भाजपाचे संकल्पपत्र नव्हे तर फसवणूक पत्र आहे. पाच वर्षांपूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता त्यांना अद्याप करता आलेली नाही आणि अच्छे दिन बाजूला सारत आता पुन्हा घोषणांचा ब्लास्ट केला गेला आहे. पहिले आधीचा हिशोब चुकता करा अशा शब्दांत विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजपाच्या जाहीरनाम्यावर टीका केली आहे.

भारतीय जनता पक्षाचा हा प्रसिद्ध झालेला जाहीरनामा संकल्पपत्र नव्हे ‘मृगजळ’ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या पंक्चर झालेल्या सरकारच्या टायरमध्ये कितीही घोषणांची हवा भरली तरी फक्त ती ‘चलती का नाम गाडी’ आहे हे जनता जाणते. त्यामुळेच ‘चालू’ इंजिन असलेल्या खटारा गाडीला जनता जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही.
इस बार तू तो गयो ! असा टोला मुंडे यांनी लगावला आहे.

बेरोजगारीच्या आकड्याने गेल्या ५ वर्षात उच्चांक गाठला. बेरोजगारीची कारणं देत उपाययोजना सुचवल्या असत्या तर भाजपाचा जाहीरनामा विश्वासार्ह वाटला असता. ना आमच्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळाला, ना त्यांना सन्मानानं जगता आलं. खोट्या ‘संकल्पांनी’ जनतेची पोटं भरणार नाही असे ते म्हणाले.

आघाडी सरकारच्या काळात ९०% पूर्ण झालेल्या २६ सिंचन प्रकल्पाला पूर्ण करू शकले नाही, तरी सिंचनाचे हवाले देत फिरत आहे. शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करणार, छोट्या दुकानदारांना ६० वर्षांनंतर पेन्शन देणार… कॅनव्हासवरील चित्र बरं दिसत असलं तरी त्याला सत्यात उतरवण्याची तुमची पात्रता नाही असे मुंडे म्हणाले. पंधरा लाख, अच्छे दिन, शेतकर्‍यांच्या मालाला दुप्पट हमी भाव, दोन कोटी नोकऱ्या या मागील वर्षी च्या जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांचे काय झाले याचा हिशोब द्यावा अशी मागणीही त्यांनी केली.

विदर्भातील यवतमाळ लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांच्या प्रचारासाठी वाशीम येथे आयोजित केलेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. तत्पूर्वी त्यांनी वर्धा आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस आघाडी उमेदवाराच्या प्रचारासाठी ही सभा घेतल्या.