हिमाचल प्रदेशातील हमीरपूर मतदारसंघात भाजपचे नेते अनुराग ठाकूर यांचा सामना काँग्रेसचे माजी मंत्री व पाच वेळा विधानसभेवर निवडून आलेल्या रामलाल ठाकूर यांच्याशी आहे. अनुराग ठाकूर हे तीन वेळा या मतदारसंघातून विजयी झाले आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष असलेले अनुराग यांनी संसदेत सत्तारूढ पक्षाची बाजू जोरदारपणे मांडली होती. प्रमुख नेत्यांमध्ये त्यांची गणना होते. हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री प्रेमकुमार धुमळ यांचे पुत्र असलेल्या अनुराग यांनी गेल्या तीनही निवडणुकांत (पोटनिवडणुकीसह) चांगले मताधिक्य घेतले आहे. गेल्या तीस वर्षांत या मतदारसंघात काँग्रेसला एकदाच विजय मिळाला आहे. बिलासपूर, उना व हमीरपूर जिल्ह्य़ांचा मिळून हा मतदारसंघ तयार झाला आहे. भाजपचे माजी खासदार सुरेश चंडेल यांनी निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने भाजपला धक्का बसला आहे. या मतदारसंघात अनुराग ठाकूर तसेच भाजपच्या राज्य सरकारबद्दल काही प्रमाणात नाराजी आहे. मात्र मोदींना मत देणार असल्याची भावना असल्याने सत्ताधाऱ्यांसाठी हा दिलासा आहे. गेल्या वेळी राज्यातील चारही जागा भाजपने जिंकल्या होत्या. यंदा मात्र भाजप विरुद्ध काँग्रेस यांच्यात चुरस आहे.