भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या कोलकातामधील रोड शो दरम्यान मंगळवारी संध्याकाळी मोठा हिंसाचार झाला. कॉलेज स्ट्रीट मार्गावर कोलकात्ता विद्यापीठाजवळून अमित शाह यांचा रोड शो जात असताना भाजपा आणि डाव्यांच्या विद्यार्थी संघटनांचे कार्यकर्ते भिडले.

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. अमित शाह यांच्या ट्रकच्या दिशेने लाठया फेकण्यात आल्यानंतर या हिंसाचाराला सुरुवात झाली. या हिंसाचारानंतर रस्त्यावर एकच गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. रस्त्यावर पळापळ सुरु असल्याचे चित्र होते. रस्त्यावर जाळपोळीच्याही घटना घडल्या आहेत.

रोड शो पूर्वीच या तणावाची सुरुवात झाली होती. इथे सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेले मोदी-शाहंची पोस्टर्स तृणमुलच्या कार्यकर्त्यांनी हटवली. त्यामुळे टीएमसी आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

या घटनेबाबत भाजपाने तृणमुलचे कार्यकर्ते आणि पोलिसांवर आरोप केले आहेत. भाजपा नेते कैलाश विजयवर्गीय म्हणाले, ममतांच्या गुंडांनी आणि पोलिसांनी रोड शो पूर्वीच मोदी-शाहंचे सर्व पोस्टर्स आणि भाजपाचे झेंडे काढून टाकले.

आम्ही तिथे पोहोचताच ते सर्वजण पळून गेले. तसेच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी या कृत्याला लोकशाही हत्या संबोधले आहे. ममतांकडून सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग केला जात असल्याचा आरोपही भाजपाने केला आहे.