मध्यरात्री निवडणूक अधिकाऱ्यांचा निर्णय

पालघर लोकसभेच्या निवडणूक प्रक्रियेत बहुजन महापार्टीचा अधिकृत उमेदवार नसल्याने या पक्षासाठी आरक्षित केलेले ‘शिट्टी’ हे निवडणूक चिन्ह मतदारसंघांमध्ये मुक्त चिन्ह (फ्री सिंबल) करण्यास पालघरचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी अनुमती न दिल्याने शिट्टी या चिन्हासाठी गेल्या १५-२० दिवसांपासून सुरू असलेला वाद संपुष्टात आला आहे. यामुळे बहुजन विकास आघाडी या पक्षाला त्यांनी प्राधान्यक्रमाने दिलेल्या ‘ऑटोरिक्षा’ या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार आहे.

निवडणूक आयोगाने २१ डिसेंबर २०१८ च्या आदेशान्वये ‘शिट्टी’ हे निवडणूक चिन्ह बहुजन महापार्टी या पक्षाकरिता राखीव ठेवले होते. बहुजन महापार्टीतर्फे राजू लढे, चेतन पाटील या दोन उमेदवारांनी ए-बी फॉर्म दाखल करून उमेदवारी भरली होती. निवडणूक अर्ज छाननीदरम्यान चेतन पाटील यांचा अर्ज उशिरा दाखल केल्याने व त्या अर्जाच्या पूर्वी दिलेल्या पक्षवैधतेचे अर्ज गृहीत धरू नये, अशा आशयाची टिप्पणी चेतन पाटील यांच्या अर्जावर असल्याने राजू लढे यांच्या उमेदवारी अर्जाची अपक्ष म्हणून गणना करण्याचे आदेश निवडणूक निर्णय अधिकारी यांनी यापूर्वी केली होती.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी नाटय़मय पद्धतीने चेतन पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. यामुळे बहुजन महापार्टीचा उमेदवार रिंगणात नसल्याचे कारण सांगत या पक्षासाठी आरक्षित शिट्टी हे निवडणूक चिन्ह खुले होऊन त्यावर बहुजन विकास आघाडीने दावा केला होता.

१२ एप्रिल मध्यरात्रीनंतर पालघरचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा पालघरचे जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निर्णयांमध्ये निवडणूक प्रक्रियेमध्ये बहुजन महापार्टीचा अधिकृत उमेदवार असल्याचे व त्यांचे नाव नमुना ४ (वैध उमेदवारांच्या यादी) मध्ये प्रसिद्ध झाल्याने लोकसभा मतदारसंघांमध्ये बहुजन महापार्टीने उमेदवार उभा केला नव्हता, असे म्हणता येणार नाही, असे नमूद करून या पक्षासाठी आरक्षित केलेले चिन्ह पालघर लोकसभा मतदारसंघात ‘मुक्त चिन्ह’ करण्यास निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नकार दिला. यामुळे बहुजन महापार्टी या पक्षाकडे निवडणूक आयोगाने आरक्षित केलेले शिट्टी हे चिन्ह पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये मुक्त चिन्ह झाले नाही.