मुंबई हल्ल्यानंतर काँग्रेसने पाकिस्तानला इशारा देण्याऐवजी हिंदूंवर दहशतवाद थोपवण्याचं कारस्थानं केलं, असा गंभीर आरोप पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. बिहारमधील अरारिया येथील जाहीर सभेत ते बोलत होते.


मोदी म्हणाले, २६/११ चा हल्ला झाला त्यावेळी काँग्रेस आणि त्यांच्या सहकारी पक्षांनी काय केलं? त्यावेळी देशाच्या वीर जवानांनी पाकिस्तानात घुसून बदला घेण्याची परवानगी मागितली होती. मात्र, काँग्रेस सरकारने सैन्याला यासाठी मनाई केली. कारण, त्यांना मतांचे राजकारण करायचे होते. सर्वांना माहिती होतं की हा हल्ला घडवणारे दहशतवादी पाकिस्तानी होते. मात्र, तरीही काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांनी पाकिस्तानला इशारा देण्याऐवजी हिंदूवर दहशतवाद चिकटवण्याचे कारस्थान रचण्यावर लक्ष्य केंद्रीत केले.

काही लोकांना आजकाल ‘भारत माता की जय’ बोलण्यावरुन पोटात दुखतं. मात्र, ‘भारत तेरे टुकडे होंगे’ सारख्या घोषणांचे समर्थन केले जाते. हे लोक देशाच्या विकासासाठी प्रयत्न कसे करु शकतील. कोणत्याही जाती-धर्माच्या आधी आपण भारतीय आहोत. आपली ओळख भारतीय आहे. गेल्या पाच वर्षांत आमच्या सरकारने याच भावनेला पुढे नेण्याचे काम केले. त्यामुळे एका बाजूला वोटभक्तीचे तर दुसऱ्या बाजूला देशभक्तीचे राजकारण सुरु आहे, असे मोदी यावेळी म्हणाले.

काँग्रेसवर वोट बँकेच्या राजकारणाचा आरोप करताना मोदींनी दिल्लीच्या बाटला हाऊस प्रकरणाचाही आपल्या भाषणात उल्लेख केला. दहशतवाद्यांवर कारवाईने खूश होण्याऐवजी काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांच्या डोळ्यात अश्रू येत आहेत. आम्ही पहिल्यांदा सर्जिकल स्ट्राइक केला त्यानंतर एअर स्ट्राइक केला. त्यानंतर पाकिस्तानच आता जगभरात जाऊन सांगत आहे की, भारताने दहशतवाद्यांना पाकिस्तानात घुसून मारलेही आणि संपूर्ण जगात त्यांना वेगळंही पाडलं. या नव्या भारताच्या नव्या भुमिकेमुळे तुम्ही खूश आहात का? असा सवाल यावेळी मोदींनी उपस्थितांना विचारला.