देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, शरद पवार, राज ठाकरे यांच्या सभा

नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या राज्यातील अंतिम टप्प्यात टळटळीत उन्हामध्ये जाहीर सभांचा धडाका उडाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनंतर आता भाजप-शिवसेनेचे पदाधिकारी बुधवारी होणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या तयारीला लागले आहेत. याच दिवशी सायंकाळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही जाहीर सभा गिरणारे येथे तर शुक्रवारी सायंकाळी मनसे अध्यक्ष  राज ठाकरे यांची सभा नाशिकमध्ये होणार आहे.

टळटळीत उन्हात सभांना गर्दी जमविणे आव्हान असून भाजप-शिवसेनेची आणि राज यांची सभा एकाच मैदानावर होणार असल्याने गर्दीची तुलना होण्याच्या धास्तीतून दोन्ही बाजूने जय्यत तयारी केली जात आहे. मात्र गर्दी जमविताना पदाधिकारी, कार्यकर्त्यांची दमछाक होत असल्याचे पाहायला

मिळत आहे. नाशिक, दिंडोरी आणि धुळे लोकसभा मतदारसंघात अखेरच्या टप्प्यात प्रचार सभांचा धुरळा उडाला असून या तिन्ही मतदारसंघात २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.  जाहीर प्रचाराची मुदत शनिवारी सायंकाळी संपणार असून प्रचाराला केवळ चार दिवसांचा अवधी राहिल्याने सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवार कमी कालावधीत अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याची धडपड करीत आहेत. अखेरच्या टप्प्यात दिग्गज राजकीय नेत्यांच्या सभा हा त्याचाच एक भाग असून प्रत्येक जागा महत्त्वाची असल्याने सर्वपक्षीय नेत्यांचे नाशिकवर लक्ष आहे.

सोमवारी पिंपळगाव बसवंत येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली. या सभेसाठी भाजप-सेनेचे पदाधिकारी आठवडाभरापासून झटत होते. आता अनंत कान्हेरे मैदानावर बुधवारी सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची संयुक्त सभा होणार आहे. हुतात्मा अनंत कान्हेरे हे प्रचारासाठीचे महत्त्वाचे मैदान असून सुमारे एक लाखाची क्षमता असणाऱ्या या मैदानावरील सभांकडे सर्वाचे लक्ष असते. दुष्काळ, टळटळीत ऊन यामुळे सभांना कसा प्रतिसाद मिळतो याची धास्ती असते. सभांना गर्दी जमविण्याची जबाबदारी पक्षांनी पदाधिकारी, नगरसेवकांवर टाकली आहे. पंतप्रधानांच्या सभेसाठी तर प्रत्येकाला काही वाहने नेण्याचा कोटा ठरवून दिला गेल्याचे सांगितले जाते. त्याची पुनरावृत्ती सेना-भाजपकडून शहरातील सभेत होण्याची शक्यता आहे. प्रचंड गर्दी जमवून सभा यशस्वी करण्याचा पदाधिकाऱ्यांचा प्रयत्न आहे. कारण, या सभेनंतर याच मैदानावर मनसेच्यावतीने राज ठाकरे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. दोन्ही सभा झाल्यानंतर त्यांचे तुलनात्मक मूल्यमापन होऊ शकते. हे लक्षात घेऊन युतीचे कार्यकर्ते तयारीला लागले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी सभा शहरात होणार असली तरी याच दिवशी सायंकाळी शरद पवार यांची सभा शहरालगतच्या गिरणारे येथे होत आहे.

प्रचारात भाजप नेते आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात चांगलीच जुंपली आहे. भाजप नेत्यांच्या टिकेला पवार हे जोरदार प्रत्युत्तर देत आहेत. या वादाचा पुढील अंक नाशिकमध्ये पाहायला मिळू शकतो. गेल्या अनेक निवडणुकांमध्ये राज यांनी नाशिकमध्ये मनसेच्या प्रचारार्थ सभा घेतलेल्या आहेत. परंतु, मनसेचा उमेदवार नसताना त्यांची सभा होत असून त्याला कसा प्रतिसाद मिळतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.