राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देणारे जयदत्त क्षीरसागर यांनी बुधवारी शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे जाहीर केले. वादळात दिव्याचे रक्षण केले. पण आता दिव्यामुळेच हात पोळू लागले आहे, मग दिव्याचे रक्षण कसं करायचं असा सवाल उपस्थित करत क्षीरसागर यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचे जाहीर केले असून ते बुधवारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. या पार्श्वभूमीवर क्षीरसागर यांनी बुधवारी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वावर टीका केली. हेचि फळ काय मम तपाला, असेही त्यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादीमधील गटबाजीवर त्यांनी नाराजी व्यक्त केली. मी शरद पवारांकडे माझी भूमिका मांडली होती. पण आता बोलण्यासारखं काही उरलेलं नाही. आता त्यांनीच आत्मपरीक्षण करावं, असे जयदत्त क्षीरसागर यांनी सांगितले. इतकं वर्ष मी राष्ट्रवादीसाठी काम केले, याकडे लक्ष वेधत ते पुढे म्हणाले, वादळात मी दिव्याचं रक्षण केले होते. पण आता त्याचं दिव्यांनी हात पोळू लागले.

दरम्यान, शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी क्षीरसागर यांनी विधानभवनात जाऊन आमदारकीचा राजीनामा दिला. त्यांच्यासोबत मिलिंद नार्वेकर हे देखील उपस्थित होते. बुधवारी संध्याकाळी ते शिवसेनेत प्रवेश करणार आहे. ‘एनडीए’ची सत्ता यावी असे वाटत होते. आधी राजीनामा द्यावा, मग प्रवेश करावा ही माझी इच्छा होती, असे त्यांनी सांगितले.

कोण आहेत क्षीरसागर ?
बीड जिल्ह्यात ४० वर्षांपूर्वी दिवंगत केशरबाई क्षीरसागर यांनी प्रस्थापितांचे वर्चस्व कमी करून आपले नेतृत्व प्रस्थापित केले. शिक्षण व सहकारी संस्थांच्या माध्यमातून गावागावात हक्काचा माणूस तयार करून प्रभाव निर्माण केला. विधानसभेच्या सहाही मतदारसंघात क्षीरसागरांनी निर्णायक राजकीय ताकद निर्माण केली होती. २० वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर दिवंगत केशरबाई क्षीरसागर व आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी पक्षात यावे यासाठी शरद पवार यांना स्वत: क्षीरसागरांच्या घरी धाव घ्यावी लागली होती.