १ एप्रिल    ३०

तिसरा  ६ एप्रिल ३१

चौथा   १० एप्रिल   ४४

पाचवा १७ एप्रिल   ४५

सहावा २२ एप्रिल   ४३

सातवा  २६ एप्रिल   ३६

आठवा २९ एप्रिल   ३५

लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभा निवडणुकीसह केरळमधील मलप्पुरम आणि तमिळनाडूतील कन्याकुमारी या दोन लोकसभा मतदारसंघात ६ एप्रिल रोजी पोटनिवडणूक होईल आणि २ मे रोजी मतमोजणी होईल.