हरदोई, उत्तर प्रदेश : देशातील विविध जातीधर्माच्या लोकांमध्ये फूट पाडून सत्ता हस्तगत करण्याचे ब्रिटिशांचे फोडा व राज्य करा हे धोरण भाजपने अंगीकारले आहे, पण सप- बसप आघाडी त्यांचे हे कुटील डाव यशस्वी होऊ देणार नाही, असे समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी बुधवारी  सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधताना माजी मुख्यमंत्री अखिलेश यांनी सांगितले की, लोकांनी चहावाल्यास गेल्या निवडणुकीत मते देऊन चहाची चव घेतली आहे, आता या चहाची चव कळल्यानंतर तुम्ही परत त्यांना मतदान करणार का असा सवाल त्यांनी केला.

भाजपचा हेतू फक्त सत्ता काबीज करणे हा आहे. पण समाजवादी पक्ष व बहुजन समाज पक्ष भाजपचे हे कुटील डाव  हाणून पाडेल. आम्ही एकत्र येऊन निवडणुका लढवल्या असून या शक्तींविरोधातील लढाई आम्हीच जिंकणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.

सप-बसप-रालोद यांची आघाडी जर मोदींच्या म्हणण्याप्रमाणे महामिलावट असेल तर ३८ पक्षांच्या आघाडीला तुम्ही काय म्हणणार असा प्रश्न करून ते म्हणाले की, देशाला प्रधानमंत्री हवा आहे प्रचारमंत्री नव्हे. एनडीएसाठी आपण काही विशेषणे लावणार नाही कारण लोकांना ते काय आहेत हे समजले आहे.

मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्यावर चौफेर टीका करताना त्यांनी सांगितले की, जर देशात राज्यघटना नसती तर मी गुरे चारत बसलो असतो पण ते कशा पद्धतीने काम करीत आहेत हे लोकांनी पाहिले आहे. भाजप लष्करी दलांचा राजकीय फायद्यासाठी वापर करीत आहेत, असा आरोप करताना ते म्हणाले की, देशाच्या सीमा पंतप्रधानामुळे नव्हे तर लष्कराच्या जवानांमुळे सुरक्षित आहेत.